शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Pitru Paksha 2024: पितृपक्षात श्राद्धविधी केल्याने नेमके काय साध्य होते? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 7:00 AM

Pitru Paksha 2024: श्राद्धविधीशी संबंधित कर्मकांडे आणि अन्य गोष्टींबद्दल लोकांच्या मनात गोंधळ असतो. त्यासंदर्भात सविस्तर माहिती.

>> मकरंद करंदीकर 

एकदा पितृपंधरवडा सुरु झाला की या  विषयावर बरीच चर्चा वाचायला मिळते. पितरांप्रती आदर व्यक्त करण्याच्या प्रथा तर सगळ्याच धर्मांमध्ये आहेत आणि त्या त्या धर्मातील बहुतेक सर्वजण त्या पाळतात. पण याची अति चर्चा, टवाळी फक्त हिंदू धर्मातच होते, हे दुर्दैव! श्राद्धविधीशी संबंधित कर्मकांडे आणि अन्य गोष्टींबद्दल लोकांच्या मनात गोंधळ असतो. त्यासंदर्भात हा लेख शंकानिरसन करणारा ठरू शकेल!

१)  मृत्यूनंतरचे जीवन आणि मोक्षाची जी संकल्पना, हिंदू धर्मामध्ये मांडलेली आहे तशी अन्य कुठल्याही संस्कृतीत इतक्या परिपूर्णपणे मांडलेली नाही. मात्र यासाठी हिंदू धर्मामध्येच हजारो वर्षे प्रचलित असलेल्या पुनर्जन्म, कर्म सिद्धांत, पंचमहाभूतांनी बनलेला मनुष्य देह, यासारख्या गोष्टी  एकदा मान्य केल्या तर मग जन्ममृत्यू साखळीतील एकही गोष्ट अगम्य ( unsolved ) रहात नाही.

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतीवादाच्या शोधाच्या हजारो वर्षे आधी हिंदू धर्मातील  उत्क्रांतीचे  तत्वज्ञान हेच सांगते आहे. अगदी ढोबळमानाने एखाद्या एकपेशीय जीवापासून अनेकदा बदल होत होत  ( उत्क्रांती होत होत ) सजीव तयार झाले असा थोडक्यात सिद्धांत !  हिंदू धर्मातील तत्वज्ञान काय सांगते? सप्तपाताळ, मानवलोक आणि सप्तस्वर्ग हे काय आहे ? लक्ष चौऱ्यांशी जन्मांनंतर मनुष्य जन्म लाभतो, म्हणजे काय ? डार्विनला फक्त देहाचीच उत्क्रांती सांगता आली. हिंदू धर्मात देहाबरोबरच त्याचे पूर्वकर्मफल, पापपुण्य अशा अनेक गोष्टींचा एकत्रित विचार केलेला आहे. विज्ञानाला मनुष्य जन्मापर्यंतच उत्क्रांती सांगता आली आहे. पण आपल्या धर्माने मात्र पुढे भू, भुव, महा, जन , तप आणि सत्य लोक / स्तर असे नंतरच्या उत्क्रांतीचे टप्पेही सांगितलेले आहेत. तेथील कामकाजाची माहिती दिली आहे. माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा देह ( कोष ) गळून पडला तरीही प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, ज्ञानमय हे कोष तसेच राहून पुढे प्रगती करतात. मनुष्यदेहातील पाणी, वायू, अग्नी, आकाश या ऊर्जा (energy ) असल्याने  law of indestructibility of energy  नुसार त्या नष्ट न होता अनंतात विलीन होतात म्हणजे एका मोठ्या कोषात ( Universal Reservoir ) खेचल्या जातात. शरीराचे material जळून ते अन्य अनेक materials मध्ये रूपांतरित होते.  

