पितृपक्षात ज्या दिवशी भरणी नक्षत्र येईल त्याला महाभरणी असे नाव आहे. यंदा २१ सप्टेंबर रोजी भरणी श्राद्ध करायचे आहे. पण कोणी? हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण, हे श्राद्ध सर्वांनी करून चालत नाही.
संकष्टीचा उपास आणि पितरांचा नैवेद्य :
२१ सप्टेंबर रोजी संकष्ट चतुर्थी आहे आणि त्याच दिवशी भरणी नक्षत्र येत आहे. पितृपक्षात हे नक्षत्र ज्या दिवशी येते त्या दिवशी भरणी श्राद्ध करायचे असते. संकष्टीला अनेकांचा उपास असतो, पण त्याच दिवशी भरणी श्राद्ध आल्याने पितरांना नैवेद्य कसा दाखवायचा हा विचार करत असाल तर थांबा! उपास गणपतीचा आणि श्राद्ध विधी पितरांसाठी, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्याने श्राद्ध स्वयंपाक करून पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य आपल्याला ग्रहण करता आला नाही तर एखाद्या गरजू व्यक्तीला द्यावा पण फेकून देऊ नये. अन्न वाया घालवू नये. नैवेद्याचा प्रसाद सायंकाळी चंद्रोदय झाल्यावर सेवेन करता येईल. २१ सप्टेंबर रोजी रात्री ९. ०४ मिनिटांनी चंद्रोदय आहे आणि भरणी श्राद्ध सकाळी करून घ्यायचे आहे. पण कोणी? ते पुढे वाचा...
भरणी श्राद्ध कोणी करावे?
मृत व्यक्तीचे वर्षश्राद्ध झाले असेल तरच पितृपक्षात भरणी नक्षत्राला भरणी श्राद्ध करता येते. अन्यथा वर्ष श्राद्ध होण्याआधी पितृ पक्ष आला असता भरणी श्राद्ध करू नये असा शास्त्र संकेत आहे. तसेच वर्षश्राद्धाच्या पाठोपाठ पितृपक्ष आला असता भरणी नक्षत्रावर पुनश्च श्राद्ध विधी केले असता हरकत नाही, उलट त्याचे अधिक पुण्य मिळते.
भरणी श्राद्ध केल्याने महापुण्य मिळते असे म्हणतात. कारण हे श्राद्ध केले असता मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभते आणि तो आत्मा भवसागरातून मुक्त होतो. त्यामुळे श्राद्धविधी केल्याचे पुण्य पदरात पडते. परंतु ते वर्षश्राद्धा नंतरच का करावे तर वर्ष श्राद्ध झाल्यावरच मृत व्यक्तीचे प्रेतत्व नष्ट होते. त्या आत्म्याला पितरांमध्ये स्थान मिळते आणि त्या पितरांची पूजा पितृपक्षात करता येते.
गरुडपुराण अन्वष्टका भरणी आदी श्राद्धे वर्षश्राद्धानंतरच करावी असे सांगते. तेथेच भरणीबाबत निर्णय करताना पुढे पित्याचे भक्तीस्तव कोणी भरणीश्राद्ध वर्षापुर्वी केले तरी दोषावह नाही असेही म्हटले आहे. अर्थात केले तरी ते चूक नाही, मात्र त्याला शास्त्राधार नाही.
थोडक्यात भरणी श्राद्ध मृत व्यक्तीच्या पहिल्या वर्षी न करता दुसऱ्या वर्षांपासून करावे, हे निश्चित!