Pitru Paksha 2023: मराठी वर्षात जसे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांना महत्त्व आहे. तसेच भाद्रपद महिन्यात येणाऱ्या पितृपक्षाला महत्त्व आहे. भाद्रपदाचा वद्य पक्ष पितृ पंधरवडा असतो. प्रतिपदा ते अमावास्या या काळात पितृपक्षाचे श्राद्ध विधी केले जातात. पितृपक्षाला सुरुवात झाली असून, १४ ऑक्टोबरला सर्वपित्री अमावास्या आहे. पितृपक्ष पंधवड्याबाबत आपल्याकडे अनेक धारणा आणि समजुती आहेत. यातील एक प्रमुख समज म्हणजे पितृपक्ष पंधरवड्याचा काळ अशुभ मानला जातो. त्यामुळे या कालावधीत नवीन गोष्टींची खरेदी करू नये, असे सांगितले जाते. मात्र, यंदाच्या वर्षी पितृपक्षात काही शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगांमध्ये खरेदी केली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...
पितृपक्ष पंधरवड्याच्या कालावधीत खरेदी केलेल्या वस्तू, गोष्टी या पूर्वजांना समर्पित होतात, अशी धारणा काही ठिकाणी आढळते. तर काही ठिकाणी पूर्वजांचे स्मरण हे श्रद्धापूर्वक करावे. श्राद्ध, तर्पण, पिंडदान यांसारखे विधी करून पूर्वजांना नमन करावे. म्हणून या काळात नवीन काही खरेदी करू नये, अशी समज असल्याचेही दिसून येते. नवीन वस्त्रे, दागिने, वाहने खरेदी केल्यास पूर्वज नाराज होतात आणि वारसांना आशीर्वाद देत नाहीत, अशी लोकमान्यताही अनेक ठिकाणी असल्याचे पाहायला मिळते. मात्र, यातील कोणत्याही धारणा, समजूत आणि लोकमान्यतेला कोणताही आधार नाही, असे शास्त्र सांगते. यंदाच्या वर्षी पितृपक्षात रवि पुष्य योग, सर्वार्थ सिद्धी योगासारखे अत्यंत शुभ योग जुळून येत आहेत.
रविपुष्य योगातील खरेदीचा दुप्पट लाभ
पितृपक्षात ८ ऑक्टोबरला रविपुष्य योग तयार होत आहे. रविवारी पुष्य योग तयार होतो तेव्हा त्याला रवि पुष्य योग म्हणतात. रविपुष्य योग ज्योतिष शास्त्रात अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तूचा दुप्पट लाभ मिळू शकतो. शुभता अनेक पटींनी वाढते, अशी मान्यता आहे. रविपुष्य योगामध्ये सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. पितृपक्षाच्या काळात सोने आणि चांदीची खरेदी करायची असेल, तर ८ ऑक्टोबरला कोणत्याही निर्बंधाशिवाय करू शकता. या योगांमध्ये पूर्वजांचा शुभाशिर्वाद लाभू शकतो.
सर्वार्थ सिद्धी योगावर लक्ष्मी देवीचे वरदान
पितृपक्षात ०३ ऑक्टोबर, ०४ ऑक्टोबर आणि ८ ऑक्टोबर रोजी सर्वार्थ सिद्धी शुभ योग तयार होत आहे. कोणतीही नवीन वस्तू खरेदी करायची असेल किंवा कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर ते या योगात सुरू करू शकता. सर्वार्थ सिद्धी योग देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. मान्यतेनुसार, या योगात कोणतेही काम केले तर त्यात पूर्ण यश मिळते.
अक्षय्य वृद्धी आणि शुभाशिर्वाद मिळण्याचा योग
०४ ऑक्टोबर रोजी रवियोगासारखा शुभ योग जुळून येणार आहे. सूर्याच्या कृपेने या शुभ योगात जे काही काम केले जाते त्याचे कोणतेही नुकसान होत नाही. त्यामुळे रवि योगात पितृपक्ष असूनही खरेदी करू शकता. या शुभ मुहूर्तावर खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये अक्षय्य वृद्धी होते आणि सूर्यदेवासह पितरांचा शुभाशीर्वाद मिळतो, अशी मान्यता आहे.
इंदिरा एकादशीला श्रीविष्णूंचे आशीर्वाद
पितृपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात. ही तिथी धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय शुभ मानली जाते. इंदिरा एकादशीचा संबंध भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्याशी आहे. या दिवशी केलेल्या शुभ कार्यांमध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद असतो. पितृपक्षादरम्यान कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर, १० ऑक्टोबर रोजी इंदिरा एकादशीला खरेदी करू शकता, असे सांगितले जाते.