Shraddha Bhojan In Pitru Paksha 2024:पितृपक्ष सुरू आहे. या काळात अनेकदा भोजनास बोलावले जाते. परंतु, अनेक जण श्राद्धाचे जेवण जेवायला जात नाही. किंबहुना श्राद्धाचे जेवण म्हटल्यावर नकार देतात. श्राद्धाचे जेवण अपवित्र असते का, श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. शास्त्र काय सांगते, ते जाणून घेऊया...
श्राद्धाच्या दिवशी जेवण करणे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांत करण्यासाठी असते. जर आपण श्रद्धेने आणि भक्तीने हे भोजन घेतले, तर त्यातून पूर्वजांना समाधान प्राप्त होते, असे शास्त्र सांगते. श्राद्ध हा एक धार्मिक विधी आहे जो आपल्या पूर्वजांना आदरांजली अर्पण करण्यासाठी केला जातो. या विधीमध्ये भोजनाचे महत्त्व खूप मोठे आहे, कारण जेवण हे पूर्वजांच्या समाधानासाठी आणि त्यांच्या मोक्षासाठी समर्पित केले जाते. या दिवशी ज्यांचे श्राद्ध आहे, त्यांच्या आवडीचे पदार्थ या भोजनावेळी बनवले जातात. त्यांची आठवण काढली जाते. श्राद्धाच्या जेवणासंदर्भात दत्तगुरू आणि नवनाथांची एक कथा सांगितली जाते. ती कथा काय? त्यातून आपण काय घ्यावे, ते जाणून घेऊया...
समोरच दत्तगुरु अवधूत प्रकटले
यासंदर्भात एक कथा सांगितली जाते. शुक्रवारी सर्वपित्री अमावास्या होती. दुपारी बारा वाजता दत्तगुरुंची माध्यान्ह भिक्षेची वेळ होती. पीठापुरात एक व्यक्ती श्राद्ध कर्म करत होती. श्राद्ध भोजनाचा स्वयंपाक पूर्ण झाला होता. निमंत्रित तीन गुरुजींची भोजनाला यायची वेळही झाली होती. तेवढ्यात प्रवेशद्वारातून आवाज आला की, भवती भिक्षां देही, श्राद्ध पक्षाच्या दिवशी पितृस्थानी तसेच देवस्थानी निमंत्रित अतिथींचे भोजन झालेले नसताना, भिक्षेकऱ्याला अन्न देणे नियमांना धरून नव्हते. परंतु, घरातील महिलेला तिच्या वडिलांनी दृष्टांत दिला होता की, दत्तगुरु कोणत्याही स्वरुपात येऊन भिक्षा मागू शकतात. त्यांना तसेच रित्या हाती मागे पाठवू नकोस. ते आठवून ती महिला दारात आलेल्यांना भिक्षा देण्यासाठी आल्या. समोरच दत्तगुरु अवधूत उभे. दत्तगुरु म्हणाले की, माते, तुझी इच्छा, मनोकामना काय असेल, ते सांग.
श्रीपाद श्रीवल्लभ रुपात दर्शन अन् इच्छापूर्तीचे वरदान
दत्तगुरु १०० वर्षांपासून श्रीपाद श्रीवल्लभ स्वरुपात दर्शन देत आहेत. त्यांचे दर्शन घ्यायची इच्छा आहे. लगेचच दत्तगुरु श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात प्रकट झाले. महिलेचे भान हरपले आणि त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ यांना साष्टांग दंडवत घातले. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी महिलेला तिची इच्छा विचारली. तेव्हा माझ्या पोटी तुम्ही यावे, अशी इच्छा महिलेने बोलून दाखवली. तथास्तु म्हणत श्रीपाद श्रीवल्लभ अंतर्धान पावले. कालांतराने दत्तगुरु गणेश चतुर्थीला दिव्य ज्योती स्वरुपात प्रकटले. या घटनेसाठी सर्वपित्री अमावास्या आणि श्राद्ध भोजन कारणीभूत ठरले. त्यामुळे श्राद्धाचे भोजन पवित्रच मानावे लागते, अशी एक कथा सांगितली जाते.
नवनाथांनी ग्रहण केले भाद्ध भोजन
नवनाथांच्या नवव्या अध्यायात अशीच एक कथा वाचायला मिळते. गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ होते. ते गोरक्षनाथांना घेऊन यात्रेसाठी जात होते. एका गावात आल्यावर त्यांना भूक लागली. तेव्हा भिक्षेसाठी गावात गेले. गावात एके ठिकाणी श्राद्धाचे भोजन सुरू होते. गोरक्षांनी भिक्षा मागितली. एका घरातील महिलेने श्राद्धाच्या भोजनाचे संपूर्ण ताट भरून गोरक्षनाथांना दिले. ते ताट घेऊन गोरक्षनाथ गुरु मच्छिंद्रनाथांसमोर आले आणि ते ताट त्यांना दिले. नाथ जेवले. त्यातील वडा त्यांना भरपूर आवडला. हे भोजनही श्राद्धाचे होते. नवनाथातील गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांनी ते श्राद्धाचे भोजन ग्रहण केले. त्यामुळे दत्तगुरु आणि नाथांनी श्राद्धाचे भोजन केले असताना ते दोषपूर्ण किंवा अपवित्र ठरू शकत नाही, असे सांगितले जाते.
अन्न हे पूर्णब्रह्म असते. अन्नाला कधीही दोष लागत नाही. फक्त ते चांगल्या पद्धतीने केलेले असावे. त्यामुळे श्राद्धाचे भोजन हे अत्यंत श्रद्धापूर्वक केलेले असते. आपले पूर्वज ते ग्रहण करायला येणार आहेत, तो भाव त्यात असतो. त्याच्या आवडीच्या गोष्टी आवर्जून केलेल्या असतात. त्यामुळे जसे विशेष दिनी, विशेष पूजनावेळी जसे नैवेद्याचे ताट तयार केले जाते. तसेच श्राद्धाचे ताट तयार केले जाते. त्यामुळे त्याने दोष लागू शकत नाही. ते अपवित्र ठरू शकत नाही. श्राद्ध भोजनाला नावे ठेवू नयेत, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.