प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. या दिवशी भक्त भगवान विष्णूची पूजा करतात आणि उपवास करतात. पापमोचनी या शब्दातच त्याचा अर्थ दडला आहे. आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे क्षालन व्हावे म्हणून हे व्रत केले जाते. यंदा ५ एप्रिल रोजी पापमोचनी एकादशी आहे. त्यानिमित्ताने दिलेले उपाय करा आणि पापमुक्त होण्याचा प्रयत्न करा.
पापमोचनी एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. एका वर्षात एकूण २४ एकादशी असतात. सध्या फाल्गुन मास सुरु असल्याने ही हिंदू वर्षातील शेवटची एकादशी आहे. जुने वर्ष संपून नवे वर्ष सुरु होण्याआधी आजवर झालेल्या पापांचा नाश होऊन नवीन वर्षाकडे सकारात्मकतेने वाटचाल व्हावी असेही या एकादशीचे प्रयोजन असेल. त्यादृष्टीने आपणही या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ते जाणून घेऊ.
एकादशी कोणतीही असो, त्यादिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याचा प्रघात आहे. त्यानुसार एकादशीचा उपास करून, सकाळी अंघोळ करून भगवान विष्णूंची पूजा करणे अपेक्षित असते. यादिवशी भगवान विष्णूंना दुधाचा, पाण्याचा, पंचामृताचा किंवा एक हजार तुळशीच्या पानांचा अभिषेक करता येतो. अभिषेकाच्या वेळी 'ओम नमो भागवते वासुदेवाय' हा मंत्र म्हणावा, ज्यामुळे विष्णुकृपा होण्यास मदत होते आणि पाप नष्ट होते.
पापमोचनी एकादशीचा शुभ मुहूर्त
हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी फाल्गुनमहिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी गुरुवार, ४ एप्रिल रोजी दुपारी ४:१६ मिनिटांनी सुरू होईल. आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार, ५ एप्रिल रोजी दुपारी १:२८ मिनिटांनी संपेल. उदयतिथी लक्षात घेऊन ५ एप्रिल रोजीच हे व्रत केले जाईल.
झेंडूच्या फुलांचा उपाय
ज्योतिषशास्त्रानुसार पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला पिवळे फूल अर्पण करावे. यासोबतच देवघर, स्वयंपाकघर आणि तुळशीच्या रोपाजवळ झेंडूचे फूल वाहावे. असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील. तसेच, तुमच्या घरातून आर्थिक समस्या कमी होतील. तसेच ज्या कामासाठी तुम्ही बराच काळ चिंतेत होता ते कामही पूर्ण होईल.
नऊ वातींचा दिवा लावा
पापमोचनी एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधिवत पूजा करावी. तसेच नऊ वातींचा दिवा लावावा, जेणेकरून आपल्यात पाप संपुष्टात येऊन नवविधा भक्ती जागृत होईल. यानंतर देवी लक्ष्मीचे कनकधारा स्तोत्र आणि श्री विष्णूंचे श्री हरी स्तोत्राचे पठण करा. असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल.