पितरांना संतुष्ट करण्यासाठी केलेला विधी म्हणजे श्राद्ध! श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निष्पन्न झाला आहे. ब्रह्मपुराणाच्या श्राद्ध प्रकरणात श्राद्धाची व्याख्या दिली आहे, ती अशी-
देशे काले च पात्रे च श्रद्धया विधिना च यत्पितृनुद्दिध्य विप्रेभ्यो दत्तं श्राद्धुदाहृतम्
याचा अर्थ असा, की देश, काल आणि पात्र यांना अनुलक्षून श्रद्धा व विधी यांनी युक्त असे पितरांना उद्देशून केलेले दान याला श्राद्ध म्हणावे. ते कोणी व कधी निर्माण केले याची माहिती ब्रह्मांडपुराणात मिळते.
Pitru Paksha 2021 : श्राद्ध आणि महालय यातील मुख्य फरक काय ते जाणून घ्या!
श्राद्ध विधीची मूळ कल्पना ब्रह्मदेवाचा पुत्र अत्रिमुनी यांची आहे. त्यांच्या वंशात दत्तात्रेय झाला. त्याचा पुत्र निमी, त्याचा पुत्र श्रीमान. श्रीमानाने सहस्त्र वर्षे तप केल्यानंतर कालधर्मास अनुसरून तो मरण पावला. तेव्हा निमीने पुत्राचे यथाविधी उत्तरकार्य केले. पण पित्यासाठी सांगितलेला विधी पुत्राकडे लावला, म्हणून निमीपुढे प्रश्न उभा राहिला, की हा नवीन प्रकार काढून आपण धर्मसंकर तर केला नाही ना? असे मनात येताच त्याला वाईट वाटले.
पूर्वी ऋषीमुनींनी आचरलेली गोष्ट केली असती, तरी त्याच्या मनास चैन पडेना. तेव्हा त्याने आपला मूळ पुरुष जो अत्रि, त्याचे स्मरण केले. स्मरण करताच अत्रिमुनि तेथे आला व त्याने निमी पुत्रशोकाने कृश झाला, हे पाहून गोष शब्दांनी त्याचे सांत्वन केले. `निमी तू जो श्राद्धविधी योजलास, तो म्हणजे ब्रह्मदेवाने घालून दिलेला धर्मविधीच होय आणि त्याचेच तू आचरण केले आहेस. आता मी तुला ब्रह्मदेवाने घालून दिलेला श्राद्धविधी सांगतो.' असे सांगून त्याने श्राद्धविधी सांगितला. तो रूढ आचार आजही चालू आहे.
श्राद्धप्रथा ही फार प्राचीन आहे. पितरांच्या, म्हणजे मृतात्म्यांच्या ठायी पुढीलांचे भले बुरे करण्याचे सामथ्र्य असते, या कल्पनेतून श्राद्ध कल्पनेचा उगम झाला. वैदिक वाङमयात पितर हा शब्द पिता, पितामह व प्रपितामह म्हणजेच वडील, आजोबा व पणजोबा या अर्थाने वापरला जातो. मनूने सर्वप्रथ श्राद्धक्रिया सुरू केली, असे ब्रह्मांडपुराणात म्हटले आहे. म्हणूनच विष्णू व वायु पुराणाध्ये मनूला श्राद्धदेव म्हटले आहे. प्राचीन काळी श्राद्धाला पिंड पितृयज्ञ हे नाव होते.