>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
नवीन वर्षा २०२५ (New Year 2025 Astrology) सुरवातीची ग्रहांची बैठक पाहता कर्क राशीतील वक्री मंगळ धुसफुसत राहणार , गुरूच्या नक्षत्रात नुकताच प्रवेश केलेले कुंभ राशीतील शनी महाराज , मीन आणि कन्या राशीतील राहू केतू आणि अर्थात वृषभ राशीतील गुरु महाराज . एप्रिल आणि मे दोन महिने होणारी राहू शनी युती अनेक परिवर्तने घेवून येयील.
फेब्रुवारीपासून शुक्र मीन ह्या त्याच्या उच्च राशीत उच्चीची वस्त्रे परिधान करत असला तरी तिथे तो वक्री अवस्थेत सुद्धा काही काळ असणार आहे त्याच सोबत शुक्र शनी युती सुद्धा तिथे होणार आहे. जानेवारीच्या अखेर मिथुनेत वक्री अवस्थेत प्रवेश करणारा मंगळ. २९मार्च २५ रोजी शनी महाराज आपली कुंभ रास सोडून मीन राशीत प्रवेश करणार आहेत आणि त्याचबरोबर मकर राशीची साडेसाती पूर्ण होणार आहे. साडेसाती नुसती राशी बदलून संपत नाही तर प्रत्येकाच्या वैयक्तिक पत्रिकेत चंद्राच्या अंशाप्रमाणे ती संपत असते हे मी मागील एका लेखात स्पष्ट केले आहे. त्यामुळे मीन राशीत शनी महाराजांनी पदार्पण केले तरी सगळ्या मकर राशीच्या लोकांची साडेसाती संपेल असे मात्र नाही .
आता पुढे सज्ज व्हायचे आहे ते मेष राशीच्या लोकांनी . कार्माधीपती शनी त्यामुळे उत्तम काय असायला हवे तर आपली कर्म . साडेसातीचा त्रास नको असेल तर हनुमान चालीसा , दर मंगळवारी मारुतीला शेंदूर अर्पण करणे आणि कष्ट करत सन्मानाने जगणे हा उपाय आहे. आळशी , कामचुकार , दुसऱ्याच्या जीवावर आणि पैशावर आरामात लागणाऱ्या लोकांची शनी दुर्दशा करतो , अहंकाराचा माज ज्याने आपल्याला जन्माला घातलय त्याला दाखवला तर उलटी गिनती सुरु झाली म्हणून समजा .
मुळात साडेसाती असो अथवा नसो जीवन हे एक आव्हानच आहे त्यामुळे साडेसातीचे भूत डोक्यातून काढून टाका . नवीन वर्षात संकल्प करण्यापेक्षा मी माझे आयुष्य पुढे सकारात्मक कसे होवू शकेल ह्याचा विचार करा . नव्याची नवलाई संपतेच संपते आणि मग खरी आव्हाने समोर उभी ठाकतात ती लीलया पेलायला उपासनेची जोड लागते ग्रह मार्गी वक्री स्तंभी अवस्थेतून भ्रमण करत असतात . आपल्या आयुष्यावर त्यांचे चांगले वाईट प्रभाव होत असतात . उपासना असेल तर आयुष्य मार्गस्थ होते .
मोकळ्या आकाशाखाली मुक्त विहार करणाऱ्या पक्षांप्रमाणे आपले जीवन आणि मन सुद्धा मुक्त करण्याचा प्रयत्न करा . आपली घ्येय , उद्दिष्ट , छंद , आवडीनिवडी ह्यांना पंख लावा आणि उंचच उंच भरारी घ्या . मला काहीतरी मिळवायचे आहे करून दाखवायचे आहे ह्या विचाराना वेग द्या . चुकीच्या गोष्टीपासून स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न सातत्याने केला तर आपले जीवन अधिक सुंदर होईल. दिवसातील ९०% वेळ हा अत्यंत टुकार , फालतू विचार करण्यात आपण घालवतो , ज्या गोष्टीचा आपल्याशी काडीचाही संबंध नाही असे विचार आपल्याला हवेच कश्याला ? आपल्या मेंदूतील हा कचरा सर्वप्रथम काढून टाकलात तर स्वस्थ जीवनाकडे नक्कीच वाटचाल होईल. सोशल मिडीयाचा अवास्तव वापर आपला मेंदू पोखरत चालला आहे. प्रत्येक बातमी आपल्यासाठी असतेच असे नाही . डिजिटल माध्यमांच्या आहारी गेलेले तुम्ही आम्ही आपले अस्तित्व जणू विसरत चाललो आहोत. आपण ह्या माध्यमांसाठी आहोत कि हि माध्यमे आपल्यासाठी हे अवघड गणित झाले आहे. आपले डोळे आणि इतर इंद्रिय , बुद्धी भरकटत चालली आहे. संवाद नष्ट होत आहे आणि आधुनिक जगतातील ह्या सर्व मोबाईल , डीजीटल माध्यमातील राहूचा विळखा आपल्याभोवती आपल्याही नकळत अधिकाधिक घट्ट होत आहे. आज मनाचे श्लोक , सकाळच्या प्रार्थना , शुभंकरोती लोप पावत आहे . नामस्मरण आपल्या भोवती सद्गुरूंचे जणू कवच तयार करते हा ओरा भेदून जाणे दुष्ट शक्तीना शक्यच होत नाही म्हणून नामस्मरणाची अंघोळ जणू सद्गुरूंच्या चरणावर घातली पाहिजे . आपले मन , बुद्धी विचार स्थिर असतील तर जीवनातील आनंद लोप पावत नाही .
