पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृ पक्षात तर्पण-श्राद्ध केले जाते. पूर्वजांचे स्मरण केल्याने त्यांची कृपादृष्टी लाभते आणि आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होऊन आपल्या नोकरी, व्यवसायात, शिक्षणात वृद्धी होते. परंतु पितर आपल्यावर प्रसन्न आहेत की नाही, हे ओळखायचे कसे, याचा विचार करत असाल, तर पुढे दिलेली शुभ चिन्हे पितरांच्या कृपाशिर्वादाची तुम्हाला साक्ष पटवून देतील.
पितृपक्षात मिळणारे संकेत :
>>जर कावळ्यासाठी, कुत्र्यांसाठी, गायींसाठी ठेवलेले अन्न ते क्षणाचाही विलंब न करता खात असतील, तर हे लक्षण आहे की पूर्वज तुमच्यावर समाधानी आहेत आणि ते तुम्ही दिलेले अन्न स्वीकारत आहेत. तसेच तुमची सेवा त्यांच्यापर्यंत यथायोग्य पोहोचत आहे.
>>पितृ पक्षाच्या वेळी घराच्या छतावर येणारे आणि खिडकीत डोकावणारे कावळे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. अन्यथा अनेक घरात असाही अनुभव येतो, की नेहमी येणारे कावळे पितृपक्षात घराकडे फिरकत सुद्धा नाहीत. मात्र तुमचे घर त्याला अपवाद असेल तर तुमची श्रद्धा आणि श्राद्ध याचे ते फलित आहे असे समजायला हरकत नाही. हे एकार्थी भरभराटीचे लक्षण आहे.
>>कावळा आपल्या चोचीतून काड्या, पाने नेताना दिसला, तर ते पैसे मिळण्याचेही लक्षण आहे. या व्यतिरिक्त, जर कावळा फुले आणि पाने आणताना दिसला, तर याचा अर्थ असा की तुम्ही पूर्वजांकडून जे काही मागाल, ती इच्छा पूर्ण होईल.
या गोष्टी बिनबुडाच्या वाटत असतील, तर धर्मशास्त्रात याबद्दल दिलेल्या अनेक कथा आपल्याला सापडतील. एवढेच काय, तर आपल्यालाही प्राणिमात्रांच्या किंवा अतिथींच्या रूपाने भेटीस आलेल्या पितरांची ओळख पटते, अर्थात हा श्रद्धेचा भाग आहे. या गोष्टी संवेदनशील आणि सश्रद्ध मनाला जाणवू शकतात. तसा शोध घेण्याचा तुम्हीदेखील प्रयत्न करा. काय सांगावं, ऋणानुबंधाच्या गाठी पुनश्च पडतील...!