ज्येष्ठ मासातील एक महत्त्वाचे व्रत म्हणजे निर्जला एकादशी. आज १८ जून रोजी निर्जला एकादशी आहे. हिला 'भीमसेनी एकादशी' असेही म्हणतात. यासंबंधीची एक कथा आहे.
भीमाला भूक आवरत नसे. साहजिकच इच्छा असूनही तो उपवास करू शकत नव्हता. त्यामुळे खिन्न होऊन एके दिवशी त्याने आपली ही व्यथा व्यासांना सांगून उपाय विचारला. त्यावेळेस व्यासांनी त्याला `निर्जला एकादशी' चे व्रत करण्याचा सल्ला दिल. ही एकच एकादशी केल्याने इतर तेवीस एकादशी केल्याचे फळ मिळते. त्याप्रमाणे भीमाने ही एकादशी आनंदाने आणि भक्तीपूर्वक केली.
गुजरातमध्ये या एकादशीला भीम एकादशी असे दुसरे नावही प्रचलित आहे. तशीच आणखीन एक प्रथाही गुजराथी मंडळी पाळतात. ती म्हणजे अजीर्ण-अपचन या शारीरिक व्याधीपासून मुक्ती मिळावी, म्हणून या दिवशी उपास करतात. शिवाय भीमाचे नाव घेऊन दिवसभरात शक्य होईल तेवढ्या वेळा पोटावरून हात फिरवायचा. मात्र ही प्रथा केवळ गुजरातपुरतीच मर्यादित आहे. पण आपणही ती फॉलो करायला काहीच हरकत नाही. यंदाच्या निर्जला एकादशीला तुम्हीदेखील पोटावरून हात फिरवा, पण स्वतःच्याच! गमतीचा भाग सोडा,
पण या प्रथेवरुन नेमके काय सुचवायचे असेल?
अनेकदा अशी परिस्थिती येते जेव्हा अन्न पाणी मिळणे अवघड असते. यामागे कारण काहीही असू शकते. प्रवास, अन्न पाण्याचा अभाव, दारिद्र्य किंवा अन्य काहीही! अशा स्थितीत आपल्या तहान-भूकेवर नियंत्रण मिळण्याआधी मनावर नियंत्रण मिळवणे गरजेजे आहे. आपण आपल्या शरीराला तशी सवयच लावत नाही. तहान लागली की पाणी पितो, भूक लागली की घरातले डबे हुडकतो, मिळेल ते खातो, या सवयींमुळे मनावर आणि जिभेवर नियंत्रण राहिलेले नाही. आपल्या शरीराला प्रतिकूल परिस्थितीचीही सवय लावायला हवी, तरच परीक्षा काळात, संकट काळात आपला निभाव लागेल. यासाठी धर्मशास्त्राने योजलेला उपाय म्हणजे दर पंधरा दिवसांनी म्हणजे महिन्यातून दोनदा एकादशीचा उपास! हा उपास पूर्ण दिवस करून दुसऱ्या दिवशी विठ्ठल दर्शनानंतर पारणं फेडलं जातं. म्हणजेच उपास सोडला जातो. एरव्ही एकादशीला फळे खाण्याची, पाणी पिण्याची मुभा असते, पण निर्जला एकादशीला पाणीही पिऊ नयेत असे शास्त्र संकेत आहेत. खडतर परिश्रमाशिवाय अन्नाचे आणि परिस्थितीचे मोल कळणार नाहीत. आणि प्रश्न राहिला या प्रथेचा, तर आपण जसे भरल्या पोटावरून हात फिरवतो तसे रित्या पोटावरून समाधानाने हात फिरवायला अर्थात प्रतिकूल परिस्थितीतही आनंदाने, समाधानाने जगायला शिकले पाहिजे, हा त्यामागील हेतू असावा!