यंदा १८ जून रोजी निर्जला एकादशी आहे. वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात. पण असे म्हणतात, की निर्जला एकादशी केली आणि उर्वरित २३ एकादशी केल्या नाहीतर तरी त्या २३ एकादशीचे पुण्य लाभते. म्हणून या एकादशीला महत्त्व असते. मात्र एवढे पुण्य एकत्र साठवायचे तर नियमही कठोर असणारच ना? निर्जला एकादशीला दोन्ही वेळी खायचे तर नाहीच, शिवाय पाणीदेखील प्यायचे नाही असा नियम आहे. त्यामागील कारण काय असावे, ते जाणून घेऊ.
निर्जला एकादशीच्या निमित्ताने आपल्या पूर्वजांनी पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हे व्रत ऐन पावसाळ्यात येत असल्याने, पावसाचे पाणी साठवा अन्यथा बिनापाण्याचे राहावे लागेल, असा संदेश जणू काही या व्रताच्या निमित्तानेशास्त्रकारांनी दिला आहे. म्हणून निर्जला एकादशीचे व्रत निर्जळी राहून अर्थात पाणी न पिता केले जाते. द्वादशीला कृष्णाला फुल वाहून या उपास सोडला जातो.
एकादशीचा उपास म्हणजे महिन्यातून दोन दिवस तोंडाला आणि पोटाला पूर्णवेळ विश्रांती देण्याचा दिवस असेही मानले जाते. अर्थात जे लोक फराळ न करता एकादशी करतात हे विधान त्यांना लागू होते, एकादशी अन दुप्पट खाशी वाल्यांना नाही! देवाचे नाव घेत विषय, विकार, वासना यातून मन अलिप्त करावे यासाठी दर महिन्याला विष्णू उपासनेच्या स्वरूपात एकादशीचा उपास, व्रत करा असे सांगितले जाते!
आरोग्य, शरीरशुद्धी, अपचन, रोगनाश, इ. साठी मनुष्यच नाही, तर पशूपक्षीही उपवास करतात. पशु किंवा पक्षी यांना अपचन झाले असता किंवा एखादा विकार, रोग झाला असता, ते कडकडीत उपास करतात. कोणताही खाद्यपदार्थ त्यांच्यापुढे ठेवला तरी ते स्पर्शही करत नाहीत. काही कुत्रे, गायी तर जन्मापासून आयुष्यभर विशिष्ट दिवशी उपवास करतात. यावरून मानवाने उपवासाचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे.
अतिरिक्त अनावश्यक अन्नेसेवनाच्या संदर्भाने वैदिक धर्मास उपवास, लंघन, अल्पाहार, लघुआहार, दुग्धाहार, फलाहार इ. कल्याणकारक योजना सांगितलेल्या आहेत. त्यांनाही आजच्या विज्ञान शाखांनी उपयुक्त, योग्य व शास्त्रीय अशी मान्यता दिली आहे. शरीरात दोन प्रकारची इंद्रिये/ अवयव आहेत. कधीही विश्रांती न घेता अखंड क्रियाशील असणारी आणि विश्रांती घेऊन कार्य करणारी.जन्मापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत अहोरात्र, अखंड, अविश्रांत क्रियाशील असणाऱ्या इंद्रियांमध्ये हृदय, रक्तवाहिन्या, फुप्फुसे, अन्नाशय, जठर, जठराग्नि, अन्ननलिका इ. चा अंतर्भाव होतो.
विश्रांती घेत कार्य करणारी इंद्रिये म्हणजे हात, पाय, नाक, कान, डोळे, जीभ, मन इ यातील अन्नाशय, जठर, जठराग्नि अखंड अहोरात्र कार्यरत असतो. कधीही विश्रांती घेत नाही. उपवासाने त्या अंशत: तरी विश्रांती दिली जाते. विश्रांती देण्याने त्या इंद्रियाची कार्यशक्ती, कार्यक्षमता यात वाढ होते व ती शरीराला, आरोग्याला उपयुक्त ठरते.
उपवासाचा मुख्य लाभ आहे, की अन्नाशयात र्जात न पचलेली, अशुद्ध द्रव्ये, अन्नघटक, त्यातून उत्पन्न होणारी विषारी द्रव्ये, विषाणू, रोगबीजे, रोगाणु, रोगजंतु इ. सर्व उपवासाने जणून जातात, नष्ट होतात. त्यामुळे रोगांचाही आपोआप व सहजच नाश होतो. त्यामुळे आजाराची कारणे कमी होतात आणि दीर्घायुष्य लाभते. म्हणून आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा एकभुक्त किंवा दोन्ही वेळचा उपास अवश्य करा, असे म्हटले जाते. उपासनेला उपासाची जोड मिळाली असता, तनामनाची शुद्धी होते. म्हणूनही अनेक भाविक महिन्यातून दोनदा येणाऱ्या एकादशीचा वर्षभर उपास करतात.