Pitru Paksha 2023: गणेशोत्सवाची सांगता झाली की, भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृपक्ष सुरू होतो. प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते. पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्य करत नाहीत; त्याविषयी बोलणी करत नाहीत आणि मोठी खरेदीही करत नाहीत. प्राचीन काळात आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होत असे. त्यामुळे सरत्या वर्षाचे शेवटचे पंधरा दिवस दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात असत, असे म्हटले जाते. सन २०२३ मध्ये पितृपक्ष कधीपासून सुरू होणार? सर्वपित्री अमावास्या कधी आहे? जाणून घेऊया... (Pitru Paksha 2023 Dates)
सातवाहन राजांनी शालिवाहन शक सुरू केले. ते चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू होते. त्यामुळे हिंदू नववर्ष चैत्र पाडव्याला सुरू केले जाते. मात्र, महालय काळ बदलला गेला नाही. तो भाद्रपदाचा दुसरा आठवडाच राहिला. ती प्रथा शतकानुशतके जोपासली गेली आहे. २९ सप्टेंबर रोजी दुपारी ०३ वाजून २७ मिनिटांनी भाद्रपद पौर्णिमेची सांगता झाल्यानंतर पितृ पंधरवडा सुरू होणार आहे. या दिवशी सन्यासिजनांचा चातुर्मास्य समाप्ती दिवस असून, महालयारंभ होत आहे. तर, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्वपित्री अमावास्या आहे. या दिवशी रात्री ११ वाजून २४ मिनिटांनी भाद्रपद अमावास्या समाप्ती आहे. पितृपक्षातील प्रत्येक तिथीला श्राद्धविधी करण्याची परंपरा आहे. (Pitru Paksha 2023 Importance)
श्राद्धविधी करण्याची परंपरा
श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण. पितृपक्षाच्या निमित्ताने दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. श्राद्धविधीत अन्य गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. पितृ पंधरवड्यात यमलोकातून पितर म्हणजेच मृत पूर्वज कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात, अशी समजूत आहे. महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन आदी विधी करायचे असतात. कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण-पूजन महालय श्राद्धात पिंडरूपाने केले जाते. (Pitru Pandharwada 2023 Dates)
सर्वपित्री अमावास्येला महालय श्राद्ध
सर्वपित्री अमावास्येला महालयाचा आणि श्राद्धविधी करण्याचा अखेरचा दिवस असेल. सर्वपित्री अमावास्येला मोठ्या प्रमाणात श्राद्धविधी केले जातात. ज्यांचा मृत्युदिन नक्की माहिती नाही त्या सर्व पितरांचे श्राद्ध करण्याचाही प्रघात आहे. म्हणून त्यास सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात. शास्त्रवचन भाद्रपद पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावे, असे आहे. दरवर्षी निधनतिथीला वर्षश्राद्ध केले जाते. असे असले तरी महालयात पितरांच्या पूजनाला महत्त्व आहेच. (Sarvapitri Amavasya 2023 Date)
भरणी श्राद्ध आणि अविधवा नवमी
सुरू असलेल्या वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध त्या पक्षातील चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना केले जाते. त्याला भरणी श्राद्ध असे म्हणतात. भाद्रपद वद्य नवमीला अविधवा नवमी असे म्हणतात. त्या दिवशी अहेवपणी (नवरा जिवंत असताना) मृत झालेल्या स्त्रीचे श्राद्ध करण्याचा किंवा सवाष्णीला भोजन घालण्याचा प्रघात आहे. हे विश्वचि माझे घर वा वसुधैव कुटुंबकम् या न्यायाने सर्वच दिवंगत घटकांचे स्मरण महालय श्राद्धात केले जाते.