>> योगेश काटे, नांदेड
हिंदू संस्कृतीने तीन ऋणत्रयाची संकल्पना अधोरेखित केली आहे त्यापैकी पितृऋण ही एक अत्यंत कृतज्ञता भाव व्यक्त करणारी संकल्पना! हा आपला भाव आपण वैदिक शास्त्रीय परंपरागत अन्हिक पदध्तीनेच पुष्कळप्रमाणत व्यक्त करतो तसे आधुनिक पद्धतीने ही कोण करत असेल तर त्याला ना नाही, फक्त विद्ववत मंडळीचा सल्ला घेऊनच करावे. आदरणीय पांडुरंगशास्त्री आठवले यांनी श्राद्ध नावाचे दोन भागात ऋषी संत व सामाजिक कार्यातील व्यक्तीमत्वावर छान चरित्रात्मक लेख लिहले आहेत. अतिशय अप्रतिम अशी ती पुस्तकेआहेत. त्यात आपल्या पूर्वाजांच्या पराक्रमी जीवनांचे स्मरण हे आपले आद्य कर्तव्य आहे ही संकल्पना समाजात प्राचीन काळापासून आढळते. त्यामुळे अशा पितरांचे स्मरण, पूजन करणे हे मानवधर्माचे एक मूलभूत व प्रमुख असे अंग बनले.
यम हा आद्य पितर आणि सर्व पितरांचा राजा असल्याचा उल्लेख ऋग्वेदात आहे. आपल्या वैदिक परंपरेने पितरांचे सोमवंत, बर्हिषद व अग्निष्वात्त असे तीन प्रकार सांगितले.स्मृतींत व पुराणांत पितरांचे अनेक वर्ग कल्पिले आहे.भारतात.(विशेषतः हिंदुंमध्ये) ही पूर्वजांच्या स्मरणाची संकल्पना इतर देशातही आहे. पितर’ हे ‘पितृ’ या शब्दाचे बहुवचनी रूप असल्यामुळे पितर या संज्ञेचा शब्दश: अर्थ मृत पिता, पितामह, प्रपितामह इ. पूर्वज असा होतो तसेच पितृपरंपरेतील आजी, पणजी इ. स्त्रियांचा आणि मातृपरंपरेतील आई, आजोबा इ.स्त्रीपुरूषांचाही पितरांत अंतर्भाव होतोच. ‘मातृ’ व ‘पितृ’ या शब्दांचा समास, होताना ‘पितरौ’ असे रूप होते आणि त्यामुळे ‘पितरौ’ या पितृवाचक शब्दाच्या अर्थात मातेचाही अंतर्भाव होतो, या पाणिनीच्या नियमावरूनही हे स्पष्ट होते.वसू, रूद्र व आदित्य यांना पितृत्रयींचे प्रतीक मानले जाते.
पितृकल्पना इंडो-यूरोपियन काळातील नसली, तरी इंडो-इराणियन काळाइतकी प्राचीन असावी, असे पां.वा. काणे मानतात.मनुस्मृतीच्या मते मरीची इ. ऋषी हे मनूचे पुत्र होत आणि त्या ऋषींचे पुत्र म्हणजे पितृगण होत. ऋषींपासून पितर झाले, पितरांपासून देव व मानव झाले आणि देवांपासून चराचर सृष्टी निर्माण झाली असे मनुस्मृतीत (३.२०१) म्हटले आहे. पितृपूजेमागचे मुख्य उद्देश भूतकाळाचे स्मरण ठेवणे, वडीलधार्यांच्या शहाणपणाविषयी आदर व्यक्त करणे, त्यांचे आशीर्वाद व मदत प्राप्त करणे, दु:ख दूर करणे इ. असतात.
प्रारंभीच्या पितृपूजेतूनच सर्व लोकांची धर्मभावना विकसित झाली, असे मत हर्बर्ट स्पेन्सरने एकोणिसाव्या शतकात मांडले परंतु विद्वानांनी त्यावर अनेक आक्षेप घेतले आहेत. पितृलोकांत जाण्याचा आणि पिंडतर्पणादींच्या स्वीकारासाठी पृथ्वीवर परत येण्याचा पितरांचा मार्ग म्हणजे पितृयान देवयान होय. पहिला मृत मानव यम हा पितृपती वा पितृराज, गया हे पितृतीर्थ, गुजरातेतील सिद्धपूर हे मातृतीर्थ, दक्षकन्या स्वधा ही पितरांची आई वा पत्नी, दक्षिण ही त्याची आवडती दिशा आणि अमावास्या ही पितृतिथी वा पितृदिन होय. पितरांमध्ये मी अर्यमा आहे, असे श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे. ऋग्वेदापासूनच पितरांचे निर्देश आढळतात देव, दैत्य, मानव, यक्ष, गंधर्व, किन्नर इ. सर्वांना आणि मानवांतील सर्व वर्णांना पितर असतात, असे मनूचे मत आहे.
बहुतेक ठिकाणी पितृपूजेचे दिवस ठरलेले असतात. हिंदू धर्मात पितरांसाठी करावयाचे विधी कृष्णपक्षात व विशेषत: अमावास्येला करतात. कारण माणसाचा एक महिना म्हणजे पितरांचा एक दिवस व एक रात्र (माणसाचा कृष्णपक्ष म्हणजे त्यांचा दिवस व शुक्लपक्ष म्हणजे रात्र असे १५-१५ दिवस मिळून एक महिना), असे मानले जाते. विशेषत: भाद्रपद कृष्णपक्ष म्हणजे पितृपक्ष आणि भाद्रपद अमावास्या म्हणजे सर्वपित्री अमावास्या, असे म्हटले जाते. द्विजाने दररोज करावयाच्या पंचयज्ञांपैकी पितृयज्ञ हा एक होय. पारशी लोक १० ते २० मार्च या काळात आणि रोमन लोक १३ ते २१ फेब्रुवारी आणि ९,११ व १३ मे या दिवशी या प्रकारचे विधी करतात.
चीनमध्ये एक सार्वजनिक विधीही केला जात असे. जपानमध्ये सर्व पितरांचा सन्मान करण्यासाठी एक मोठा वार्षिक उत्सव करीत असत व त्या वेळी सर्व पितर घरी परत येतात, असे मानले जाई. मेलानीशियामध्ये पितृपूजा व शासनव्यवस्था यांचा निकटचा संबंध मानला जातो. इतर धर्मातही विशिष्ट दिवशी या संकल्पनेच पालन करतात. आधुनिक संस्कृतींमध्ये तंत्रज्ञानाची प्रगती, विभक्त कुटुंबव्यवस्था, आर्थिक स्वावलंबन, जिव्हाळ्याचा अभाव इत्यादींमुळे या प्रथा क्षीण होत चालेल्या आहेत.
|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||
संदर्भ : श्री वासुदेवशास्त्री पणशीकर संपादित मनुस्मृति, निर्णयसागर प्रत, धर्मशास्त्राचा इतिहास, भारतरत्न महामोपाध्याय श्री पा.वा .काणे