Pitru Paksha 2023: भाद्रपद महिन्याच्या वद्य प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या नावाने श्राद्ध विधी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी भाद्रपद महिन्यातील संपूर्ण वद्य पक्ष समर्पित करण्यात आला आहे. पितृपक्ष किंवा पितृपंधरवड्यात पूर्वजांचे पूजन करून त्यांचे आशिर्वाद घेतले जातात. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते, असा उल्लेख गरुण पुराण आणि कठोपनिषद यांसारख्या ग्रंथांत आढळून येतो. २९ सप्टेंबर रोजी दुपारी ०३ वाजून २७ मिनिटांनी भाद्रपद पौर्णिमेची सांगता झाल्यानंतर पितृ पंधरवडा सुरू होणार आहे. तर, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्वपित्री अमावास्या आहे. मात्र, पितृपक्षाची परंपरा कशी सुरू झाली, सर्वांत पहिल्यांदा श्राद्धविधी कुणी केला, याबाबत काही उल्लेख पुराण कथांमध्ये आढळतात.
भाद्रपद महिन्याच्या वद्य प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या नावाने श्राद्ध विधी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. अगदी रामायण, महाभारतापासून श्राद्ध, तर्पण विधी, पिंडदान केल्याचे उल्लेख आढळतात. श्रीरामांनी राजा दशरथाच्या नावाने पिंडदान केले होते. तर, महाभारताचे संहारक युद्ध संपल्यानंतर पांडवांनी सर्व कौरवांचे आणि कर्णाच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केल्याचे उल्लेख आपल्याला आढळून येतात. महाभारतात भीष्म पिताहम यांनी पांडवांना श्राद्ध तर्पण विधीबाबत माहिती दिल्याचा उल्लेख महाभारतातील शिस्त पर्व या भागात आढळून येतो. यावरून भारतीय परंपरांमध्ये श्राद्ध तर्पण विधी करण्याची परंपरा अगदी प्राचीन काळापासून सुरू असल्याचे सिद्ध होते. पितृ पंधरवड्यात पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर आपल्या वारसांना भेटण्यासाठी येतात, असा समज असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे श्रद्धापूर्वक त्यांचे स्मरण करून त्यांना अन्न आणि पाणी अर्पण केले जाते, असे सांगितले जाते.
महातपस्वी अत्री ऋषींनी सर्वप्रथम श्राद्ध विधी केला होता
पुराणांनुसार, महाभारताच्या शिस्त पर्वात सर्वांत प्रथम झालेल्या श्राद्ध विधीबाबत काही वर्णने आढळतात. यानुसार, महातपस्वी अत्री ऋषींनी सर्वप्रथम श्राद्ध विधी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. अत्री ऋषींनी महर्षी निमि यांना श्राद्ध विधीबाबत उपदेश केला. यांनतर गुरुने दिलेल्या उपदेशानुसार, महर्षी निमि यांनी श्राद्ध विधी केला. महर्षी निमि यांनी केलेला श्राद्ध विधी पाहून अन्य ऋषी आणि मुनींनी आपापल्या पूर्वजांना अन्न आणि पाणी अर्पण केले. नियमितपणे केल्या गेलेल्या या विधीचे अन्न आणि पाणी ग्रहण करून देवता आणि पूर्वज तृप्त झाले, असे सांगितले जाते.
श्राद्ध विधीतील अन्न आणि पाणी ग्रहण केल्यामुळे देवता त्रस्त
एका पौराणिक कथेनुसार, ऋषी आणि मुनींकडून नियमितपणे केल्या जाणाऱ्या श्राद्ध विधीत अर्पण करण्यात येणारे अन्न आणि पाणी ग्रहण केल्यामुळे देवता त्रस्त झाल्या. यामुळे अनेक समस्यांना त्यांच्यासमोर उद्भवल्या. यातून त्यांना मार्ग सापडत नव्हता. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी देवता ब्रह्मदेवांकडे गेल्या. ब्रह्मलोकात जाऊन त्यांनी आपल्या चिंतेचे सविस्तर विवेचन केले. ब्रह्मदेवांनी देवतांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि या समस्येवर अग्निदेव तोडगा काढू शकतील. आपण अग्निदेवाचे आवाहन करावे, असे सांगितले.
देवतांना आणि पूर्वजांच्या नावाने श्राद्ध विधी केला जातो
ब्रह्मदेवांच्या सांगण्यावर आपली समस्या घेऊन देवता अग्निदेवांकडे गेल्या. अग्निदेव म्हणाले की, चिंता सोडावी. आता तुमच्याबरोबर सर्व देवता श्राद्ध विधीवेळी अर्पण केले जाणारे अन्न आणि पाणी ग्रहण करतील. आपण सर्वांनी येथेच थांबावे. अग्निच्या प्रभावामुळे आपली समस्या दूर होईल. यावेळी देवतांसोबत काही पूर्वजही उपस्थित होते. समस्येवर समाधान मिळाल्याने सर्व देवता प्रसन्न झाल्या. म्हणून श्राद्ध विधी करताना सर्वप्रथम अग्निदेवतेला अन्न आणि पाणी अर्पण केले जाते. यानंतर देवतांना आणि त्यानंतर पूर्वजांच्या नावाने श्राद्ध विधी केला जातो, असे सांगितले जाते.
ब्रह्मराक्षसही नुकसान करू शकत नाहीत
शास्त्रातील उल्लेखानुसार, श्राद्ध विधी करताना करण्यात येणाऱ्या हवन केले जाते. यावेळी पूर्वजांच्या नावाने पिंडदान केले जाते. त्याला ब्रह्मराक्षसही नुकसान करू शकत नाही. कारण अग्निदेवांना पाहून ब्रह्मराक्षस तेथे थांबत नाहीत. अग्निमुळे सर्व गोष्टी या पवित्र होतात. पवित्र झालेले अन्न पाणी ग्रहण केल्यामुळे देवता आणि पूर्वज प्रसन्न होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन आदी विधी केले जातात.