शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला जाणारा, परंतु धर्म कार्यासाठी पुण्यदायी मानला जाणारा पौष मास संपत आला. २१ जानेवारी रोजी पौष अमावस्या आहे. ही अमावस्या पितरांचे स्मरण, पूजन या अर्थाने महत्त्वाची मानली जाते. ज्यांच्यामुळे आपले अस्तित्त्व, ओळख आहे, त्या पितरांप्रती कृतज्ञता मानण्याची ही चांगली संधी गमवू नये. त्यासाठी फार सोपस्कार करायचे नसून थोडासा नैवेद्य, दोन हस्तक आणि तिसरे मस्तक जोडून हा विधी पार पाडायचा आहे. याबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.
पौष मासातील पौर्णिमेप्रमाणेच अमावस्यादेखील धर्मकार्यासाठी पर्वणी मानली जाते. इतर अमावस्यांप्रमाणेच ह्या अमावस्येलाही पितृश्राद्ध, तर्पणादी विधी आवर्जून करावेत. या दिवशी केलेले पितृतर्पण, दान हे सारे थेट पितरलोकातील आपल्या पितरांपर्यंत पोहोचते अशी पूर्वापार श्रद्धा आहे.
वास्तविक सर्वच अमावस्या या पितृकार्यासाठी योग्य मानल्या जातात. आपल्या धर्मशास्त्रानुसार पितृतर्पण रोज करावे, असाही प्रघात आहे. काही मंडळी तो इमानेइतबारे पाळतातही. ज्यांना नित्यदिनी अथवा प्रत्येक अमावस्येला हे पितृश्राद्ध, तर्पण करणे शक्य होत नाही, त्यांनी निदान पौषी अमावस्येला ते न चुकता, आवर्जून करावे. पितरांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी सहसा चुकवू नये.
या अमावस्येला बुकल अमावस्या असे विशेष नाव आहे. या अमावस्येला दुधात तांदूळ घालून केलेली खीर पितरांसाठी वाढून ठेवावी. त्यामुळे पितर प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे.
आपल्या वंशजांबद्दल पितरांना आस्था, प्रेम असणारच. त्यात आपल्या माणसांनी, मुलाबाळांनी आपली आठवण ठेवून खास खीर करून ती आपल्याला अर्पण केली, हे बघून पितर प्रसन्न होणार हे उघडच आहे. आपल्यालाही एक वेगळे, शब्दात सांगता न येणारे समाधान या विधीमुळे होते. यात शंका नाही. त्यामुळे प्रत्येकाने शक्यतो हा बकुल अमावस्येचा गंभीर तितकाच गोड विधी करण्यास चुकू नये.