२६ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ निरूपणार ह.भ. प. बाबामहाराज सातारकर यांना देवाज्ञा झाली. लौकिक रूपाने ते आता आपल्यात नसतील, तरी त्यांची कीर्तन प्रवचन इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. शिवाय त्यांनी जनमानसात पेरलेले विचार लोकांच्या मनात कायमस्वरूपी रुजले आहेत. आजही अनेक घरात दिवसाची सुरुवात बाबामहाराजांच्या सुस्वरात म्हटलेला हरिपाठ ऐकूनच होते. काय आहे हरिपाठाचे एवढे महत्त्व, तो रोज का म्हटला पाहिजे, त्यामुळे होणारे लाभ कोणकोणते ते सविस्तर जाणून घेऊ.
हरिपाठ म्हणजे काय?
हरी म्हणजे कृष्ण, पाठ म्हणजे अभ्यास आणि हरिपाठ म्हणजे हरिनामाच्या महिमेचे स्मरण! संत ज्ञानेश्वर माउलींनी हरिपाठ रचला. २८ अभंगाची रचना केली. या अभंगाचे रोज पठण करणे म्हणजे हरिपाठ करणे. माउली सांगतात, जे रोज हरिपाठ करतात त्यांना मोक्ष मिळतो, पितरांना मुक्ती मिळते, हे गूढ ज्ञान गुरु निवृत्ती नाथ यांनी मला सांगितले, म्हणून हरिपाठाची रचना केली आहे.
हरिपाठ केल्याने मिळते जपमाळ ओढल्याचे पुण्य
'देवाचिये द्वारी' या पहिल्या अभंगापासून ते 'विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान या नवव्या अभंगापर्यंत १४ वेळा हरीचा उच्चार होतो. पुढे 'त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी' या अभंगापासून हरिवंशपुराण, हरिनाम संकीर्तन या अभंगापासून २५ वेळा हरिनामाचा उच्चार होतो. 'वेदशास्त्र प्रमाण' या अभंगापासून 'ज्ञानदेव प्रमाण' या अभंगापर्यंत १६ वेळा हरिनामाचा उच्चार होतो. म्हणजे एकूण ५४ वेळा हरिनामाचा उच्चार होतो. तसेच दर अभंगानंतर 'हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा' या गजरात परत ५४ वेळा हरी नामाचा उच्चार होतो. अशाप्रकारे माउली आपल्याकडून नकळत १०८ वेळा हरिनामाचा उच्चार करून घेतात. म्हणजे जो कोणी रोज हरिनाम घेतात, हरिपाठ म्हणतात त्यांना एक जपमाळ ओढल्याचे पुण्य लाभते.
वारकरी समुदाय हरिपाठातला २८ वा अभंग म्हणत नाहीत कारण...
हरिपाठातील २८ वा अभंग फलश्रुतीसारखा असल्याने वारकरी पहिले २७ अभंग म्हणतात. २७ अभंग झाले की 'नाम संकीर्तन साधन पै सोपे' हा संतश्रेष्ठ तुकोबारायांचा अभंग म्हणतात. माउलींनी जो २८ वा अभंग लिहिलाय त्यात म्हटलं आहे की, 'जो कोणी आळंदीला इंद्रायणी काठी बसून नित्यनेमाने हरिनामाचे पठण करेल त्यांना गुरुकृपा लाभेल आणि गुरु त्या शिष्याला हरिपाठाचे उपदेश करतील. त्यामुळे साधकाच्या मनात हरिनामाबद्दल प्रेम निर्माण होईल.'
आपण हरिपाठ का म्हटला पाहिजे?
असावे स्वस्थचित्त एकाग्रे मन, उल्हासी करून स्मरण जीवी अंतकाळी तैसे संकटाचे वेळी, हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य
यात माउली हरिनाम कसं करावं आणि त्यामुळे काय लाभ होतो ते सांगतात. हरिनाम घेताना सुरुवातीला कंटाळा येतो, पण हळू हळू हरिनामाची गोडी लागते आणि ते उत्स्फूर्तपणे घेतले जाते. अशा साधकाचे भगवंत स्वतः रक्षण करतो. संत दामाजी, संत गोरा कुंभार, संत दसेना, संत सावता माळी या सगळ्यांच्या मदतीला भगवंत देव धावून गेला, तसा आपल्याही मदतीला येईल. त्यासाठी आपलाही पुण्यसंचय हवा. देव व्यवहारी जगातून आपल्याला ठरतो, शिवाय मृत्यूसमयी हरिनामाचा आठव होतो आणि विषयांचा संग सुटून मोक्ष प्राप्ती होते.
संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मंद मती केवितरे श्रीगुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तात्काळ ज्ञानदेव।।
या नामाची प्रतीची आजवर अनेक संतांनी घेतली आहे. म्हणून आपणही आळस सोडून प्रयत्नपूर्वक, निश्चयपूर्वक हरिपाठ केला तर भगवंत आपल्याला या भवतापातून नक्की सोडवेल.