२) आपण नेहेमी ऐकतो की " विज्ञानाची इतकी प्रगती झाली आहे की आता माणसाची पावले चंद्रावरसुद्धा उमटली "! पण एक अतिशय महत्वाची गोष्ट आपण विसरतो. माणसाचे चंद्राला पाय जरी लागले तरी त्या चंद्रामुळे पृथ्वीवर येणारी भरती आणि ओहोटी बंद झालेली नाही. त्याचा आपल्यावर होणारा परिणाम बदललेला नाही.

३ ) माणसाचा देह हे जरी material असले तरी आत्मा ही नष्ट न होणारी शक्ती आहे. येथे एक महत्वाची गोष्ट अशी  की या शक्तीवर  एक किंवा अनेक जन्मांमधून तयार झालेल्या आसक्ती, भावभावना, इच्छा यांचे संस्कार झालेले असतात. हिंदू तत्वज्ञानानुसार जिवंत माणूस हा त्याच्या, देह सोडून गेलेल्या पूर्वजांच्या आत्म्यांच्या साखळीचाच एक भाग असतो.

४ ) अत्यंत महत्वाची गोष्ट -  माणसाच्या देहाच्या आकाराच्या प्रमाणात त्याला कमी अधिक अन्न लागते. देह सोडल्यावर आत्म्याला अन्नाचा केवळ वास पुरेसा असतो. त्यामुळे तेथे quantity ला स्थानच नसते. पदार्थांच्या वासानेच तो तृप्त होतो. म्हणूनच आत्म्याला ठेवल्या जाणाऱ्या जेवणाच्या पानावर वासापुरते थोडे थोडे अन्न वाढले जाते. त्याचप्रमाणे त्या आत्म्याला अन्नातील नक्की कुठला रस आवडेल याची कल्पना नसल्याने चवीच्या सर्व रसांचे म्हणजे- कडू, गोड, तिखट, खारट, तुरट आणि आंबट अशा सर्व चवीचे पदार्थ श्राद्धाला केले जातात. उदा - कारल्याची भाजी, आवळ्याची-आमसुलाची  चटणी, लाडू-खीर, वडे, गवार - भोपळ्याची भाजी इत्यादी.  तीव्र मधुमेह असलेल्या माणसाने जिवंतपणी गोड खाणे पूर्ण बंद केले असले तरी अशा व्यक्तीच्या मृत्युनंतर, त्याला ते बंधन पाळायची गरज नसते. मधुमेह शरीराला होतो, आत्म्याला नाही.

५ ) आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या शास्त्रात पितरांच्या ३ पिढ्यांना आवाहन केले जाते. त्याबरोबरच कुटुंबातील त्या आधीच्याही मोक्ष / मुक्ती / सद्गती  न मिळलेल्यांना, ज्यांच्यावर रीतसर दहनसंस्कार होऊ शकले नाहीत अशांना, गर्भातच मरण पावलेल्यांना, तसेच विविध अवस्थेत मृत पावलेल्यांना अन्न  / पिंड दिले जातात. शस्त्राघाताने मृत्यू आलेल्या, घातपाताने मरण आलेल्या, संन्यास घेतलेल्या इत्यादी पूर्वजांसाठी करायच्या श्राद्धासाठी विशिष्ट दिवस राखून ठेवण्यात आले आहेत.

६ ) एखाद्याने संगीताचे उत्तम प्रशिक्षण घेतले तर तो अधिक चांगले गाऊ शकतो. पण म्हणून बाकीच्यांनी गाऊच नये असा नियम नाही. म्हणूनच श्राद्धासाठी जर जाणकार पुरोहित मिळाला नाही, जेवणासाठी शात्रोक्तपणे  पदार्थ करता आले नाहीत, सगळे धार्मिक विधी करणे शक्य झाले नाही, कुठल्याही कारणामुळे परवडत नाही असे असेल तरी अत्यंत श्रद्धेने अर्पण केलेला, जो जमेल, जसा जमेल तसा अन्न नैवेद्य पितरांना नक्कीच पोचतो. त्यासाठी कर्ज काढून, उधार उसनवार, बडेजाव  करू नयेत. 

