पितृदोष (Pitru Dosha) म्हणजे तरी काय? तर घरात अकारण होणारे वाद, चांगल्या कार्यात येणारी विघ्न, यशाच्या मार्गावर अपयशाशी सामना, लांबलेली शुभकार्य, आर्थिक अडचणी या गोष्टी सर्वसामान्यांच्याही आयुष्यात घडतात, पण पितृदोष असलेल्या ठिकाणी या गोष्टी अकारण होत असल्याचे लक्षात येते. ते अकारण घडत नसून पितृदोष हे त्यामागचे कारण असते. पितरांना आपल्यामुळे झालेली पीडा, त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा, त्यांच्या आत्म्याला सद्गती न मिळाल्याने पितृदोष निर्माण होतात. म्हणून पितृपक्षात (Pitru Paksha 2024) श्राद्धविधी करून त्याचे निवारण करायचे असते. मात्र ज्यांच्याकडून ते होत नाही त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास सहन करावा लागतो, ते जाणून घेऊ.
पितृदोषाशी संबंधित कारणे आणि उपाय गरुड पुराणात सांगितले आहेत. पितृदोषामुळे व्यक्तीला पितरांचे आशीर्वाद मिळू शकत नाहीत. तसेच पितृदोषाने पीडित व्यक्तीची कष्ट करूनही प्रगती होत नाही. गरुड पुराणात पितृदोषापासून मुक्तीचा मार्ग म्हणून पितरांचे श्राद्ध आणि तर्पण हे विधी दिले आहेत. पितृदोष एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही, तर वेळीच त्याचे निवारण केले नाहीतर पुढच्या पिढयांनाही त्रासदायक ठरतो. गरुड पुराणात यासंबंधी दिलेली माहिती आणि उपाय जाणून घेऊया.
पितृ पक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. गरुड पुराणानुसार पितृपक्षात १५ दिवस पितर यमलोकातून पृथ्वीवर येतात. अशा परिस्थितीत पितरांना तृप्त करण्यासाठी वंशजांनी श्राद्धविधी करावेत असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध केल्याने पितरांसाठी मोक्षाचे दरवाजे उघडतात. याशिवाय श्राद्ध करणाऱ्याला पुण्यही मिळते. पितृदोषापासून मुक्ती मिळत असल्याने पितरांचे श्राद्ध करणेही महत्त्वाचे आहे.
गरुड पुराणात सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर त्याचा प्रभाव फक्त त्या व्यक्तीवरच नाही तर त्याच्यासोबत राहणाऱ्या लोकांवरही पडतो. कुटुंबावर पितृदोष आल्यामुळे इतर सदस्यांनाही कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करावा लागतो. पितृदोष दूर केला नाही तर तो ७ पिढ्या चालू राहतो. म्हणून पिढी दर पिढी पितृदोषाचे निवारण करणे गरजेचे असते. पितृदोष सात पिढ्या चालू राहिल्यास वंश पुढे नेण्यात अडचणी निर्माण होतात. यासोबतच पितृदोषाने ग्रासलेल्या घरात लहान मुलांचा आकस्मिक मृत्यूही होऊ शकतो.
मनुष्याच्या आशा आकांक्षा मरणोत्तरही शिल्लक राहतात. देह सुटतो पण आशा, अपेक्षा बाकी राहतात. त्या पूर्ण करण्यासाठी पुढचा जन्म मिळतो. त्या जन्मात नवीन अपेक्षा, इच्छा जोडल्या जातात. अशी साखळी सुरु राहते. म्हणून संत म्हणतात, मानव देह ही मोक्षाची वाट आहे, इथले भोग, प्रारब्ध, दुःख, संकटं सामोरं जाऊन संपवा. आयुष्य संपायच्या आधी इच्छा संपवा, जेणेकरून तुम्हाला तर मोक्ष मिळेलच, शिवाय पुढच्या पिढयांना पितृदोषाला सामोरे जावे लागणार नाही.
(सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.)