रामायणातील प्रत्येक प्रसंग हा आदर्श जीवनाचे धडे देणारा आहे. कोणी कसे वागावे आणि कोणी कसे वागू नये याचीही शिकवण यातून मिळते. म्हणून त्या कथांकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. तरच त्या कथांमध्ये दडलेले तत्त्वज्ञान, चमत्कार आणि माणुसकीची शिकवण मिळू शकेल.
पितृपक्षासंदर्भात सीतामाईने राजा दशरथाचा पिंडदान केल्याची कथा सांगितली जाते. सध्या पितृपक्ष असल्याने आपणही ती जाणून घेऊया आणि त्यानिमित्ताने पिंडदानाचे तसेच सत्य बोलण्याचे परिणाम जाणून घेऊया.
श्रीरामांना वनवास मिळाल्यावर त्यांच्या पाठोपाठ लक्ष्मण आणि सीतामाई वल्कलं नेसून अरण्यात जायला निघाले. त्यांचा विरह सहन न झाल्याने राजा दशरथाचा मृत्यू झाला. ही वार्ता श्रीरामांना कळली, तेव्हा त्यांनी वनामध्येच आपल्या पित्याचे श्राद्धविधी करण्याचा निर्णय घेतला. राम आणि लक्ष्मण श्राद्धविधीसाठी लागणाऱ्या सामानाची जुळवाजुळव करायला गेले. तेव्हा सीतामाई कुटीत एकटी होती.
त्यावेळेस दशरथ राजाच्या आत्म्याने प्रगट होऊन सीतामाईला श्राद्धविधी करण्याची सूचना दिली. हा चमत्कार बघून सीतामाई गांगरली. तिने श्रीराम आणि लक्ष्मण श्राद्धविधी करणार असल्याचेही सांगितले. परंतु. दशरथ राजाने आपल्याला मोक्ष हवाय सांगून सीतामाइला श्राद्धविधी करण्यास सांगितले. घरातील पुरुष, मुलं श्राद्धविधी करण्यास उपस्थित नसतील तेव्हा स्त्रियांनी हे विधी करण्याला शास्त्रात मान्यता आहे. याची जाणीव दशरथ राजाने सीतामाईला करून दिली.
राजा दशरथाच्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून सीतामाईने श्राद्धविधी केले आणि राजा दशरथाने मुलीसमान असलेल्या सुनेला भरभरून आशीर्वाद दिले आणि ते मोक्षपदाला गेले. श्रीराम आणि लक्ष्मण सामानाची जुळवाजुळव करून परत आले तर तिथे श्राद्धविधी केलेले दिसले. त्याबद्दल विचारले असता सीतामाईने सर्व हकीकत सांगितली, व त्या घटनेचे चार साक्षीदार आहेत असेही सांगितले.
गया तीर्थक्षेत्राच्या काठावरची फाल्गु नदी, केतकीचे फुले, गोमाता आणि वटवृक्ष! त्या चौघांची साक्ष काढत घडलेल्या हकीकतीबद्दल राम-लक्ष्मणाला सांगायला सांगितले तर त्यांनी मौन धरले आणि असे काही झाले नाही अशा अर्थाने नकारार्थी मान डोलावली. सीतामाईला वाईट वाटले, फक्त वटवृक्षाने सहमती दर्शवली, त्यामुळे सीतामाईला दिलासा मिळाला. तिने रागाच्या भरात नकार देणाऱ्या नदीला, गोमातेला आणि केतकीच्या फुलाला शाप दिला. नदीला शाप दिला की तुझे पाणी आटून जाईल, गोमातेला शाप दिला, तू पवित्र असूनही मानवनिर्मित कचरा खात तुझे आयुष्य जाईल आणि केतकीच्या फुलाला शाप दिला, की तू कितीही सुंदर असले, तरी देवपूजेत तुझा समावेश होणार नाही. सीता माईची शापवाणी खरी ठरली. मात्र वटवृक्ष ज्याने सत्याची साथ दिली, त्याला सीतामाईने आशीर्वाद दिला की तू दीर्घायुषी व पूजनीय होशील आणि झालेही तसेच!
या कथेतून बोध घेण्यासारख्या मुख्य दोन गोष्टी म्हणजे, पितृपक्षातला काळ पितर आशीर्वादासाठी येतात, त्यांना तृप्त करून मोक्षपदाला पोहोचवणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो सत्याची कास धरतो त्याचा उत्कर्षच होतो. या गोष्टी लक्षात ठेवूया आणि आपणही पितृपक्षात आणि नाहीच जमले तर सर्वपित्री आमावस्येला पितरांना श्राद्धविधी करून नैवेद्य अर्पण करावा.