७ ) काही जणांना वाटते कशावरून हे सर्व पितरांना पोचते ? एक विचार करा, आपण देवाला, भरभरून देण्याची  प्रार्थना करतो आणि  पाच पेढ्यांचा नैवेद्य दाखवतो. तो देवापर्यंत पोचतो की नाही याचा विचार कधी करतो का ? किंबहुना तो पोचतच नाही कारण तो प्रसाद म्हणून आपणच खातो. म्हणूनच आपण त्याला शब्दही नैवेद्य "दाखवणे" असाच योजला आहे. आपण ३६४ दिवस पितरांसाठी काहीही करीत नाही. मग  केवळ श्राद्धाच्या, सर्वपित्रीच्या एका दिवशी सर्व पितरांसाठी मिळून चमचा चमचा वाढलेल्या अन्नाचा  इतका विचार कशासाठी करायचा ? समजा पितरांपर्यंत नाही पोचले तरी कावळा आणि इतर पक्षी, कीटक, प्राणी हे तरी ते अन्न खातीलच ना ?  

८ ) ते अन्न खाणारे कावळा आणि इतर पक्षी, कीटक, प्राणी हे जीवनसाखळीची एकेक कडी असते. त्या मूक प्राण्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये कावळा हा तर आपल्या अवतीभवतीचे, आपल्या दृष्टीने अनेक त्याज्य पदार्थ खातो व स्वच्छता राखतो. माणसाला सर्वाधिक प्राणवायू, सावली देणारे, जमिनीची धूप रोखणारे वड - पिंपळासारखे वृक्ष तर कावळ्याच्या विष्ठेतूनच रुजतात. त्यामुळे कावळ्याला आत्मा दिसतो की नाही याच्या विचारापेक्षा त्याची ही उपयुक्तता, आपला स्वार्थ म्हणून तरी जोपासायला हवी.

९ ) हल्ली मृत माणसांच्या नावाने, वृत्तपत्रांमधून वर्षानुवर्षे त्यांचे फोटो, कविता, श्रद्धांजलीचा मजकूर, टीव्हीवर जाहिराती, गावभर मोठमोठे फ्लेक्स बोर्ड अशा गोष्टी हजारो रुपये खर्चून केल्या जातात. अगदी कळकळीने भावना व्यक्त केलेल्या दिसतात. व्हॉट्स ऍप, फेसबुक यावरूनही हे मेसेज फिरतात. कशावरून ते या मृत व्यक्तींना / पितरांना पोचते, असा प्रश्न कुणीही विचारत नाही. त्यापेक्षा या जाहिरातींचे हजारो रुपये, गरिबांना द्या, असे कुणीही का म्हणत नाही ? बहुतेक सगळी माध्यमे ही फक्त हिंदूंच्याच बाबतीत पुरोगामी आहेत. पण ती देखील असल्या जाहिराती छापून पैसे कमविण्याचा धंदा करतातच ना !  

१० ) आपल्या धर्मानुसार आत्म्यांना अन्न अर्पण करणे हेच फार महत्वाचे मानलेले आहे. त्या ऐवजी कांही मंडळी कोरडा शिधा ( तांदूळ, गहू, साखर, डाळ इत्यादी ) अर्पण करतात. पण विचार करा, एखादा अत्यंत भुकेला माणूस तुमच्या पुढे उभा आहे. त्याला त्यावेळी तुम्ही जरी १ / १ गोण भरून  डाळ,तांदूळ हे पदार्थ दिलेत तर त्यावेळी त्याची भूक भागेल का ? ते तुमचे पुण्यकर्म ठरेल पण श्राद्ध मात्र नक्कीच ठरणार नाही ! अन्नदान हे असे एकच दान आहे की ते घेणारा, त्याचे पोट भरल्यावर तरी तृप्तीने " आता पुरे, आणखी नको " असे म्हणतो. अन्य कुठल्याही प्रचलित दानांच्या बाबतीत असे घडू शकत नाही.

