वय वाढत जाते तसे आपण केवळ शरीराने नाही तर मनानेही पोक्त होत जातो. किंबहुना आपण जितक्या लवकर मनाने पोक्त होतो, तितक्या वेगाने शरीराने पोक्त होत जातो. जे लोक मनाने तरुण राहतात ते ऐंशीच्या घरात पोहोचले तरी वृद्ध वाटत नाहीत. असा उत्साहाचा झरा बनायचे असेल तर मानसशास्त्राचा तोडगा तुम्हाला वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आजमावून पाहता येईल.
ज्यांचे वय पन्नाशीच्या पुढे आहे त्यांनी आपण आपल्या खऱ्या वयापेक्षा दहा बारा वर्षांनी लहान आहोत असा नित्य विचार करावा. वरकरणी तुम्हाला या उपायात काहीच तथ्य नाही असे वाटेल. परंतु जेव्हा तुम्ही मनापासून हा प्रयोग सुरू कराल, तेव्हा आपोआपच तुम्हाला त्याची प्रचिती येईल.
यामागील मानसशास्त्रीय कारण जाणून घेऊ. आपल्या आयुष्याचा सुमारे एक चतुर्थांश भाग झोपण्यात जातो. या झोपेच्या कालावधीत देहविस्मृती होते. आपल्या वयातून हा देह विस्मृतीचा काळ वजा केला, तर आपल्याला आताच्या वयापेक्षा दहा बारा वर्षे कमी वय मिळेल. हेच आपले खरे वय आहे, असे मानून त्यानुसार तुमच्या ध्येयाप्रती किंवा जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनाप्रती आचरण सुरू करा.
तसे केल्यामुळे कर्तबगारी करण्यास हुरूप येईल. देहावर आरोग्याचे तेज दिसू लागेल. वृद्धापकाळ सुरू होताच लोक हे जग कधीही सोडून जावे लागेल अशा आविर्भावात दु:खी, कष्टी राहू लागतात. सरकारने सेवानिवृत्त ठरवले की लोक आयुष्यातून निवृत्त झाल्यासारखे वागू लागतात. यावर हा उपाय प्रभावी ठरतो.
हा तोडगा आजच्या काळात तरुणांनाही अतिशय उपयुक्त ठरू शकतो. वाढलेले वय, अपूर्ण स्वप्ने, विवाहास विलंब, आर्थिक अडचणी आणि रोगराईमुळे त्रस्त झालेला आजचा तरुण प्रचंड नैराश्याचे जीवन जगत आहे. त्याला वाटते, जादुची कांडी फिरावी आणि मागची दहा वर्षे परत मिळावी. मानसशास्त्राने ही कांडी आपल्याच हातात असल्याचे म्हटले आहे.
मनामध्ये प्रचंड सामर्थ्य असते. आपण ते आजमावत नाही. परंतु एकदा का एखादी गोष्ट मनाने घेतली, की ध्येयपूर्ती झाल्याशिवाय मन स्वस्थ बसू देत नाही. अशा मनाला उभारी देण्यासाठी आपल्या वास्तवातील वयापेक्षा दहा वर्षे मागे जाण्याची आज्ञा द्यावी, जेणेकरून वाढत्या वयावर शरीरावर मात करता आली नाही, तरी मनाने आमरण चीरतरुण जगता येते.