श्राद्ध पक्ष सुरू झाला आहे. एव्हाना कोणी तिथीनुसार तर कोणी सोयीनुसार श्राद्ध विधी पार पाडले असतील. ज्यांना पितरांची तिथी आठवत नसेल अशा लोकांनी सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध विधी करण्याचे योजले असेल. मात्र श्राद्ध विधी केले म्हणजे आपली जबाबदारी संपते का? जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल ऋणनिर्देश झाले, पण जे हयातीत आहेत, त्यांचे काय?
श्राद्ध विधी हा पितरांचा अर्थात दिवंगत व्यक्तींचा केला जातो. ज्यांच्या कुळात आपण जन्माला आलो, त्यांची संपत्ती, घराण्याची परंपरा, त्यांची ओळख आपल्याला वारसाहक्काने मिळते. त्यांच्या प्रति ऋण व्यक्त करण्यासाठी, त्यांची आठवण ठेवण्यासाठी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या धर्मशास्त्राने पितृ पंधरवडा आयोजित केला आहे. ज्यांना आपल्या पितरांची पुण्यतिथी लक्षात राहत नाही, त्यांच्यासाठी हा पंधरवडा राखीव ठेवला आहे. या पंधरा दिवसात पितरांच्या तिथीनुसार किंवा आपल्या सोयीने त्यांचा श्राद्धविधी करण्याची मुभा आपल्याला धर्मशास्त्राने दिली आहे. मात्र याचा अर्थ कर्मकांड, श्राद्धाचा स्वयंपाक, नैवेद्य अर्पण केला म्हणजे आपली जबाबदारी संपते का? तर नाही!
''सर्वेप: सुखिनः सन्तु'' अर्थात सर्व जीव सुखात राहोत अशी प्रार्थना आपली संस्कृती आपल्याला शिकवते. यासाठीच पितरांना तृप्त ठेवून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत ही संकल्पना आपल्या धर्मधुरीणींनी तयार केली. मात्र त्याबरोरबरच मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव असा संस्कारही आपल्यावर घातला आहे. या संस्काराचा मात्र आपल्याला विसर पडतो. आपल्या घरातील आत्मे अर्थात घरातील ज्येष्ठ मंडळीना अतृप्त ठेवून पितरांची पूजा केली तर ती पूजा कदापि फलद्रुप ठरणार नाही. म्हणून आई वडिलांना मान देणे, त्यांच्याशी सुसंवाद साधणे, त्यांच्या मताचा आदर देणे या गोष्टी आपल्याकडून घडल्या तरच पुढच्या पिढीवर न शिकवता मोठ्यांना आणि पूर्वजांना मान देण्याचा संस्कार आपोआप घडेल.
भारतीय संस्कृतीला मौखिक परंपरा आहे. अर्थात ती जितकी कागदपत्रातून हस्तांतरित झाली, त्याहीपेक्षा जास्त ती गुरु शिष्य परंपरेतून तसेच मौखिक प्रचारातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झाली. म्हणून ती आजही टिकून आहे. हा वारसा पुढच्या पिढीनेही सुरू ठेवावा असे वाटत असेल तर त्यांच्यासमोर सत्कर्माचा आदर्श आपल्याला आपल्या आचरणातून घालून द्यावा लागेल. तेव्हाच पुढची पिढी आपले अनुकरण करेल आणि संस्कृतीचा मूळ हेतू सफल होईल!