११ ) तुमच्या दिवंगत आईवडिलांनी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगितले असेल / लिहून ठेवले असेल की त्यांचे क्रियाकर्म, श्राद्ध करू नका, तरीही त्यांच्या मृत्युनंतर या गोष्टी तुम्ही नक्कीच करा. कारण माणसे असे कांही सांगतात तेव्हा त्यांचे विचार हे इथल्या अनुभवानुसार आणि ज्ञानानुसारच असतात. पण परलोकात गेल्यावर, आपण पृथ्वीवर मुलाबाळांना असे सांगून चूक केली, असे जर त्यांच्या लक्षात आले तर ते तुम्हाला पुन्हा येऊन " माझे श्राद्ध कर रे बाळा " असे सांगू शकत नाहीत. त्यामुळे हजारो वर्षे आपल्या धर्मात अस्तित्वात असलेले विधी, एक दिवस करायला काय हरकत आहे ?

१२) दिवंगत पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ एखाद्या संस्थेला देणगी देणे, पाणपोई / विहीर बांधणे, मंदिराला दान देणे ही सर्व खूप मोठी सत्कार्ये / पुण्यकर्मे आहेत. पण हे श्राद्धाला पर्याय नक्कीच नाहीत.

१३) आपल्या धर्मामध्ये असाही एक विश्वास आहे की माणसाबद्दलच्या सर्व गोष्टी देवाने स्वतःच्या हातात ठेवल्या आहेत. पण माणसाला संतती व संपत्ती देण्याची सर्व सूत्रे मात्र त्याने माणसाच्या दिवंगत पूर्वजांवर सोपविली आहेत.  

१४ ) कर्मफळाचा बाऊ करू नका. तुमची जन्मपत्रिका अचूक असेल तर त्यातील ग्रहस्थिती ही तुमचे जन्म घेताना असलेले गुण दाखविणारे प्रगतीपुस्तक असते. त्यावरून तुमचे आयुष्य कसे असू शकेल याचे केवळ अनुमान करता येते. पण तसेच अचूक घडत नाही. ते तुमचे भविष्य नसतेच मुळी ! कारण तुमच्या आयुष्यात चांगल्या कर्तृत्वाने तुम्हाला अनेक गोष्टी पूर्ण बदलता येतात. किंबहुना तेच करण्यासाठी तुम्ही जन्म घेतलेला असतो. आधीच्या इयत्तेतील प्रगतीपुस्तक हे तुमच्या तोपर्यंतचे "कर्मफळ" दाखविते. पुढच्या इयत्तेत तुम्ही जोरदार अभ्यास करून सुवर्णपदकही जिंकू शकता. म्हणूनच अत्यंत अशिक्षित, गरीब आणि मागास भागात जन्मलेला माणूसही खूप मेहेनतीच्या जोरावर डॉक्टर, सनदी अधिकारी, वैज्ञानिक झालेला पाहायला मिळतो. रिक्षावाल्याची मुलगी  सिए, भांडीवाल्या बाईचा मुलगा कलेक्टर, हमालाची मुलगी डॉक्टर झालेली आपण पाहतो. कर्माचे फळ सांगणारा कर्मविपाक सिद्धांताबरोबरच तुमचे प्रयत्न, श्रद्धेने केलेली मेहेनत फळाला येते. 

१५ ) आताच्या युगात  सर्व संदर्भ, व्यवहार, दैनंदिन आयुष्य असे सगळेच खूप बदलले आहे. लाखो ब्राह्मणांनी गेल्या कांही  पिढ्यांपासून आपले व्यवसाय बदलले. दान घेणे ( प्रतिग्रह ) बंद केले असून आता ते दान, देणग्या  देऊ लागले आहेत. त्यामुळे या कामामध्ये प्रशिक्षित असलेल्या ब्राह्मणाला त्याचा मोबदला म्हणून जरूर दान करावे. पण ज्याला अन्नाची अत्यंत गरज आहे. अशा गरिबाला अन्नदान करणे महत्वाचे आहे.

