तुम्ही म्हणाल, मोबाईल येऊन अवघी दहा पंधरा वर्षे झाली, पण अंकशास्त्र तर त्याआधीपासून अस्तित्वात आहे, मग दोहोंचा परस्परसंबंध कसा काय? आपला प्रश्न उचित आहे. पण लक्षात घ्या, सद्यस्थितीत मनुष्याच्या मूलभूत गरजा कोणत्या, असे विचारले असता उत्तर मिळेल, अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल. त्यामुळे संपर्कांसाठी वापरला जाणारा मोबाईल क्रमांक अंकशास्त्रानुसार आपल्या वैयक्तिक विकासावर प्रभाव पाडतो.
अंकशास्त्रानुसार मोबाईल क्रमांकात ८ हा अंक कमीत कमी आल्यास उचित ठरते. ज्या लोकांच्या मोबाईल क्रमांकात ८ हा अंक दोनपेक्षा अधिक वेळा येतो, त्यांना अनावश्यक खर्च तसेच छोट्यामोठ्या अडचणींना वरचेवर सामोरे जावे लागते.
अंकशास्त्रानुसार ९ हा अंक शुभ मानला जातो. मोबाईल क्रमांकात ९ अंकाची होणारी पुनरावृत्ती मोबाईल धारकासाठी लाभदायक ठरते. परंतु, सर्वांसाठी नाही, तर लेखक, वास्तू शास्त्रज्ञ, अभियंता अशा निवडक व्यावसायिकांसाठी!
जर तुम्ही कलाक्षेत्राशी संबंधित असाल, जसे की गायक, वादक, संगीतकार, चित्रकार, शिल्पकार इ. तर तुम्ही ३ किंवा ४ हे अंक आपल्या मोबाईल क्रमांकात जास्त वेळा येतील, असा क्रमांक निवडला पाहिजे.
खेळाडू तसेच संरक्षण क्षेत्रातील लोकांनी २, ६ व ७ या अंकांना पसंती दिली पाहिजे. हे अंक त्यांच्यासाठी फलदायी ठरतील. तसेच शिक्षण क्षेत्र व राजकारण यांच्याशी संबंधित लोकांनी ३ किंवा ४ अंक निवडावा. या अंकांचा त्यांना निश्चित लाभ होईल.