Palmistry: ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखांपैकी एक म्हणजे हस्तरेषा शास्त्र. ज्योतिषशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीचा अभ्यास केला जातो. तर, हस्तरेषा शास्त्रात त्या व्यक्तीच्या हाताचा अभ्यास केला जातो. हातावरील रेषा, हातावरील चढ-उतार, बोटांवरील चिन्हे, हातावरील चिन्हे यांचा अभ्यास करून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्ये, भविष्यातील घटनांचा अंदाज बांधता येऊ शकतो. नवग्रहांमध्ये राहु आणि केतु हे मायावी, क्रूर ग्रह मानले जातात. हे ग्रह कायम वक्री चलनाने गोचर करतात. तसेच राहु आणि केतु एकमेकांपासून नेहमी समसप्तक स्थानी असतात. राहु आणि केतुचे कुंडलीतील स्थान आणि त्यावरील प्रभाव महत्त्वाचा मानला जातो. हस्तरेषाशास्त्रात राहुची रेषा, तिचे तळहातावरील स्थान यांवरून काही गोष्टींचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
हस्तरेषा शास्त्रानुसार, आपल्या तळहातावरील रेषा किती मजबूत आहेत, ठळक आहेत, त्यानुसार कोणते योग जुळून येतात, याचीही माहिती या शास्त्राचा अभ्यास करून दिली जाऊ शकते. तळहातावरील रेषांचे स्थान, उगम, विलय एखाद्या व्यक्तीला धनवान होण्याचे योग आहेत का, याबाबत अंदाज बांधले जाऊ शकतात. आपणही आपल्या तळहातांवरील रेषा, चिन्हांची प्राथमिक माहिती घर बसल्या प्राप्त करू शकता. अभ्यासपूर्ण विवेचनासाठी ज्योतिषाचा सल्ला आवश्यक ठरतो. तळहातावरील हृदयरेषा, धनरेषा, जीवनरेषा महत्त्वाची मानली जाते. तसेच विविध ग्रहांचे उंचवटे, रेषा यालाही वेगळे महत्त्व असते. तळहातावर राहुरेषा कुठे असते? त्याचा प्रभाव कसा असतो? जाणून घेऊया...
तळहातावर राहुरेषा कुठे असते?
तळहातावरील मंगळ स्थानावरून जीवन आणि भाग्य रेषेला छेदून मस्तिष्क रेषेला स्पर्श करते, ती राहुरेषा असल्याचे सांगितले जाते. काही लोकांच्या तळहातावर मस्तिष्क रेषेला कापून ती रेषा हृदय रेषेला स्पर्श करते, असे सांगितले जाते. काहींच्या तळहातावर एकापेक्षा जास्त राहु रेषा असू शकतात, असे म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर राहुरेषा स्पष्ट आणि स्वच्छ असेल तर त्या व्यक्तीला देश-विदेशात खूप मान सन्मान मिळतो. अशा व्यक्तीला शेअर मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमध्ये चांगला नफा मिळतो.
परदेशात पैसा आणि प्रसिद्धी मिळवतात
हस्तरेषा शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या हातावर राहु रेषा अगदी स्पष्ट असेल किंवा त्यावर एखादे चिन्ह नसेल, तर अशा व्यक्तीला देश-विदेशात खूप यश मिळू शकते. कोणत्याही क्षेत्रात काम करत असले तरी, देशातच नाही तर परदेशातही पैसा आणि प्रसिद्धी मिळवतात. अशा लोकांना भौतिक सुख मिळते.
जीवनात भरपूर लाभ आणि संपत्ती मिळू शकते
हस्तरेषा शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर मस्तिष्क रेषा किंवा त्यातून निघालेली एखादी रेषा बुध स्थानापर्यंत जाऊन एखादे द्वीप किंवा त्रिकोण तयार होत असेल, तर ते अत्यंत शुभ मानले जाते. अशा लोकांना राजकारणात मोठे यश मिळते. हे लोक व्यावहारिक आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हे लोक शांत राहतात. या लोकांना जीवनात भरपूर लाभ आणि संपत्ती मिळू शकते.
एकाहून अधिक असू शकतात राहुरेषा
एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर एकापेक्षा जास्त राहुरेषा असू शकते. जर सर्व रेषा स्पष्ट असतील. तर तो शुभ संकेत मानला जातो. अशा लोकांना प्रशासकीय पदे मिळू शकतात. या लोकांना शेअर बाजार आणि लॉटरीतून फायदा मिळू शकतो, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.