निसर्गात उमटलेला ध्वनि जसा प्रतिध्वनी होऊन आपल्याला परत ऐकू येतो, त्यानुसार आपल्या वास्तुमध्ये उच्चारलेला शब्द प्रतिध्वनी होऊन आपल्यावर काम करतो. म्हणून वास्तूमध्ये बोलताना अतिशय सांभाळून बोला, कारण वास्तुपुरूष नेहमी तथास्तू म्हणत असतो, ही आपली पूर्वापार श्रद्धा आहे आणि तसे घडतेही. याबाबत वास्तुशास्त्रज्ञ काही उपाय सांगतात.
>> ज्या घरत सतत भांडणे होतात, नकारात्मक चर्चा होते, लोकांना नावे ठेवली जातात, त्या घरात नकारात्मक स्पंदने असतात. अशा वास्तूत आपल्याला जावेसेही वाटत नाही. यासाठी आपणही आपल्या घरात सकारात्मक स्पंदने निर्माण करण्यासाठी अपशब्द टाळले पाहिजेत.
>> सतत वाईट गोष्टी, उणिवा, अधुरी स्वप्न यांची चर्चा न करता सकारात्मक बोलत राहिले पाहिजे. जसे की, माझे सगळे चांगलेच होणार आहे, माझ्या घरात सुख शांती समृद्धी नांदणार आहे, माझ्या मुलांची प्रगती होणार आहे, आमचे दांपत्य जीवन आनंदात जाणार आहे, माझे आजार दूर होणार आहे, मी कर्जमुक्त होणार आहे, या सकारात्मक लहरींचा प्रभाव वास्तूवर होतो आणि या लहरी परिणामकारक ठरून घरातल्या सदस्यांना सकारात्मक ऊर्जा देतात.
>> घरात स्वामी मंत्र, रामरक्षा मंत्र, गायत्री मंत्र, गणेश मंत्र इ. मंत्रांचे, स्तोत्रांचे मोठ्याने पठण करावे त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वास्तूपुरुष आपल्याला सद्बुद्धी देऊन वाईट विचारांपासून दूर ठेवतो. तसेच बाजारात एक इलेक्ट्रॉनिक यंत्र मिळते. त्यावर मंत्रांचा अविरत जप सुरू असतो. ते यंत्र मंद आवाजात घरात लावून ठेवावे. आपल्याकडून नकळतपणे मंत्रजप होत राहतो आणि वाईट विचार दूर राहतात.
>> कोणीही कितीही वाईट वागले तरी त्याचे वाईट चिंतू नका. ज्याला त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळते. परंतु दुसऱ्याचे वाईट चिंतून त्याच्याबद्दल अपशब्द काढला, तर वास्तू तथास्तू म्हणून त्या परिणामांना आधी आपल्याला सामोरे जावे लागते. म्हणून कोणाबद्दल कधीही वाईट बोलूच नका.
>> ज्याप्रमाणे चेंडू एखाद्या भिंतीवर जोरात फेकून मारला, तर तो तितक्याच वेगाने आपटून मागे येतो, तीच बाब आपल्या तोंडून बाहेर पडलेल्या शब्दांच्या बाबतीत घडते. म्हणून सतत चांगलेच बोला. कधी काय घडेल, हे आपण सांगू शकत नाही. कधी कोणते शब्द शेवटचे ठरतील सांगता येत नाही. म्हणून आपल्या जीभेला चांगले बोलण्याची सवय आणि वळण लावून घ्या. >> परदेशातील वास्तुशास्रज्ञांनीदेखील वास्तू तथास्तू संकल्पनेला दुजोरा दिला आहे. नकारात्मक बोललात तर नकारात्मक घडेल, सकारात्मक बोला सकारात्मक घडेल. म्हणून घरात वादविवाद टाळा, संवाद साधा, एकमेकांना समजून घ्या, घरात आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा, वास्तूपुरुषाची कृपादृष्टी कायमस्वरूपी राहिल.