पितृ पक्षाच्या (Pitru Paksha 2024) अष्टमीला महालक्ष्मी व्रत साजरे केले जाते. हे व्रत दिवाळीतल्या लक्ष्मीपूजेइतके महत्त्वाचे मानले जाते. पितरांच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी, वैभवलक्ष्मी नांदावी यासाठी पितृपक्षाला जोडून देवीच्या आवडत्या अष्टमी तिथीला हे व्रत केले जाते. या व्रताला गजलक्ष्मी व्रत (Gajlaxmi Vrat 2024)असेही म्हणतात. उत्तर भारतात हे व्रत मोठ्या प्रमाणात केले जाते. उद्या अष्टमी तिथी असल्याने आपणही या व्रताबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. देवीचे वाहन म्हणून हत्तीचीदेखील पूजा केली जाते. गजलक्ष्मी व्रताच्या दिवशी हत्तीवर आरूढ झालेल्या देवीच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. यासाठी माती, चांदी, कास्य, तांबे यापासून बनलेल्या मूर्तींचाही पूजेत वापर करता येतो. परंतु मूर्ती उपलब्ध नसेल तर प्रतिमेचे पूजन करता येते.
दिवाळीतील लक्ष्मीपूजेसारखी ही पूजा देखील सायंकाळी सूर्यास्तानंतर केली जाते. देवीची षोडशोपचारे पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. यावेळी देवीकडे आपल्यासाठी नाही, तर पितरांना सद्गती मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते. पितर संतुष्ट असले तर देवीच्या कृपेने आपल्या घरात धनसंपत्तीचा ओघ सुरू होतो.
आता पाहूया पूजा विधी :
- महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी, लक्ष्मीच्या पूजेची जागा संध्याकाळी स्वच्छ करून घ्या.
- तिथे पाट किंवा चौरंग मांडून घ्या.
- त्याभोवती सुंदर रांगोळी काढा.
- पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरून घ्या.
- त्यावर तांदुळाची रास रचून पाण्याचा कलश ठेवा.
- ताम्हनात लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा.
- देवीला हळद कुंकू वाहून, सुंगंधी फुले अर्पण करा.
- फळांचा, मिठाईचा नैवेद्य दाखवा.
- पितरांचे स्मरण करा, त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा.
- देवीची आरती म्हणा.
- दुसऱ्या दिवशी पूजेतील प्रतिमा उचलून तांदूळ, मिठाई, फळे यांचे सत्पात्री दान करा.
- अशाप्रकारे सोप्या पद्धतीने गजक्ष्मी व्रत करता येते व पुण्य पदरात पाडून घेता येते.