आपण आपल्या पदाचा राजीनामा देतो किंवा मोठ्या सुटीवर जातो, तेव्हा आपल्या जागी नियुक्त केलेल्या माणसाच्या हाती पदभार सोपवावा लागतो. त्याला सर्व कामांचा अंदाज आणि आवश्यक कागपत्रे सोपवून मगच आपल्याला निरोप घेता येतो. त्याचप्रमाणे येत्या चार महिन्यात भगवान महाविष्णू शेषसागरात विश्रांतीसाठी जाताना भगवान महादेवांकडे सृष्टीच्या रक्षणाची, कामकाजाची सर्व सूत्र सोपवून जातात. म्हणून तर विश्वाचा समतोल टिकून राहतो. अन्यथा सगळ्याच देवांनी एकदम विश्रांती घ्यायची ठरवली असती, तर काय झाले असते याची कल्पनाच न केलेली बरी...!
२० जुलै रोजी आषाढी एकादशी होती. त्यालाच देवशयनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू शेषसागरात विश्रांती घेतात, ते थेट चार महिन्यांनंतर कार्तिकी एकादशीला उठतात. त्याला देवउठनी एकादशी म्हणतात. ही विश्रांती देवाने स्वेच्छेने घेतलेली नसून त्याच्या प्रिय भक्तांनी त्याला सक्तीची विश्रांती दिली आहे. जगाचा सांभाळ करणाऱ्या भगवंताला विश्रांती मिळाली, तरच पुढचे सबंध वर्ष तो उत्साहाने सर्व जबाबदाऱ्या पूर्ववत सांभाळू शकेल, हा भोळा भाव त्यामागे आहे. भक्ताचा हा आग्रह भगवंतांनी मोडला नाही, परंतु आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत भगवान विष्णूंनी आपल्या विश्रांतीच्या कार्यकाळात भगवान शंकर यांच्याकडे पदभार सोपवून जगाचे व्यवस्थापन सांभाळावे अशी विनंती केली.
या चार महिन्यात भगवान महादेवांच्या हाती सूत्रे आल्यावर भक्तही त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात. आपल्याकडून कोणती चूक होऊ नये म्हणून शिवशंकराची पूजा अर्चा करतात. विशेषत: श्रावण मास तर महादेवाच्या आराधनेसाठी समर्पित केलेला आहे. या चार महिन्यांत अनेक भाविक तीर्थक्षेत्री जाऊन देवाचे दर्शन घेतात. दानधर्म करतात.
याच काळात भगवान शंकरांपाठोपाठ भाद्रपदात गणपती बाप्पा आणि अश्विन मासात देवी माता आपल्या घरी पाहुणचाराला येते. त्यांच्या येण्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. भगवान महादेवाला त्यांच्या कार्यात तेवढीच मदत मिळते. देवीचा दहा दिवसांचा जागर झाला, की पितृपक्षाचे पंधरा दिवस पितरांच्या सेवेत जातात. त्यातून बाहेर येतो ना येतो लगेच दिवाळीची लगबग सुरू होते. अशी सर्व व्यवस्था लावलेली असल्यामुळे वाईट विचारांना थारा मिळतच नाही. तरी न जाणो, अजाणतेपणी आपल्या हातून काही पाप घडू नये म्हणून व्रत वैकल्यांची जोड दिली जाते.
तोवर कार्तिक मास उजाडतो. भगवान विष्णूंचा विश्रांती काळ संपतो. ते पुनश्च पदभार स्वीकारण्यासाठी सज्ज होतात. तेव्हा आनंदाच्या भरात सर्व भाविक माता तुळशीशी त्यांचा विवाह लावून त्यांना वैयक्तिक तसेच विश्वाच्या संसाराच्या जबाबदारीत अडकवून देतात.