परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. अंतयार्मी स्थिर होणे, स्वस्थता येणे, सावधानता ठेवणे, दगदग सोडणे हाच परमार्थ होय. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ. देवाचे नाव घ्यावे, नीतीधमार्चे आचरण करावे, प्रेमाने वागावे आणि लोकांना मदत करावी यालाच परमात्मा म्हणतात. आहे त्यात समाधान मानणे, कोणाचाही द्वेष - मत्सर न करणे, सर्व भगवद्रूप पाहणे, निरभिमान राहाणे, सदोदित भजन व नामस्मरण करणे आणि संत-सज्जन-सद्गुरू यांच्याविषयी पूज्य भाव ठेवणे, या गोष्टी आचरणात आणणे हाच परमार्थ.
' मी नाही आणि तो म्हणजे भगवंत आहे ' किंवा ' मी तोच म्हणजे भगवंत आहे ' असे जाणणे आणि तसे कृतीत घडणें, हेच परमार्थाच्या तत्वज्ञानाचे सार असून सत्य वस्तू ओळखणे हा परमार्थ, तर असत्य वस्तूला सत्य मानून चालणे हा प्रपंच होय. परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचे नाव परमार्थ, तर विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच.' मी कर्ता आहे ' ही प्रपंचातली पहिली पायरी, ' तर राम कर्ता आहे ' ही परमार्थातील पहिली पायरी आहे. प्रपंचात जसा पैसा लागतो, तसा परमार्थांत भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही, तसे परमार्थातही भाव असल्याशिवाय होत नाही. वासनेने युक्त परमार्थ म्हणजेच प्रपंच, तर वासनारहीत प्रपंचसुध्दा परमार्थ होय. प्रपंचात प्रसिध्दीची जरूरी वाटते, तर परमार्थांत गुप्ततेची जरूरी लागते.काळजी, तळमळ आणि दु:खे ही प्रपंचाची लक्षणे आहेत, तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणे हे परमाथार्चे लक्षण आहे. परमार्थांत अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला, तर प्रपंचातील अहंकार दूर झाला तर तो परमार्थच होय. नाकासमोर चालणे हा परमार्थ आणि वारा येईल तशी पाठ देणे हा प्रपंच. प्रपंचात जितके कष्ट करतो त्या प्रमाणात मोबदला मिळत नाही, पण परमार्थांत तसे नाही. परमार्थ जितका जितका करावा तितके तितके समाधान अधिकाधिक असते. प्रपंच कठीण आहे कारण; त्यात मिळवायचे असते, तर परमार्थ सोपा आहे; कारण त्यात गमवायचे असते. मी पुष्कळांचा आहे हे मिळवणे, तर मी कोणाचाच नाही हे गमावणे. आपण स्वत:हाच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा आणि आपण दुस-याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा. प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे, तशी परमार्थांत श्रध्दा पाहिजे.
-जगदिश रायणेखामगाव.