आपण जेवायला बसण्या आधी रोज देवाला नैवेद्य दाखवतो. पण कधी कधी शिळे पदार्थ एवढे उरतात, की ते संपवण्यात ताजे अन्न केलेच जात नाही. अशा वेळी आपल्या पोटाची सोय होते, पण देवाच्या नैवेद्याची सोय काय करावी? असा प्रश्न पडत असेल तर जाणून घ्या उत्तर. सांगताहेत आळंदीचे समीर तुर्की!
नैवेद्यासाठी अमुक एक गोष्टच हवी असा देवाचा कधीही हट्ट नसतो. त्याला भक्ती भावाने दिलेली कोणतीही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचते. त्याचे पोट भरलेलेच आहे. पण आपण त्याला जेवू घालतो किंवा नैवद्य दाखवतो ते आपल्या समाधानासाठी. देवाने आपल्याकडे जेवावे, आशीर्वाद द्यावा, त्याची कृपादृष्टी पडून अन्नाचे प्रसादात रूपांतर व्हावे ही आपली इच्छा असते. म्हणून आपण नैवेद्य दाखवतो. पण कधी जर नैवेद्य दाखवण्यासाठी ताजे अन्न नसेल, त्यावेळेस काय करायचे ते पाहू.
>>एक छोटा खोबऱ्याचा तुकडा आणि त्यावर बसेल इतकाच गुळ आणि सहजपणे शक्य असेल तर भाजलेले, सालं काढून पाखडून घेतलेले चार दाणे इतकं तर प्रत्येक घरात असतंच असतं. दररोज नैवेद्य दाखवण्यासाठी हे सर्वात सोपं आणि अतिशय योग्य कॉम्बिनेशन आहे. गाणपत्य लोकांनी, विद्यार्थी आणि बुद्धिमान लोकांनी आवर्जून देवाला गुळखोबरं दाखवून तो प्रसाद ग्रहण करावा.
>>जर हेही नसेल तर थोडी खडीसाखर किंवा साखरफुटाणे आणून बंद बरणीत ठेवावेत, जेव्हा काहीच नसेल तेव्हा निःसंकोचपणे ह्याचा नैवेद्य देवाला दाखवावा. जर हे सुद्धा शक्य नसेल तर दोन चमचे साखर छोट्या वाटीत किंवा द्रोणात घेऊन त्याचा नैवेद्य देवाला दाखवावा.
>>अन्नाचा नैवेद्य सर्वोत्तम असतोच पण सर्वांना ते शक्य होऊच शकत नाही. अश्यावेळी नैवेद्याला काही नाही म्हणून देवपूजा करत नाही असं अगदी चुकूनही करू नका.
>>दुर्दैवाने वा कोणत्याही कारणाने अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झालीच, घरात काहीच शिल्लक राहिलं नाही तर अगदी खुशाल देवाला काहीही न दाखवता पूजा केलेली चालते. पण मी खात्रीशीर सांगतो.. की ज्यांच्याकडे नित्यनेमाने देवपूजा होते अश्या ठिकाणी अन्नान दशा होणं "अ श क्य" आहे. पण त्यासाठी तुम्ही व्यसन, व्यभिचार आणि जुगार ह्यांपासून पूर्णपणे अलिप्त असायला हवं!