Pitru Paksha Indira Ekadashi Vrat 2023:पितृपक्ष सुरू आहे. पितृपक्षातील प्रत्येक तिथीला पितर, पूर्वजांच्या नावाने श्रद्धापूर्वक श्राद्ध केले जाते. पितृपक्षातील एकादशी महत्त्वाची मानली जाते. भाद्रपद वद्य एकादशीला इंदिरा एकादशी म्हणून संबोधले जाते. या एकादशीचे व्रत करून आपले पुण्य पूर्वजांना दान केले जाते. यामुळे त्यांना मोक्षप्राप्ती होते, अशी मान्यता आहे. पितृपक्ष एकादशीचे महत्त्व, मान्यता, तिथी आणि व्रतकथा जाणून घ्या...
इंदिरा एकादशीचे व्रत विशेष आणि महत्त्वाचे मानले जाते. भाद्रपद वद्य एकादशीला हे व्रत आचरावे. यंदा मंगळवार, १० ऑक्टोबर २०२३ रोजी इंदिरा एकादशी आहे. आपले पुण्य पूर्वजांना दान करून त्यांच्या मोक्षप्राप्तीचा मार्ग प्रशस्त आणि सुकर व्हावा, यासाठी हे व्रत केले जाते, अशी मान्यता आहे. महाभारतात या एकादशीला उल्लेख आल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी या व्रताबाबत आणि त्याच्या महत्त्वासंदर्भात धर्मराज युधिष्ठिराला सांगितले होते, अशी मान्यता आहे. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते.
इंदिरा एकादशीचे व्रतपूजन कसे करावे?
इंदिरा एकादशी व्रताच्या पूजन विधीबाबत पद्म पुराणात उल्लेख आढळतो. हे व्रत मनापासून आचरावे, असे सांगितले जाते. इंदिरा एकदशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठून नित्यकर्मे उरकून घ्यावीत. इंदिरा एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. पूर्वजांचे स्मरण करून श्रीविष्णूंचे आवाहन करावे. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. यानंतर गंगाजल, फुले, गंध, अक्षता अर्पण करावे. श्रीविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्यामुळे या व्रतपूजनात याचा प्रामुख्याने वापर करावा. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. मनापासून नमस्कार करावा. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. यानंतर पूर्वजांच्या नावाने श्राद्ध विधी करावा. श्रीविष्णूंकडे पूर्वजांसाठी प्रार्थना करावी.
व्रताचरण करताना काय नियम पाळावेत?
इंदिरा एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांनी काही नियमांचे पालन करावे, असे सांगितले जाते. या व्रताचरण काळात मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सकाळी स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.
इंदिरा एकादशीची व्रतकथा
एकदा राजा इंद्रसेन याने स्वप्नात आपल्या वडिलांना नरकयातना भोगत आहेत. त्यांना अनन्वित छळ सोसावा लागत आहे, असे पाहिले. या नरकयातनेतून माझी मुक्तता करण्याचा उपाय शोधावा, असे वडिलांनी स्वप्नात सांगितले. राजा इंद्रसेन विचारात पडला. यासंदर्भात त्यांनी देवऋषी नारद यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा देवऋषी नारदांनी राजा इंद्रसेनला भाद्रपद महिन्यातील एकादशीला विशेष व्रत आचरण्याविषयी सांगितले. या व्रताचे जे पुण्य मिळेल, ते आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करावे, असे नमूद केले. नारदांनी सांगितल्याप्रमाणे राजा इंद्रसेनने मनापासून व्रताचरण केले आणि पुण्य पूर्वजांच्या नावाने दान केले. या व्रताच्या प्रभावामुळे राजा इंद्रसेन यांचे वडील नरकलोकातून थेट वैंकुठात गेले, अशी कथा पुराणात सांगितली जाते.