जंगली श्वापदांची भीती वाटणे स्वाभाविक आहे. म्हणून आपण प्राणी संग्रहालयात जाऊन त्यांना पाहतो. कारण ते बंद पिंजऱ्या आड असतात. अभयारण्यातही जिप्सीमध्ये बसून, स्वसंरक्षणासाठी हातात बंदुका घेऊन श्वापदांच्या दर्शनाला निघतात. मात्र प्राण्यांची नियमावली ठरलेली असते. ते उपाशी पोटी शिकार करतात. किंवा स्व संरक्षणासाठी डरकाळी फोडतात. मात्र उठ सूट कोणत्याही श्वापदाची शिकार करत नाहीत. न बोलता, न शिकवता ते नियम पाळतात, अंमलबजावणी करतात आणि स्वतः बरोबर दुसऱ्याच्या स्वातंत्र्यालाही महत्त्व देतात. हे सांगणारे एक उदाहरण बिबट्याच्या बाबतीत पाहता येईल. पाहूया ही सोशल मीडियावर व्हायरल झालेली गोष्ट...!
कर्नाटकातील कोंबरु अभयारण्याशेजारचे जे रेस्टहाऊस आहे तिथली घटना आहे. एक बिबट्या त्याचं सहजभक्ष्य असलेल्या कुत्र्याचा पाठलाग करत छलांग लगावत होता. कुत्रा टॉयलेट ला असलेल्या एका झरोक्यातून आत घुसला, बाहेरून टॉयलेटचा दरवाजा बंद होता. कुत्रा आत घुसला तसा बिबट्याही त्याच्या मागे घुसला आणि त्या टॉयलेटमध्ये अडकून पडला. कुत्रा बिबट्याला घाबरून एका कोपर्यात जाऊन बसला. भुंकण्याचीही त्याची हिम्मत झाली नाही. बिबट्या भुकेला असूनही त्याने त्या कुत्र्याला फाडले नाही, एका झेपेतच तो त्या कुत्र्याची चटणी करून आपले डिनर करू शकला असता पण ते दोन प्राणी एकेका कोपऱ्यात तब्बल बारा तास होते तरीही बिबट्याने कुत्र्याला कोणतीही इजा केली नाही.
वनविभागाने गुंगीच्या गनने बिबट्याला जेरबंद केला. आता प्रश्न असा आहे की भुकेल्या बिबट्याने सहजशक्य असताना त्या कुत्र्याला का फाडले नाही???तर वन्यजीव अभ्यासकांनी असं उत्तर दिलं की वन्यजीव आपल्या स्वातंत्र्याविषयी अत्यंत संवेदनशील असतात. आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतल्याची जाणीव होताच ते अत्यंत खोल दुःखात जाऊ शकतात, ते इतकं की त्यांची भूकेलाही विसरू शकतात. तिथे पोट भागवण्याची नैसर्गिक प्रेरणा मावळू लागते, इतकं मोठं पारतंत्र्यातचं दुःख आहे.