Pitru Paksha 2024: भारतीय परंपरा आणि तत्त्वज्ञानानुसार, चार ऋण सांगितली गेली आहेत. देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण हे चार ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे. पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. माता-पिता, निकटवर्तीयांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यासाठीचा संस्कार म्हणजेच 'श्राद्ध'. सन २०२४ मध्ये १८ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा आहे. या पितृपक्षात काही तिथी महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. जाणून घेऊया...
अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृ पंधरवडा असतो. प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते. पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्ये केली जात नाहीत. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. 'श्रद्धा' या शब्दापासून 'श्राद्ध' हा शब्द निर्माण झाला आहे. ईहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले, त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने 'केले जाते, ते 'श्राद्ध' होय. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते, असा उल्लेख गरुण पुराण आणि कठोपनिषद यांसारख्या ग्रंथांत आढळून येतो. त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख, शांतता, समृद्धी कायम राहते, अशी मान्यता आहे.
पितृपक्षातील महत्त्वाच्या तिथी
- १८ सप्टेंबर रोजी सकाळी ०८ वाजून ०३ मिनिटांनी भाद्रपद पौर्णिमा समाप्त होत आहे. यानंतर महालयारंभ होत असून, प्रतिपदा श्राद्ध या दिवशी करावे, असे सांगितले जात आहे.
- पौर्णिमेच्या दिवशी अगस्त ऋषींना तर्पण करून जल अर्पण केले जाते. यानंतर भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करतात. संपूर्ण वर्षात ज्या तिथीला कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले आहे, त्या त्या तिथींना पूर्वजांचे स्मरण, पूजन केले जाते.
- भाद्रपद वद्य तृतीय २० सप्टेंबर रोजी असून, या दिवशी तृतीया श्राद्ध करावे.
- सुरू असलेल्या वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध त्या पक्षातील चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना केले जाते. त्याला भरणी श्राद्ध असे म्हणतात. यंदा २१ सप्टेंबर रोजी भरणी श्राद्ध आहे.
- भाद्रपद नवमीला अविधवा नवमी असे संबोधले जाते. या दिवशी अहेवपणी म्हणजे नवरा जिवंत असताना (सवाष्ण) मृत झालेल्या महिलेचे श्राद्ध केले जाते. यंदा २५ सप्टेंबर रोजी अविधवा नवमी असून, या दिवशी नवमी श्राद्ध करावे.
- भाद्रपद वद्य पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते. याचे फलस्वरुप पूर्वजांना पुण्यदान मिळते आणि त्यांना मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. यंदा २८ सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी असून, २९ सप्टेंबर रोजी मघा श्राद्ध करावे.
- भाद्रपद द्वादशीला दिवंगत सन्यासी व्यक्तींचे श्राद्ध केले जाते. यंदा २९ सप्टेंबर रोजी द्वादशी श्राद्ध करावे.
- भाद्रपद चतुर्दशी या दिवशी अपघात, विष, शस्त्र किंवा अन्य कोणत्याही कारणाने अनैसर्गिक मृत्यू आलेल्या दिवंगत व्यक्तींचे श्राद्ध केले जाते. ०१ ऑक्टोबर रोजी चतुर्दशी श्राद्ध करावे.
- भाद्रपद अमावास्येला सर्वपित्री अमावास्या म्हणूनही संबोधले जाते. अमावास्येला दिवंगत झालेल्या व्यक्तींचे या दिवशी श्राद्ध केले जाते. याशिवाय ज्या व्यक्तींना आपल्या दिवंगत पूर्वजांची निधन तिथी ज्ञात नसेल, अशा सर्वांनी सर्वपित्री अमावास्येला आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करावे. ०२ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावास्या आहे.
- महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही तिथीला अनैसर्गिक वा अपमृत्यू पावलेल्या व्यक्तींचे श्राद्ध केवळ भाद्रपद वद्य चतुर्दशीलाच करावे, असे विधान शास्त्रात देण्यात आले आहे.