Paush Sankashti Chaturthi January 2024: वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ नववर्ष २०२४ सुरू झाले आहे. मराठी महिन्यातील पौष महिना सुरू आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. २९ जानेवारी २०२४ रोजी नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी अनेकविध शुभ योग जुळून येत असून, संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करावे? काही मान्यता, व्रतपूजाविधी आणि चंद्रोदय वेळा जाणून घ्या...
गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. संकष्ट चतुर्थीचे व्रत ईच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता, गणरायाची कृपादृष्टी लाभून ईच्छापूर्ती होते, असा भाविकांचा अनुभव आहे.
पौष संकष्ट चतुर्थी: २९ जानेवारी २०२४
पौष संकष्ट चतुर्थी प्रारंभ: रविवार, २८ जानेवारी २०२४ रोजी पहाटे ०६ वाजून १० मिनिटे.
पौष संकष्ट चतुर्थी सांगता: मंगळवार, ३० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ०८ वाजून ५३ मिनिटे.
सामान्यतः सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. मात्र, संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रदर्शनाला महत्त्व असून, हे प्रदोष काळी करायचे व्रत आहे. विशेष म्हणजे पौष वद्य चतुर्थी तिथी अहोरात्र आहे. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय, चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले गेले आहे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन झाल्यावर त्याला नमस्कार करून ताम्हनात अर्घ्य द्यावे. नंतर गणपतीला नैवेद्य दाखवून आरती करून उपास सोडावा. उपास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात.
संकष्ट चतुर्थी व्रताचरणाची पद्धत
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे.
विविध शहरांतील चंद्रोदय वेळ
शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
मुंबई | रात्रौ ०९ वाजून ३० मिनिटे |
ठाणे | रात्रौ ०९ वाजून २९ मिनिटे |
पुणे | रात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे |
रत्नागिरी | रात्रौ ०९ वाजून २९ मिनिटे |
कोल्हापूर | रात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे |
सातारा | रात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे |
नाशिक | रात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे |
अहमदनगर | रात्रौ ०९ वाजून २२ मिनिटे |
धुळे | रात्रौ ०९ वाजून २१ मिनिटे |
जळगाव | रात्रौ ०९ वाजून १८ मिनिटे |
वर्धा | रात्रौ ०९ वाजून ०६ मिनिटे |
यवतमाळ | रात्रौ ०९ वाजून ०८ मिनिटे |
बीड | रात्रौ ०९ वाजून १८ मिनिटे |
सांगली | रात्रौ ०९ वाजून २४ मिनिटे |
सावंतवाडी | रात्रौ ०९ वाजून २८ मिनिटे |
सोलापूर | रात्रौ ०९ वाजून १८ मिनिटे |
नागपूर | रात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे |
अमरावती | रात्रौ ०९ वाजून ०९ मिनिटे |
अकोला | रात्रौ ०९ वाजून १२ मिनिटे |
छत्रपती संभाजीनगर | रात्रौ ०९ वाजून २० मिनिटे |
भुसावळ | रात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे |
परभणी | रात्रौ ०९ वाजून १४ मिनिटे |
नांदेड | रात्रौ ०९ वाजून ११ मिनिटे |
धाराशीव | रात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे |
भंडारा | रात्रौ ०९ वाजून ०१ मिनिटे |
चंद्रपूर | रात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे |
बुलढाणा | रात्रौ ०९ वाजून १६ मिनिटे |
मालवण | रात्रौ ०९ वाजून २९ मिनिटे |
पणजी | रात्रौ ०९ वाजून २८ मिनिटे |
बेळगाव | रात्रौ ०९ वाजून २५ मिनिटे |
इंदौर | रात्रौ ०९ वाजून १६ मिनिटे |
ग्वाल्हेर | रात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे |