रवींद्र वासुदेव गाडगीळ
आमच्या शिरपूर येथील दत्तमंदिरातील दर गुरुवारची संध्याकाळ, दिवेलागणीची वेळ, पंचपदी म्हणून भजन संपवून भक्त महिला भजनी मंडळ घरी जायला म्हणून उठू लागत तेंव्हा माझी आई सौ. विजया वासुदेव गाडगीळ, आपल्या गोड स्वरात हा झरा हमखास म्हणायची. ऐकायला अतिशय गोड असा हा झरा. खरेच दत्ताला तन मन धनाने विनवणी करून जात असे. की डोळ्यातून झर झर अश्रूंची धार लागे. आजही, आत्ताही.
“अनसूयेच्या सूता, दत्ता, तुझाची रे आसरा, सद्गुरू राया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा ।। कपट वेष धरूनी गुरु तुम्ही, अत्री घरी आले, पतीव्रतेच्या पुण्याईने बाळ तिथे झाले, भक्तासाठी जन्मही तुमचा, भक्ता उद्धारा ।। वांझेची ती भक्ति पाहुनी, दिधले संततीला, दुग्ध फोडिले भिक्षेसाठी, वृद्धची महीषाला, वेल उपटोनी कुंभ अर्पिला, भक्ताला द्विजवरा ।। अन्न अल्पची तुझ्या कृपेने, सहस्त्र द्विज जेविले, मूर्ख ब्राह्मणा भुवनेश्वरीला ज्ञान प्राप्त झाले, अष्टही रुपे दीपवाळीला, दाविले शिष्यवरा ।। अल्पमतीने पुष्प गुंफिले, साक्ष पटाया जरा, विनवू अनंता दर्शन द्यावे, जोडूनी आपले करा, अंत नका हो बघू, नका मुळी या हो या सत्वरा ।।
किती पवित्र भक्तीने ओथंबलेले शब्द, साधेच परंतु प्रभावी. गीतकार अनंत वैद्य यांनी अगदी मनापासून रचिले आहे जीव ओतून. त्याला गायले व संगीत दिले आहे ह.भ.प.कीर्तंनसूर्य श्री नारायणबुवा काणे यांनी. गुरुचरित्राचे सारच. सर्व अध्यायांची दखल घेतलेले अद्भुत मिश्रण. जणू दत्त बावनीच.
हेही वाचा : 'अधिक' मासाप्रमाणे 'केशव' मासातही अनुभवा विष्णूसहस्रनामाची महती!
मनाचा ठाव घेणारे हे काव्य. अवीट गोडीचा निर्मल श्रवणानंद. ते वातावरण पवित्र, मंगलमय होऊन जात असे. ही आळवणी अगदी मनापासून असल्याने वेगळी प्रार्थना करायलाच नको, एक दिव्य अनुभव. गुरूंच्या चरणाशी मन एकरूप होते. भक्तीने भरलेले व भारावलेले ते सुर. किती सुंदर ही स्वरपूजा. सर्वांग मोहरून आल्याशिवाय राहणार नाही. “कृतज्ञतेने भरल्या हृदया, शिष झुकवूनि ठेवितो पाया, अगणित वंदन तुज सद्गुरूराया”
परीक्षा ही ज्याची घ्यायची त्याच्या नकळत घ्यायची असते हे भान न विसरता आपण आपली ओळख पुसून वेगळ्याच वेशात येऊन वेगळीच अभूतपूर्व मागणी करून भोजन मागितलेत परंतु ते मागतांना भिक्षेकर्याच्या सवाईप्रमाणे आपण ” माते भिक्षांदेही” म्हणालात आणि फसलात. पतिव्रता व व्रतस्थ असलेल्या त्या पवित्र, शुद्ध सतचरित्र असलेल्या असूया नसलेल्या स्त्रिने आपले इंगित ओळखले आणि आपली ईच्छा पूर्ण केली आपल्याला बालके व स्वतःला माता समजून. नाहीतरी तिला मातृयोग हवाच होता. जो तुम्ही पुरवलात. आणि तिची बाळे झालात. ह्याच धोरणी वृत्तीला लोक चमत्कार म्हणतात आणि नतमस्तक होतात. संकटकाळी न डगमगता त्या संकटाला तोंड देणे म्हणजेच निभावून नेणे हे केवळ एक स्त्रिच करू जाणे. पुराणाचे वा इतिहासाचे दाखले तेच सांगतात. अशा वेळी पुरुष लटपटतात. स्त्री निभावून नेते.
ज्या भक्तांना गुरुचरित्र वाचण्याची आस आहे, पण वेळ नाही, त्यांनी केवळ एकदाच हा झरा म्हंटला तरी डोळ्यासमोरून सर्व अध्याय झरझर एखाद्या चित्रपटाप्रमाणे येतील आणि वाचण्याचे अपूर्व समाधान लाभेल. पुण्यही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
हेही वाचा : दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो, दत्त जयंती सप्ताहाला आजपासून प्रारंभ!