आयुष्यात ग्रहस्थिती नेहमीच बदलत असते जसा आपला निसर्ग पण आपली नित्यकर्मे करताना आपली उपासना , नामस्मरण बळकट असेल त्यात सातत्य असेल तर कितीही वादळे आली तरी आपण त्याला धीराने तोंड देवू शकतो . आपल्याला साधनेसाठी एक अखंड वर्ष स्वामी देत आहेत किती भाग्यवान आहोत आपण . आता ह्या वेळेचे चीज करणे हे मात्र आपल्याच हाती आहे.
गत वर्षापेक्षा नवीन वर्षात मी अधिक साधना कशी करू शकेन हा विचार मनात रुजवला पाहिजे. इतर गोष्टी अपोआप होत राहणार आहेत .आयुष्यात माणसे येत जात राहतात , घडणाऱ्या घटनाही घडत राहतात आपण मात्र आहोत तिथेच राहतो ह्याचे कारण मानसिक दृष्टीने आपण त्यात अडकून पडतो ,गुंतून राहतो , कुणी अपमान केला कोण काय बोलले सर्व काही मनाच्या कोपर्यात दडवून ठेवतो विसरत नाही आणि माफही करत नाही . ह्या सर्वाचे साचलेले थर तुमच्या मनाला ह्या सर्वाची सतत जाणीव करून देत राहतात , अपमानाच्या सुडाच्या भावनेने आपण कायम जळत राहतो आणि अनेक आजारांना जन्माला घालत राहतो . ज्याने अपमान केला तो मस्त जगत असतो. मुक्त व्हा आणि आकाशातील पक्षाप्रमाणे मनाच्या हिंदोळ्यावर आनंदाने विहार करा . नको ते विचार आणि माणसे दूर करा . ज्यांच्याशी पटते त्यांच्यासोबत आयुष्य घालवा . सगळ्यांनाच सगळे आवडले पाहिजे असा काही नियम नाही .
स्वतःसाठी जगा , नकारात्मक विचार, सूडबुद्धी , द्वेष , मत्सर , हेवेदावे ह्या सर्वाना कायमची तिलांजली द्या . स्वामी माझा मी स्वामींचा बस इतकेच लक्ष्यात ठेवा. आजकाल भावना विरहित जग आहे. कुणी कुणाचे नाही , फायदा तिथे माणूस असे समीकरण आहे अश्या जगात भावना विवश होणारी माणसे कोलमडून जातात म्हणूनच खंबीर व्हा आणि स्वतःसाठी जगा , वाचन वाढवा , वाचन माणसाला अनेक वेगवेगळे दृष्टीकोन देतो , विचारांच्या कक्षा रुंदावतात आणि प्रगल्भते कडे पावुले पडतात . संकुचित मनोवृत्ती क्षणाचा आनंद देयील पण चिरकाल दुक्ख सुद्धा देयील. मी पणाची कर्तेपणाची भावना जोवर जात नाही तोवर सद्गुरू प्राप्ती नाही हे निश्चित . तुच करता करविता आहेस हि भावना मनात ठेवून निस्सीम भक्ती केली तर त्यांच्या चरणाशी जागा मिळणारच आणि ती जागा मिळवणे हेच आयुष्याचे आणि जगायचे कारण झाले पाहिजे .
आपला आहार विहार , शब्दभांडार आपल्याच हाती आहे , आता माणसे जोडायची कि आहेत तीही घालवायची ह्याचा विचार प्रत्येकाचा असणार आहे . समस्या आहेत आणि येतच राहणार , उपाय आहेत ते केले तर परिस्थिती बदलणार पण आम्हाला काहीही करायला नको , मग आहेत शनी महाराज धडा शिकवायला!
सगळेच कसे अंबानी होणार . ज्याच्या त्याच्या प्राक्तना प्रमाणे आयुष्य आहे. तुलना नको आणि करायची तर स्वतःशी करा . आपल्या मानला , शरीराला पर्यायाने आयुष्याला वळण लावून शिस्त बद्ध करायची गरज आहे. सिंहावलोकन करा , विचार मनाला माझे काय चुकले ? मी कुठे कमी पडलो ? उत्तरे तुमची तुम्हाला मिळतील . जुने गेले तर नाविन्य येईल. शेवटी ते देणारे आहेत आणि ते द्यायलाच बसले आहेत . खूप काही करायचे आणि मिळवायचे आहे , घ्यायचे आहे आणि द्यायचेही आहे...
एकदा फक्त एकदाच त्या मोकळ्या नभाकडे मनापासून पहा आणि अगदी तसेच आपले मन मोकळे ढाकळे करा , अविस्मरणीय अनुभव आहे , नक्कीच घेवून बघा. येते वर्ष 2025 आपल्या सर्वांसाठी सुख समृद्धीचे , उत्तम आयु आरोग्याचे आणि इच्छित फलप्राप्तीचे जावूदे हीच स्वामी समर्थांच्या चरणी त्रिवार विनंती . मीच तुझा मान आणि मीच तुझी काया
संपर्क : 8104639230