३ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे. हा दिवस भगवान परशुराम यांची जयंती म्हणूनही साजरा केला जातो. कोकण, गोवा, केरळ प्रांतामध्ये भगवान परशुराम यांना मनोभावे पुजले जाते. मात्र आजही अनेक जण परशुराम यांनी आपल्याच आईचा वध केला होता या कारणास्तव त्यांचा दुःस्वास करतात. तसेच त्यांनी २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली होती, याबद्दलही अनेकांचा त्यांच्यावर रोष आहे. त्याचे निराकरण करण्यासाठी या दोन्ही घटनांमागची पार्श्वभूमी समजून घेऊ.
परशुराम यांच्या कथा रामायण आणि महाभारतातही सापडतात. त्यांचा जन्म अक्षय्य तृतीयेला झाला. त्यांचा जन्मकाळ हा सत्ययुग आणि त्रेतायुगाचा संधिकाल मानला जातो. म्हणून त्यांच्याशी निगडित कथा आपल्याला रामायण आणि महाभारत या दोन्ही पर्वात वाचायला मिळतात. आता लेखाच्या मूळ विषयावर लक्ष देऊया.
मातृभक्त परशुराम :परशुराम यांनी आपल्या आईचा वध केला ही घटना सर्वपरिचित आहे. मात्र, त्यामागचे कारण जाणून न घेता त्यांच्याबद्दल राग धरणे चुकीचे ठरेल. यापुढे जाऊन सांगावेसे वाटते, की भगवान परशुराम यांचा उल्लेख मातृ- पितृभक्त म्हणूनही केला जातो. जर त्यांनी अकारण वध केला असता, तर त्यांना ही उपाधी मिळाली नसती. म्हणून या कृतीमागचे कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे.
जमदग्नीपुत्र परशुराम :एखाद्याचा राग विकोपाला गेला तर आपण त्याला जमदग्नीचा अवतार म्हणतो. यावरून जमदग्नी ऋषींच्या क्रोधाबद्दल आपल्याला कल्पना येते. ते निर्विवादपणे विद्वान होते, परंतु त्यांचा रागावर अजिबात ताबा नव्हता. मात्र त्यांचे वैशिष्ट्य असे होते, की एका क्षणात त्यांचा राग विकोपाला जाई तर काही क्षणात राग निवळून ते शांत होत असत. मात्र क्रोधाचा क्षण सावरणे महाकठीण! ते आणि त्यांची पत्नी रेणुका यांना अक्षय्य तृतीयेच्या रात्री पुत्र झाला. त्याचे नाव राम ठेवले होते. तो देखील वडिलांप्रमाणे शीघ्र कोपी होता. त्याने तपश्चर्येने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले. तेव्हा शंकरांनी त्याला आपल्याजवळच परशु भेट दिला. तेव्हापासून या जमदग्नी पुत्राला परशुराम अशी ओळख मिळाली.
परशुरामांना आईचा वध करावा लागला तो प्रसंग : जमदग्नी ऋषींनी एका यज्ञाचे अनुष्ठान केले होते. त्यासाठी त्यांनी माता रेणुका यांनी नदीवरून पाणी घेऊन येण्यास सांगितले. रेणुका माता कलश घेऊन नदीवर गेली असता, तिथे स्वर्गातील गंधर्व आणि अप्सरा जलक्रीडा करत होते. ते मनोहारी दृश्य पाहताना रेणुका मातेचे देहभान हरपले आणि ती पाणी आश्रमात घेऊन जायचे आहे, हेच विसरली. जेव्हा ती भानावर आली, तेव्हा खूप उशीर झाला होता. तिला उशीर झाल्यामुळे जमदग्नी ऋषींना यज्ञ करता आला नाही. जमदग्नी ऋषींना क्रोधीत व्हायला तेवढे निमित्त पुरले...
जमदग्नी ऋषींची आज्ञा :रेणुका माता परतल्यावर जमदग्नी ऋषींनी मागचा पुढचा विचार न करता आपल्या मुलांना तिचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांची तीनही मुले मान खाली घालून उभी राहिली. मात्र परशुरामांनी वडिलांचा स्वभाव ओळखून तत्क्षणी कृती करायची असे ठरवले. त्यांना माहित होते, वडिलांचा राग फार काळ टिकणारा नाही. त्यामुळे ते शांत झाल्यावर मंत्र सामर्थ्याने आईला परत जिवंत करवून घेता येईल, याची त्यांना खात्री होती. जमदग्नी ऋषींकडे तेवढे सामर्थ्य होते. म्हणून मनोमन आईची क्षमा मागून त्यांनी कुऱ्हाड घेतली आणि आईचा शिरच्छेद करत पितृआज्ञा पूर्ण केली.