१६ ) मनुष्य जन्मात आत्म्याच्या अनेक इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात. मृत्यूपश्चात त्याच्या धन, पैसा, स्थावर,कपडे, सोनेनाणे अशा जड रूपातील वस्तू त्याला अर्पण करता येत नाहीत.( चीनमध्ये तसेच इजिप्तमधील पिरॅमिड्समध्ये अशा वस्तूही पुरलेल्या आढळतात ). पण आपल्या श्रद्धेनुसार आत्मा वासामुळे तृप्त होतो. म्हणूनच त्याला अन्न अर्पण करण्याला महत्व दिलेले आहे. याच कारणामुळे श्राद्धामध्ये अत्यंत उत्तम सुगंध असलेली फुले वापरली जातात. 

१७ ) मेटा सायन्सचे श्री. जॉर्ज मिक यांनी लिहिलेले " आफ्टर वुई डाय व्हॉट देन ?" नावाचे एक पुस्तक आहे.  त्याचा मराठी अनुवाद ( " मृत्यूनंतर होते तरी काय? अनुवाद - पद्मा कुलकर्णी ) पुण्याच्या प्रसाद प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. त्यात मिक यांनी या विषयावर जगभर केल्या गेलेल्या शेकडो वैज्ञानिक प्रयोगांची माहिती दिली आहे. यात नावानिशी माहिती, आत्म्याची छायाचित्रेही दिली आहेत. त्यात हिंदू तत्वज्ञानाचा पुसटसा उल्लेखही केलेला नाही. तरी त्यांचे सर्व निष्कर्ष मात्र , हिंदू धर्मांतील या विषयीची सर्वच्या सर्व अनुमाने  खरी आहेत यावर शिक्कामोर्तब करतात. ज्या ख्रिश्चन धर्मात पुनर्जन्मच नाही, तो धर्म मानणारे शास्त्रज्ञ  पुनर्जन्म या  विषयावर संशोधन करायला कचरत नाहीत.

१८ ) जातपात, राजकीय मते, पुरोगामी आणि अतिवैज्ञानिक विचार अशा गोष्टी क्षणभर बाजूला ठेऊन आपण शांतपणे हिंदू धर्माबद्दल विचार करू या ! या देशात, या धर्मात  हजारो वर्षे आणि आजवर आपले कोट्यवधी पूर्वज जे काही करीत होते ते सर्व मागासलेले व त्या अंधश्रद्धा होत्या का ? ते सर्वच मूर्ख होते काय ?  हजारो वर्षात त्यामध्ये कुणीही पुरोगामी, वैज्ञानिक विचारांचा उपजलाच नाही कसा ?

या विषयावर आपल्याकडे अत्यंत सुसंगत सिद्धांत असूनही, अनेक ग्रंथ उपलब्ध असून त्यावर संशोधनच होत नाही. अनेक विदेशी मंडळी आपल्या या शास्त्राकडे आकर्षित होत आहेत. भारतात येऊन श्राद्ध करतात. शेकडो वर्षे आपल्यावर राज्य करणाऱ्या आक्रमकांनी आपल्यात न्यूनगंड पेरला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी वैज्ञानिक,अंधश्रद्धा म्हणून आधीच फेटाळल्या जातात. ज्याचे पुरावे आपल्याला सापडले नाहीत किंवा शोधता आलेले नाहीत " त्या गोष्टीच असू शकत नाहीत " असे आपल्याला म्हणता येणार नाही हे सर्वात महत्वाचे आहे.

श्राद्ध करावे की नाही, श्रद्धा कुठली आणि विज्ञान कुठले हे ज्याचे त्याने ठरवावे. आपल्या धर्मातील या एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीची नीट माहिती करून घ्यावी. त्यानंतर आजच्या काळाशी  सुसंगत असे काय करावे , हे प्रत्येकाने आपल्या सारासार विवेकानुसारच ठरवावे.

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३