'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर' ही सुप्रसिद्ध गाण्याची ओळ शनी देवाला तंतोतंत लागू होते. कारण ते प्रत्येकाच्या कर्माचा अचूक हिशोब ठेवतात व कर्मानुसार प्रत्येकाला फळ देतात. प्रत्येकाला आपले भले बुरे कर्म माहीत असते, त्यामुळे काय फळ मिळेल याची भीती प्रत्येकाला वाटते. केवळ दानव, मानवच नाही तर देवसुद्धा शनी देवाच्या नावाने भयकंपित होत असत.
शनी देवाचा फेरा ठरलेला असल्याने ते आपल्या नियोजित वेळी नियोजित ठिकाणी पोहोचतात. असेच ते एकदा त्रिदेवांची भेट घेण्यासाठी निघाले. सर्वप्रथम ते ब्रह्म देवाकडे आहे. ब्रह्म देवाने बसल्या जागी आपले कमळ मिटून घेतले. मग शनी देव क्षीरसागरात आले. तिथे भगवान विष्णू पाण्यात जाऊन लपले. त्यांचीही भेट घडली नाही म्हणून शनी देव कैलासात पोहोचले. तिथेही महादेव गायब होते. ते चक्क कैलासाच्या पायथ्याशी जाऊन लपले. शनी देव रागावले आणि म्हणाले, माझ्या येण्याच्या भीतीने पळ काढणाऱ्या त्रिदेवांनो तुम्ही मला कितीही चुकवण्याचा प्रयत्न केलात तरी माझ्यामुळे चार क्षण का होईना तुम्हाला माझा जाच सहन करावा लागला. हाच माझा प्रभाव! असे लपून बसण्यापेक्षा तुम्ही माझे स्वागत केले असते, तर तेवढाही त्रास सहन करावा लागला नसता.
शनी देव क्रुद्ध होऊन जात असताना वाटेत हनुमान भेटले. हनुमंतांनी हात जोडून सांगितले, 'शनी महाराज तुम्ही माझ्या घरी चला. मी करतो तुमचा पाहुणचार. अजिबात वाईट वाटून घेऊ नका. हे ऐकताच शनी देव चपापले आणि म्हणाले, 'हनुमंता सगळे जण मला टाळतात, पण तू माझे स्वागत केलेस हे पाहून मी धन्य झालो. मी तुला मैत्रीचा प्रस्ताव देतो. हनुमंताने आनंदाने शनी देवाची मैत्री स्वीकारली आणि शनी देवाला आलिंगन दिले. त्यावेळेस शनी देवाने वचन दिले, 'जो कोणी भक्त मनोभावे हनुमंताची उपासना करेल त्याला माझा त्रास होणार नाही, मात्र जो हनुमंताचा अपमान करेल त्याचा पिच्छा मी सोडणार नाही!'
तेव्हापासून हनुमंत आणि शनी देव यांची जोडी जमली आणि शनी प्रकोपापासून मुक्तता मिळवण्यासाठी हनुमंत उपासनेची सोय मिळाली. म्हणून आजही आपण पाहतो, की शनी मंदिर आणि हनुमान मंदिर एकत्र किंवा जवळपास असतात. हे लक्षात ठेवता आपणही त्यांच्या उपासनेत कुचराई करता कामा नये!
त्यामुळे आपणही हनुमंताचा आदर्श बाळगावा, आपले काम प्रामाणिक पणे करावे, येणाऱ्या प्रसंगाला हसत मुखाने सामोरे जावे, जेणेकरून शनी देव तुमच्या कष्टाच, प्रामाणिकपणाचा यथायोग्य फळ निश्चित देतील.