हिंदू धर्मात एकादशीला अतिशय महत्त्व असते. वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात. अधिक मास आल्यास त्यात आणखी दोन एकादशींची भर पडून त्या २६ होतात. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात येणारी एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असते. मोक्ष देणारी म्हणून मोक्षदा एकादशी असे तिचे नाव आहे, म्हणून काही ठिकाणी ती वैकुंठ एकादशीही म्हटली जाते. नरदेहातून सुटका झाल्यावर आत्म्याला मोक्ष मिळावा, म्हणून यादिवशी भगवान विष्णू यांची आराधना केली जाते.
मोक्षदा एकादशीचे महत्त्व :पद्म पुराणात भगवान श्रीकृष्ण यांनी युधिष्ठिराला सांगितले, मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान महाविष्णूंना तुळशी मंजिरी, धूप, दीप अर्पण करून मनोभावे पूजा केल्यास सर्व पातकांचा नाश होतो. पातक नष्ट झाल्याने आपसुकच मोक्षाचे द्वार खुले होते. तसेच मोक्षदा एकादशीचे व्रत मनापासून केल्यास मृत्यूपश्चात केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या पितरांच्या आत्म्याला सद्गती मिळते. ही एकादशी कामधेनूप्रमाणे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते. मोक्षदा एकादशीची व्रत कथा ऐकणाऱ्या आणि वाचणाऱ्याला पुण्य प्राप्त होते.
मोक्षदा एकादशीची व्रतकथा :गोकुळ नामक नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात अनेक विद्वान होते. तो आपल्या प्रजेचे मुलांप्रमाणे संगोपन करत असे. एके रात्री राजाला स्वप्न पडले, की त्याचे वडील नरकात गेले आहेत.
दुसरे दिवशी उठल्यापासून राजा अस्वस्थ झाला. राज्यातील मान्यवर ऋषींसमोर त्याने आपले दु:ख कथन केले. आपल्या वडिलांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत, ही कल्पनाही आपणाला सहन होत नाही, असे त्याने सांगितले. ऋषींनी त्याला पर्वत ऋषींकडे शंका निरसन करण्यासाठी पाठवले. राजाने पर्वत ऋषींची भेट घेतली. त्यांनी ध्यानस्थ होऊन राजाच्या वडिलांचे प्रारब्ध पाहिले आणि राजाला भाकित केले. `राजा, तू पाहिलेले स्वप्न खरे आहे. तुझ्या वडिलांकडून अजाणतेपणी झालेल्या कुकर्माचे फलित म्हणून त्यांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत.'
राजाने विचारले, `गुरुदेव, त्यांच्या यातना कमी व्हाव्यात म्हणून काहीच उपाय नाही का?' तेव्हा गुरुंनी राजाला मोक्षदा एकादशीचे व्रत करायला सांगितले. गुरुंच्या सांगण्याप्रमाणे राजाने ते व्रत केले आणि त्याच्या वडिलांची कुकर्मातून मुक्तता झाली. त्यांनी स्वप्नात येऊन पुत्राचे आभार मानले. तेव्हापासून राजा दरवेळी हे व्रत श्रद्धेने करू लागला. अशी ही व्रत कथा मोक्षदा एकादशीचे महत्त्व अधोरेखित करत़े
मोक्षदा एकादशीची विविध नावे :मोक्षदा एकादशी विविध नावांनी ओळखली जाते. वैकुंठ एकादशी, मुक्कोटी एकादशी, मोक्षदा एकादशी, धनुर्मास एकादशी अशी तिची नावे आहेत. नावे अनेक असली, तरी एकादशीचे महत्त्व सारखेच आहे. पापनाश होऊन मोक्ष मिळण्यासाठी मोक्षदा एकादशीचा उपास जरूर करावा आणि भगवान महाविष्णूंची पूजा-अर्चा करावी. तसेच या दिवशी गीता जयंती असल्याने गीता पठणास सुरुवात करावी.
या विष्णूजपाचा करा १०८ वेळा जप
ओम नमो भगवते वासुदेवाय - हा अतिशय प्रभावी मंत्र आहे. विष्णू उपासनेत त्याचा समावेश आवर्जून करा.