भाद्रपद शुद्ध एकादशीला परिवर्तनी एकादशी असे म्हणतात. या एकादशीचे वैशिष्ट्य असे, की या दिवशी श्रवण नक्षत्र असल्यास या एकादशीला 'विजया एकादशी' असेही म्हणतात. या योगावर एकादशीचे व्रत केल्यास आपल्या सर्व मनोरथांची पूर्तता होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या विजया एकादशीच्या मुहूर्तावर वामनाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुसऱ्या दिवशी अन्नदान करून या व्रताची पूर्तता केली जाते.
विष्णुभक्तांसाठी एकादशी हे व्रत म्हणजे एक पर्वणीच असते. त्यामुळे जे नेमाने सर्व एकादशी करतात, ते ही एकादशीदेखील करतात. ज्यांना उपास करणे शक्य नसते त्यांनी भगवान विष्णूची पूजा करावी. तसेच साधा सात्त्विक आहार घ्यावा. 'ऊँ नमो भगवते वासुदेवाय नम:' या मंत्राचा जप करावा. अथवा विष्णुसहस्त्रनामाचे श्रवण-पठण करावे.
असे असताना दिनदर्शिकेवर २५ आणि २६ या दोन्ही दिवशी एकादशी लिहून आल्याने उपास आणि उपासनेसाठी नेमका कोणता दिवस ग्राह्य धरावा असा भक्तांचा संभ्रम होऊ शकतो. पण गोंधळून जाण्याचे कारण नाही. एक तिथी दोन दिवसात विभागून आल्याने त्या दोन्ही दिवशी दिनदर्शिकेवर तिथीचा उल्लेख दिसतो. मात्र हिंदू पंचांगानुसार जी तिथी सूर्योदय पाहते, ती तिथी ग्राह्य धरली जाते. भले ती तिथी सूर्योदयाच्या काही घटकांनी संपणार असली तरी सूर्योदय पाहिल्याची मोहोर त्या तिथीवर उमटली जाते. म्हणून त्या तिथीवर एकादशी, संकष्टी चिन्ह दिलेली असतात. ती तिथी आपण व्रतासाठी ग्राह्य धरून त्या दिवशी उपास आणि उपासना केली पाहिजे.
मग स्मार्त एकादशी म्हणजे काय?
तर दशमी संपून एकादशी सुरू होताना त्या तिथीने सूर्योदय पाहिला नाही पण तो दिवस नव्या तिथीच्या नावे सुरू झाला असेल तर त्याला स्मार्त तसेच दर्श असा उल्लेख केला जातो. म्हणजे तिथी सुरू झाली पण तिथीशी संबंधित व्रत सूर्योदय पाहिलेल्या दिवशीच करायचे यासंबंधी ती सूचना असते. भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव त्यालाच भागवत एकादशी म्हणतात.
वैष्णव उदय तिथी मानली जाते. स्मार्त वाले जिथून तिथी सुरू झाली ती तिथी मानतात आणि व्रत सुरु करतात.
स्मार्त म्हणजे जे लोक वेंदांवर, श्रुती स्मृती, पुराण यांना प्रमाण मानतात, ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान आहे, ते स्मार्त एकादशी पाळतात. थोडक्यात ऋषी, मुनी तसेच कर्मकांड करणारे योगी स्मार्त एकादशी करतात. तर वैष्णव म्हणजे जे विष्णू भक्त आहेत, संसारी आहेत, जे सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात ते भागवत एकादशीचे व्रत करतात. म्हणून विष्णू भक्तांनी स्मार्त एकादशीला विष्णू पूजा करावी मात्र एकादशी व्रताचे पालन भागवत एकादशीला करावे असे शास्त्र सांगते.
त्यानुसार २५ सप्टेंबर रोजी परिवर्तनी एकादशीची सुरुवात झाली तरी २६ सप्टेंबर रोजी एकादशीचे व्रत केले जाईल याची भाविकांनी नोंद घ्यावी. आणि हेच अन्य तिथीच्या बाबतीतही लक्षात ठेवले तर आपला गोंधळ होणार नाही! मग ती एकादशी असो, चतुर्थी असो नाहीतर पौर्णिमा किंवा अमावस्या!