सर्वांना धक्का बसला:परशुरामांची कृती पाहून सर्वांनाच धक्का बसला. आपल्या पत्नीचा मृत देह पाहून जमदग्नी ऋषीदेखील भानावर आले. आपल्या आज्ञेबद्दल त्यांना वाईट वाटले तसेच आपल्या मुलाच्या पितृभक्तीला पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी परशुरामांना वर मागण्यास सांगितला. तेव्हा परशुराम म्हणाले, मला आई परत हवी आहे, तिला जिवंत करा. या वरदानामुळे जमदग्नी ऋषी संतुष्ट झाले आणि त्यांनी आपल्या मंत्र सामर्थ्याने रेणुका मातेला जीवित केले.
या कथेचे सार आपल्याला हे शिकवते, की महत्त्वाच्या कामांच्या वेळी प्रलोभनात अडकू नये. रागाच्या भरात वाट्टेल तो निर्णय घेऊ नये आणि कर्तव्याला जागताना परिस्थितीचा सारासार विचार अवश्य करावा. तर इथे आपल्या मनातील एक कलुषित ग्रह दूर झाला. आता पृथ्वी निःक्षत्रिय करण्याबाबत परशुरामांनी निर्णय का घेतला ते जाणून घेऊ.
एके दिवशी परशुराम बाहेर गेले असता, राजा सहस्रबाहू हैहयराज यांचे दोन्ही पुत्र कृतवीर अर्जुन आणि कार्तवीर्य अर्जुन त्यांच्या आश्रमात आले. त्यांनी त्यांच्या आश्रमातील कामधेनूचे अपहरण केले आणि जमदग्नी ऋषी साधनेत मग्न असताना त्यांच्यावर प्रहार करून त्यांना ठार केले. जमदग्नी ऋषींचे निधन झाल्यावर रेणुका मातेने सती जाण्याचा निर्णय घेतला आणि आपले आयुष्य संपवले. त्यामुळे एकाएक परशुरामाचे मातृ पितृ छत्र हरपले. ते अनाथ झाले. आश्रमात आल्यावर त्यांना हा सगळा प्रकार कळला आणि त्यांनी हा अत्याचार करणाऱ्या क्रूर राजा सहस्रबाहू आणि त्याच्या मुलांसकट समस्त दुष्ट क्षत्रियांचा नायनाट करायचा असे ठरवले.
त्यानुसार परशुरामांनी राजा सहस्रबाहू याच्याशी युद्ध करून त्याचा नायनाट केला आणि तत्कालीन इतर दुष्ट, राक्षसी शक्तींचेही पारिपत्य केले. मात्र क्रूर राजांच्या पुढच्या पिढ्याही त्यांच्याप्रमाणे दुष्ट निपजत असलेल्या पाहून परशुरामांनी तब्ब्ल २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. सीता स्वयंवराच्या वेळी जेव्हा त्यांची रामाची भेट झाली, तेव्हा त्यांना कळले की राम क्षत्रिय असले तरीदेखील ते विष्णूंचा अवतार आहेत आणि त्यांनी दुष्टांचा नायनाट करण्यासाठी अवतार घेतला आहे. त्यानंतर परशुरामांनी आपले कार्य थांबवले आणि तपश्चर्येला प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी थेट महाभारत काळात त्यांनी भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण यांना प्रशिक्षण दिल्याचा उल्लेख आढळतो.
यावरून लक्षात येते, की परशुराम यांचा समस्त क्षत्रियांवर राग नसून दुष्ट, दुराचारी क्षत्रियांवरच राग होता. कारण धर्माचे, संस्कृतीचे रक्षण करणे हा खरा क्षात्र धर्म असतो. तसे असूनही आपल्या शक्तीचा दुरुपयोग करणाऱ्यांना शिक्षा देणे हे कार्य भगवान परशुराम यांनी केले. कारण तेदेखील विष्णूंचे अवतारच होते. ते चिरंजीवी असल्याने अक्षय्य तृतीयेला त्यांची जन्मतिथी साजरी केली जाते. त्यालाच जयंती असेही म्हणतात. शब्द भेद झाल्याने जन्म दिवसाचा अर्थ बदलत नाही. त्यामुळे पुराणांचा अभ्यासपूर्ण विचार करून मनातील कलुषितपणा दूर करूया आणि आपल्या महान संस्कृतीचा आदर्श ठेवून ती अधिकाधिक उच्चतम होण्यावर भर देऊया!