Makar Sankranti 2025: मकरसंक्रांती सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो. या दिवसापासून सूर्य मकरराशीत भ्रमण करू लागतो. तोपर्यंत जे दिवस थंडीने लहान झालेले असतात, ते संक्रांतीपासून तिळातिळाने वाढू लागतात. हा सण माघ शुद्ध सप्तमीपर्यंत साजरा केला जातो. मकरसंक्रात देशभरात विविध पद्धतीने साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सण निश्चित तारखेला येतो, असे म्हटले जाते. अन्य सण-उत्सव मराठी महिना आणि तिथीनुसार येतात, त्यामुळे दरवर्षी त्याच्या इंग्रजी कॅलेंडरनुसारच्या तारखांमध्ये बदल होत राहतो. पण, मकरसंक्रांतीची तारीख साधारण तीच असते.
मकरसंक्रात हा सण मूळ तीन दिवसांचा असून भोगी, संक्रांत आणि किक्रांत अशी या तीन दिवसांची नावे आहेत. दक्षिणेकडे याचवेळी पोंगल म्हणून जो सण साजरा होतो, तोही तीन दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी भोगी पोंगल, इंद्रपोंगल म्हणून तो इंद्रासाठी साजरा करतात. तर तिसऱ्या दिवशी मट्ट पोंगल हा गोमातेची-गोवत्साची पूजा करून साजरा केला जातो. गुजरातमध्ये संक्रातीच्या दिवशी आबालवृद्ध, स्त्री-पुरुष सारी मंडळी पहाटेपासून रात्रीपर्यंत पतंग उडविण्यात दंग असतात. उत्तर भारतात तर चुलीवर तवा ठेवत नाहीत. दक्षिणेत खीर केली जाते, तर कोकणात घावन घाटल्यासारखे पक्वान्न केले जाते. देशावर गुळाच्या पोळ्या केल्या जातात. वांग्याचे भरीत, तीळ घातलेली बाजरीची भाकरी असा बेतही हौसेने केला जातो. तामिळनाडूत भोगीला ‘भोगी पोंगल’ म्हणतात. त्या दिवशी तिथे इंद्रपूजा आणि आप्तेष्टांना गोडाचे जेवण हे प्रमुख सोपस्कार असतात. अंगणात सूर्याच्या साक्षीने चुलीवर दुधाची खीर करुन ती ऊतू जाऊ देतात.
गंगास्नानाला महत्त्व, महाकुंभमेळ्याचा अद्भूत योग
या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व असल्याने प्रयागक्षेत्री यात्रा भरते. भारताच्या पूर्व भागात बंगालमध्ये या दिवशी वास्तुदेवता म्हणून बांबूची पूजा केली जाते तसेच काकवीत तीळ घालून तिळुवा नावाचा पदार्थ करून तो एकमेकांना दिला जातो. उत्तरेत भावजय नणंदेला घरच्या आर्थिक परिस्थितीनुरूप वस्त्र, फळफळावळ, मिठाई, तीळ, डाळ, तांदूळ असे पदार्थ भेट म्हणून पाठविते. या प्रथेला संकरांत देना असे म्हणतात. या दिवशी घरच्या आणि गावच्या देवांना तीळ-तांदूळ वाहण्याची प्रथा आहे. भारतभर हा सण वेगवेगळ्या तऱ्हेने पण सारख्याच उत्साहाने साजरा केला जातो. त्याच्या तऱ्हा भिन्न असल्या तरीही उद्देश सुर्याब्द्द्ल कृतज्ञता भाव व्यक्त करणे; तसेच आपापसातील स्नेहभाव वृद्धींगत करणे हाच असतो. यंदा २०२५ ला मकरसंक्रातीपासून ते महाशिवरात्रीपर्यंत महाकुंभमेळ्याचा अद्भूत योग जुळून आला आहे.
१०० ते २०० वर्षांपूर्वी मकरसंक्रांतीची तारीख काय होती?
इसवी सन १६०० मध्ये ९ जानेवारी रोजी म्हणजेच पौष कृष्ण अष्टमी शके १५२१ रोजी मकरसंक्रात साजरी करण्यात आली होती. इसवी सन १७०० मध्ये १० जानेवारी म्हणजेच पौष कृष्ण षष्ठी शके १६२१ रोजी मकर संक्रांत होती. इसवी सन १८०० मध्ये ११ जानेवारी म्हणजेच पौष पौर्णिमा शके १७२१ रोजी मकरसंक्रांती होती. इसवी सन १८५० मध्ये १२ जानेवारी म्हणजेच पौष कृष्ण चतुर्दशी शके १७७१ रोजी मकरसंक्रांती होती. १९०० ते २१०० या कालावधीत मकरसंक्राती १३ जानेवारी, १४ जानेवारी आणि १५ जानेवारी येणार आहे. सन २०२५ मध्ये १४ जानेवारी रोजी आलेली मकर संक्रांत २०२७ ते २१०० या कालावधीत १५ जानेवारी रोजी असेल. विशेष म्हणजे यापूर्वीही काही वर्षे मकर संक्रांतीचा सण १५ जानेवारी रोजी होता.
आता पुढील काही शतकांनी मकर संक्रांत १८-२० जानेवारीला येणार आहे
इसवी सन २१५० मध्ये १६ जानेवारी म्हणजेच पौष कृष्ण तृतीया शके २०७१ रोजी मकर संक्रांत असेल. इसवी सन २२०० मध्ये १७ जानेवारी म्हणजेच पौष शुक्ल प्रतिपदा शके २१२१ मकरसंक्रांती असेल. इसवी सन २२५० मध्ये १८ जानेवारी म्हणजेच पौष शुक्ल चतुर्दशी शके २१७१ रोजी मकर संक्रांती असेल. इसवी सन २३०० मध्ये १९ जानेवारी पौष कृष्ण त्रयोदशी शके २२२१ रोजी मकरसंक्रांती असेल. इसवी सन २४०० मध्ये २० जानेवारी म्हणजेच पौष कृष्ण नवमी शके २३२१ रोजी मकर संक्रांत असेल. इसवी सन २५०० मध्ये २१ जानेवारी म्हणजेच पौष कृष्ण पंचमी शके २४२१ रोजी मकर संक्रांती असेल. इसवी सन २५५० ते २६०० मध्ये २२ जानेवारी आणि २३ जानेवारी म्हणजेच अनुक्रमे पौष शुक्ल तृतीया शके २४७१ आणि पौष कृष्ण द्वितीया शके २५२१ रोजी मकर संक्रांत येईल.
मकर संक्रांतीच्या तारखा पुढे जाण्याचे नेमके कारण काय?
दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंकमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.
दरम्यान, महाभारतात भीष्म हे शरशय्येवर उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्यादिवशी त्यांनी प्राणत्याग केला. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो. संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे. कधी तिचे वाहन हत्ती, कधी गाढव तर कधी डुक्कर असते. मात्र यामागे नेमका काय कार्यकारणभाव आहे हे मात्र नोंदविलेले दिसून येत नाही.