आध्यात्माची वाट सोपी आहे, तेवढीच कठीण. सोपी कोणासाठी? ज्यांनी आध्यात्म म्हणजे काय, हे समजून घेतले, त्यांच्यासाठी आणि कठीण इतरांसाठी! कर्मकांड, उपास-तापास, रुढी, पूजापाठ, यज्ञयाग या गोष्टींमध्ये जे अडकतात, त्यांच्यासाठी आध्यात्माची वाट बिकट होत जाते. कारण, या गोष्टींमध्ये काही कमतरता राहिली, की त्याचाच विचार करत, ते स्वत:ला दोष देत बसतात. मग या गोष्टी निरर्थक आहेत का? तर नाही! त्यादेखील भगवंत प्राप्तीचे साधन आहे. परंतु, साधनाचा वापर साध्य मिळेपर्यंतच करायचा असतो. साधनाला साध्य समजण्याची चूक करू नये. जीन्याचा वापर खालच्या मजल्यावरून वर जाण्यासाठी किंवा वरून खाली येण्यासाठी होतो. मग जीना हे आपले ध्येय आहे का? तिथेच आपल्याला थांबायचे आहे का? नाही. त्याचा वापर करून पुढच्या मार्गाला लागायचे आहे. पण लक्षात कोण घेतो?
अनेकांना वाटते, प्रपंच सोडला तर परमार्थ होतो. अशाच विचाराने एक मनुष्य घर दार सोडून अरण्यात गेला. दिवसभर रानफळे खाऊन राहिला. नदीचे झुळूझुळू वाहणारे पाणी प्यायला. रात्री निवाऱ्याची गरज भासू लागली. श्वापदांची भीती वाटू लागली. अंधार गडद होऊ लागला. रात्र झाडावर काढली. दुसऱ्या दिवशी झावळ्या गोळा करून राहुटी बांधली. शेकोटी रचली. कंदमुळांवर गुजराण केली. रोज रोज फळे तोडायचा कंटाळा , म्हणून त्याने एकाच वेळी जास्त फळे गोळा करून राहुटीत ठेवली. उंदिर मामांना पत्ता लागला. त्यांचा बंदोबस्त करायला एक मांजर पाळली. मांजरीला रोज उंदिर कसे पुरवणार? तिला दूध मिळावे म्हणून गाय पाळली. गायीला चारा खाल्याशिवाय दूध कसे येणार? म्हणून तिला चरायला नेण्यासाठी जवळच्या गावातला माणूस नेमला. माणसाला मीठ भाकरीची सोय लावून देण्यासाठी त्याचे लग्न लावून दिले. या व्यापात परमार्थ बाजूला राहून प्रपंच पुन्हा मागे लागला. तो गृहस्थ पुन्हा घरी परतला. तात्पर्य, प्रपंच सोडून परमार्थ करता येत नाही. प्रपंचातील जबाबदाऱ्या झटकल्या, तरी देहाचा प्रपंच करावाच लागतो.
म्हणून संतांनी स्वत:च्या उदाहरणातून प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालून दिली. खुद्द माऊलीसुद्ध म्हणते,
म्हणोनि योगाचिया वाटा, जे निघाले गा सुभटा,तया दु:खाचिया वाटा, भागा आला।
योगसाधना ही सामान्य लोकांसाठी नाही. ती खडतर तपश्चर्या आहे. ती योगी, हटयोगीच करू जाणे. सामान्य माणसाने तो मार्ग अवलंबिला, तर त्याला हाल अपेष्टाच सहन कराव्या लागतील. मग त्याने परमार्थ कसा साधावा? तर केवळ नाम:स्मरणाने, सत्कार्याने, सेवेने! प्रपंचात राहून परमार्थ करायचा असता़े देवाला शोधायला अरण्यात जाऊ नका. तो आपल्यात आहे, आपल्या सभोवती आहे. त्याला ओळखा.
तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, `नलगे सायास जाणे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण!' परमार्थ मार्गातील आजवरील उदाहरणे पहा, संत सेना न्हावी, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नरहरी सोनार, संत सावता माळी यांनीसुद्धा प्रपंचातील जबाबदाऱ्या सांभाळून देवाला आपलेसे केलेच ना? अगदी समर्थ रामदासांनीदेखील संसार केला, तोही विश्वाचा! म्हणून आपणही प्रपंचात परमार्थ कसा साधता येईल, याचा प्रयत्न करूया.