सध्या पितृपक्ष सुरू आहे. यात घरोघरी श्राद्ध होत असते. श्रद्धेने केले जाते, ते श्राद्ध. यामध्ये कुश (दर्भ), तीळ व तुळशीचे अनन्य साधारण महत्त्व आहे. याशिवाय तर्पण, पिंडप्रदान पूर्णत्वाला जाऊच शकत नाही.
श्राद्धामध्ये दर्भाला फार महत्त्व आहे. त्याचे बोटात घालण्यासाठी पवित्रक करतात, चट म्हणून वापरतात आणि पिंड प्रदान करताना खाली अंथरतात. याशिवाय श्राद्ध करताना दर्भासनही सांगितलेले आहे. तसेच इतरही अनेक कामांसाठी दर्भ वापरले जातात. याची उत्पत्ती भगवान विष्णूंच्या रोमापासून झाल्याचे मानले जाते. दर्भाचे पवित्रक धारण करून तर्पण केल्यास पितरांची आत्मा वैकुंठाला जाते, असे सांगितले जाते. वास्तविक पाहता आपल्याकडे कोणत्याही प्रकारच्या पूजेसाठी दर्भ, पवित्रक वापरावेच लागतात. परंतु त्यात खंड पडून ते आता फक्त श्राद्धापुरतेच उरले आहेत. त्यातही कोणत्या श्राद्धाला किती दर्भांचे पवित्रक, चट वापरावेत, याचे स्वतंत्र नियम आहेत.
श्राद्धामध्ये तीळ किंवा काळे तीळ यांचेही महत्त्व आहे. तीळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या घामापासून झाल्याचे मानले जाते. पिंडप्रदानाच्या वेळी तीळाचा वापर केल्यास पितरांना मोक्ष मिळतो. काळे तीळ वापरणे अधिक योग्य समजले जाते. काही ठिकाणी पिंड तयार करताना भाताबरोबरच त्यात वडे, खीर, काळे तीळ मिसळले जातात.
नेहमी ऑक्सिजनचे उत्सर्जन करणाऱ्या तुळशीशिवाय श्राद्ध पूर्ण होऊ शकत नाही. तुळस आणि दर्भ कधीच अपवित्र होत नाहीत. त्यामुळे ते एकदा वापरले तरी पुन्हा वापरता येऊ शकतात. तुळशीच्या गंधाने पितर प्रसन्न होतात, अशी मान्यता असल्यामुळे पितृपक्षात याचा वापर जरूर करावा, असे सांगितले जाते.
श्राद्धाच्या वेळी ब्राह्मण भोजनाच्या आधी त्यांचे पाय धुणे पुण्यकारक समजले जाते. उभे राहून ब्राह्मणांचे पाय धुतल्यास पितर नाराज होतात. त्यामुळे श्राद्धकर्त्याने बसून पाय धुवावेत. पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी अनेक वस्तूंचे दानही या कालावधीत करण्यास सांगितले आहे. यामध्ये गाय, भूमी, तीळ, सोने, चांदी, तूप, गूळ, वस्त्र, धान्य, मीठ या दशदानांचे महत्त्व अधिक मानले जाते.
- संकलक: सुमंत अयाचित, लोकमत