एक राजा फार आजारी पडला. त्याला बरा करण्यासाठी लांबून-लांबून उपचार करणारे आले, पण त्याचा त्याला उपयोग झाला नाही. लोक दु:खी झाले. आता काय करावे?
अचानक एक साधू आला. त्याने राजाची तब्येत पाहिली. तो म्हणाला, `महाराज अगदी अल्पावधीत बरे होतील. मात्र, त्यांना घालायला एखादा अशा माणसाचा सदरा आणा, जो सुखी असेल.'
राजाचा दिवाण म्हणाला, 'महाराज, ही तर अतिशय सोपी गोष्ट आही.'
राजमहालातून थोड्या अंतरावर एक शेठजी राहत होता. दिवाण स्वत: तिकडे गेला. म्हणाला, `शेठजी, महाराजांना बरे करण्यासाठी एखाद्या सुखी माणसाचा सदरा हवा आहे. म्हणून आपला एखादा सदरा आम्हाला देता का?'
शेठजी म्हणाला, `दिवाण, एक काय, चार घेऊन जा. पण, एक गोष्ट सांगतो, दुनियेला सुखी दिसत असलो, तरी मी सुखी नाही.'
दिवाण दुसऱ्या शेठजींकडे गेला. त्यांच्याकडेही त्यांनी सदरा मागितला. ते शेठजी म्हणाले, `मी कसला सुखी, रोज धंद्यात चढ-उतार सुरू असतात. आता तर देवी लक्ष्मीसुद्धा माझ्यावर रागावली आहे की काय असे वाटू लागले आहे. माझे नशीब माझ्यावर रुसले आहे, मग मी कसा काय सुखी? उलट तुम्हालाच एका वेळी दोन जण सुखी दिसले, तर मझ्यासाठीही एक सदरा घेऊन या.
दिवाण चकित झाला. खाऊनपिऊन सुखी असलेले सधन कुटुंबातले लोक असे रडगगाणे गाऊ लागले, तर मध्यमवर्गीय आणि गरीबांनी काय बोलावे? आपल्याला वाटले होते, तेवढे हे सोपे काम नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणाले, त्याप्रमाणे `जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मन तूचि शोधून पाहे.' त्याप्रमाणे दिवाणजींनी आपला शोध सुरू ठेवला.
गावभर भटकंती करूनही एकही व्यक्ती सुखी असू नये, याचे दिवाणजींना आश्चर्य वाटले. खिन्न होऊन नदीमार्गे राजमहालाची वाट चालत येत असता, नदीच्या पैलतीरावरून बासरीचे मंजूळ सूर ऐकू आले. दिवाणाने विचार केला, शांत, आनंदी, सुखी माणसूच गाणी गाऊ शकतो, वाजवू शकतो, आनंद व्यक्त करू शकतो. याचा अर्थ आपला शोध संपला.
दिवाणजी एका नाविकाला सोबत घेऊन नदीच्या पैलतीरी जाऊ लागे. सायंकाळची वेळ, नदीचा शांत डोह, वल्हवाबरोबर पाण्यात उठणारे तरंग, पक्ष्यांनी धरलेली परतीची वाट, डोंगराआड झालेला सूर्यास्त आणि या सगळ्यात कानावर पडत असलेले बासरीचे मंजळ सूर ऐकून दिवाणजींचा दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. त्या व्यक्तीला भेटण्यास उत्सुक झालेले दिवाणजी पैलतीरावर जाऊन पोहोचले. एक तरुण स्वत:मध्ये मग्न होऊन बासरीवादन करत होता.
तो तरुण एका झाडाच्या आडोशाला बसला होता. चहूकडे अंधार होता. दिवाण तिथे गेले आणि त्याची स्वरसमाधी भंग करत म्हणाले. `युवका, तू भेटलास ते फार बरे झाले. तुझ्यासारखा सुखी माणूस आपल्या गावात कुठेच नाही. अशाच सुखी माणसाचा सदरा आपल्या राजाला मिळाला, तर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल, असे एका साधु महाराजांनी सांगितले आहे. देतोस का रे तुझा सदरा?'
तो युवक नम्रपणे म्हणाला, `महाराज नक्कीच दिला असता, परंतु माझ्याकडे सदराच काय, तर लज्जारक्षणापुरतेही कपडे नाहीत. मी एक भणंग कलाकार आहे. स्वांतसुखाय जगतोय. हा आत्मानंदाचा सदरा मी कमावला आहे, तो देता येण्यासारखा नाही. राजेसाहेबांना तो प्रयत्नपूर्वक मिळवावा लागेल.'
युवकाच्या बोलण्यामुळे दिवाणजींच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि डोळ्यासमोर चिंतातूर राजाचा चेहरा उभा राहिला. अतिविचाराने ग्रासलेली व्यक्ती आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करते आणि त्याच सोडवत बसते. याउलट, ज्याला सुखी व्हायचे, ती व्यक्ती आपल्या आवाक्यात आहेत, तेवढे प्रयत्न करते आणि बाकीचा भार देवावर सोपवून मोकळी होते. ही वृत्ती म्हणजेच सुखी माणसाचा सदरा. दिवाणजींना साधूंच्या बोलण्याचा रोख कळला. सुखी माणसाचा सदरा उसना मिळत नाही, तो कमवावा लागतो.
तुम्हीदेखील दु:खी असाल, तर दसऱ्यापासून केदार शिंदे दिग्दर्शित 'सुखी माणसाचा सदरा' या आगामी मालिकेत तुम्हाला सुखी माणसाचा सदरा गवसतो, का ते पहा!