तुळस हा तर हिंदू संस्कृतीचा जीव की प्राण! तिचे धार्मिक, अध्यात्मिक, वैज्ञानिक, आयुर्वेदिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे घरात इतर कोणती रोपटी असो वा नसो, तुळशीचे रोप असतेच असते. परंतु बऱ्याचदा इच्छा असूनही तुळस फार दिवस टिकत नाही. एक तर कोरडी पडते, खुंटून जाते, मलूल पडते नाहीतर तुळशीला कीड लागते. अशा वेळी जुने रोप बदलून नवे रोप लावण्याशिवाय पर्याय उरत नाही. परंतु, दर वेळी दहा-पंधरा रुपयांचे नव नवे रोपटे आणण्यापेक्षा घरातल्या तुळशीला दीर्घकाळ कसे टिकवता येईल, यासाठी प्रयत्न करू.
>> तुळशीला जास्त पाणी घातले तर ती मरते. आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते, पण तेव्हा घरादारात तुळशीचे वृंदावन असे. मोठ्या वृंदावनात पेलाभर पाणी सहज शोषले जात असे. परंतु आपण लावलेले रोपटे छोटेसे असते आणि त्यावर पाण्याचा मारा केला तर ते मरते. म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजेल एवढेच पाणी घालावे.
>> कुंडीतून पाणी झिरपेल अशा बेताने दोन छिद्र पाडावीत. तुळशीचे र लावताना कुंडीमध्ये सर्वात खाली वाळूचा एक थर पसरवून घ्यावा. तसेच भुसभुशीत माती, वाळू आणि कोरडे शेण एकत्र करून कुंडीत पसरवून घ्यावा. यात मातीचे प्रमाण सत्तर टक्के, वाळूचे प्रमाण पंधरा टक्के आणि शेणाचे प्रमाण पंधरा टक्के असावे.
>> तुळशीचे रोप निवडताना त्याची पाने चांगली तपासून घ्यावीत. पाने मोठी, छान आणि हिरवीगार असतील आणि त्याला मोहोर असेल, तर ती तुळस चांगली मानली जाते. अशा तुळशीला प्लॅस्टिक आवरणातून बाहेर काढून कुंडीतील मातीत रुजवावे आणि वरून आणखी एक मातीचा थर रचावा व पहिल्या वेळेस व्यवस्थित पाणी टाकून घ्यावे आणि नंतर थोडे थोडे पाणी टाकत राहावे. यात कोकोपीटचाही वापर करता येईल.
>> तुळशीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा. अपुऱ्या सूर्य प्रकाशाअभावी तुळशीचे रोपटे मलूल होते आणि त्याची अन्न निर्मिती प्रक्रिया थांबते. काही काळातच रोपटे मान टाकते. म्हणून तुळशीचे रोप सूर्य प्रकाश मिळेल अशा जागी लावावे.
>> तुळशीला कीड पटकन लागते. यासाठी दर वीस-बावीस दिवसांनी त्यावर सैंधव मीठ मिश्रित पाण्याचा फवारा करावा. हा फवारा केल्यानंतर एक दोन दिवसानंतर तुळशीची पाने धुवून मगच वापरावीत.
>> गोवऱ्यांचा एक तुकडा पाण्यात एक दिवसभर भिजवून ते पाणी महिन्यातून एक दोनदा तुळशीला घालावे. तुळशीला आवश्यक सर्व घटक त्यातून मिळतात.
>> तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी मंजिरी फार दिवस ठेवू नये. ती खुडून तिचा चुरा पुन्हा कुंडीतल्या मातीत टाकावा. मंजिरी खुडल्यामुळे आणि वरवरची पाने अलगद तोडल्यामुळे तुळशी अधिकाधिक बहरते, फोफावते.
या सगळ्या क्लुप्ती तुम्हीदेखील वापरून पहा, शिवाय तुमच्या माहितीत आणखी काही क्लुप्त्या असतील, तर जरूर सांगा, जेणेकरून दुसऱ्यांच्या अंगणातील तुळस आणखी बहरेल आणि त्यांच्या घरीदेखील सुख समृद्धी नांदेल.