महालय याचे अपभ्रष्ट रूप महाळ असे होते. महालयाचा काल भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत म्हणजे जवळ दीड ते पावणे दोन महिन्यांचा असतो. महालय हादेखील श्राद्धविधीच आहे. नेहमीचे प्रतिसांवत्सरिक श्राद्ध आणि महालय यातील मुख्य फरक म्हणजे प्रतिसांवत्सरिक श्राद्ध हे एकाच मृत व्यक्तीला उद्देशून असते तर महालय हा आपल्या संबंधातील सर्व मृत व्यक्तींना उद्देशून असतो. म्हणजेच दुसऱ्या भाषेत प्रतिसांवत्सरिक श्राद्ध हे ठराविक पार्वणास (ठराविक व्यक्तीस) उद्देशून असते तर महालय सर्व पार्वणांना (दिवंगत नातेवाईक) उद्देशून असतो.
श्राद्धकर्त्याने आपल्याजवळ एका जाड पुठ्ठ्यावर पावर्णांची यादी लिहून ती आपल्या देव्हाऱ्यात ठेवावी. वास्तविक ब्रह्मकर्मातील पितृतर्पणात या यादीतील सर्व पार्वणांचा उच्चार दररोज करावा लागत असल्यामुळे पूर्वी अशी यादी लिहून ठेवण्याची प्रथा नव्हती. हल्ली पंचमहायज्ञाचा लोप होत असल्यामुळे अशा यादीची गरज भासते. यामध्ये पितृत्रयी (वडील, आजोबा, पणजोबा), मातृत्रयी (आई, आजी, पणजी), मातामहत्रयी (आईचे वडील, आजोबा, पणजोबा) अशा मुख्य तीन त्रयी आहेत. ज्यांची पत्नी जिवंत नसेल त्या पार्वणांचा सपत्नीक म्हणून उच्चार करावा.
याखेरीज पत्नी, पुत्रादिक, चुलते, मामा, भाऊ, आत्या, मावशी, बहीण, सासरे इ. पार्वणे आहेत. त्या त्या पावर्णांची पत्नी हयात नसेल तर सपत्नीक व पती हयात नसेल तर सभर्तृका असा नामोच्चार करावा.
Pitru Paksha 2021 : पितृपक्षात श्राद्धविधीबरोबरच 'या' आठ गोष्टींचे पालन अवश्य करा
थोडक्यात आपण दरवर्षी ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्राद्धविधी करतो, त्याला महालय म्हणतात आणि ज्यांच्या नावे करतो त्यांना पावर्ण म्हणतात. सद्यस्थितीत लोक वेळे अभावी आणि श्राद्धतिथी माहित नसल्यास किंवा लक्षात नसल्यास सकल दिवंगत व्यक्तींचे स्मरण करून सर्वपित्री अमावस्येला महालय करून मोकळे होतात. या सर्वात विधींइतकेच महत्त्व श्रद्धेला आहे. कारण हा केवळ उपचार नाही, तर दिवंगत व्यक्तींप्रती आदर, आत्मियता आणि आपुलकी दर्शवणारा भाव आहे. श्रद्धा असेल तरच श्राद्ध!