Pitru Paksha Sarvapitri Amavasya 2024:पितृपक्षातील सर्वांत महत्त्वाचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावास्या. सर्वपित्री अमावास्येबाबत अनेक कथा, मान्यता सांगितल्या जातात. सर्वपित्री अमावास्येबाबत एक वेगळीच भावना जनमानसात असल्याचे पाहायला मिळते. पितृपक्षातील अखेरचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावास्या. सर्वपित्री अमावास्या विशेष मानली जाते. वर्षभरात येणाऱ्या सर्व अमावास्यांमध्ये सर्वपित्री अमावास्येला वरचे स्थान असून, याला विशेष महत्त्व आहे. यंदा २०२४ मध्ये कधी आहे सर्वपित्री अमावास्या? जाणून घेऊया...
पितृपक्ष सुरू झाला की, वद्य प्रतिपदेपासून प्रत्येक दिवशी श्राद्ध तर्पण विधी केला जातो. आपल्या कुटुंबातील व्यक्ती ज्या तिथीला गेली, त्या तिथीला त्यांचे स्मरण करून श्राद्ध तर्पण विधी केला जातो. श्रद्धापूर्वक केल्या जाणाऱ्या पूर्वजांच्या स्मरणाला श्राद्ध म्हटले जाते. पितरांचे, पूर्वजांचे स्मरण करून, श्राद्धाच्या दिवशी त्यांचे आवडते पदार्थ करून स्वयंपाक केला जातो आणि एक ताट पूर्वजांच्या नावाने ठेवले जाते. कुटुंबातील निधन पावलेल्या व्यक्तींच्या त्यांच्या तिथीला श्राद्ध केले जाते. तर मग सर्वपित्री अमावास्येला कोणकोणाचे श्राद्ध करता येते किंवा केले जाते, ते पाहुया...
सर्वपित्री अमावास्या: ०२ ऑक्टोबर २०२४
भाद्रपद सर्वपित्री अमावास्या प्रारंभ: मंगळवार, ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्रौ ०९ वाजून ३८ मिनिटे.
भाद्रपद सर्वपित्री अमावास्या समाप्ती: बुधवार, ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्रौ १२ वाजून १८ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन पद्धत असल्यामुळे सर्वपित्री अमावास्येला करावयाचे श्राद्ध कार्य बुधवार, ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी करावे, असे सांगितले जाते. तसेच याच दिवशी सूर्यग्रहण आहे. यंदाचा पितृपक्ष कालसर्प ग्रहण योगात आहे. पितृपक्षाच्या प्रारंभी चंद्रग्रहण लागले होते आणि आता समाप्तीदिनी सर्वपित्री अमावास्येला सूर्यग्रहण आहे.
ते सर्वजण सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध कार्य करू शकतात
वर्षभरात, पितृपक्षात कुणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकले नाहीत, कुटुंबातील व्यक्तीच्या निधनाची नक्की तिथी माहिती नाही किंवा आजारपण, बदली, दौरे अशा अनेक कारणांमुळे जे कुणी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकलेले नाहीत. ते सर्वजण सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध कार्य करू शकतात. तसेच पौर्णिमा, अमावास्या आणि चतुर्दशी या तिथींनी निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्यही सर्वपित्री अमावास्येला करावे, असे सांगितले जाते. यावेळी कावळा, गाय, श्वान यांना काकबळी काढून ठेवावा, असे सांगितले जाते. पूर्वजांच्या ऋणातून उतराई होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करण्यात येतो.
आर्यमा यांचे स्मरण करून सर्वपित्री अमावास्येला केलेले श्राद्ध कार्य
श्रीकृष्णानेही सर्व पितरांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे आर्यमा यांचे स्मरण करून सर्वपित्री अमावास्येला केलेले श्राद्ध कार्य करावे, असे म्हटले जाते. पितृपक्षात एका व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती सात गोत्रांतील आपल्या संबंधितांचा उद्धार करतो, असे समजले जाते. श्राद्ध करणारा व्यक्ती हा त्याचे वडील, आजोबा, पणजोबा तसेच आई, आजी, पणजी यांच्या नावाने पिंडदान, तर्पण करतो. त्याचबरोबर आईचे वडील, आजोबा, पणजोबा, आईची आई, आजी, पणजी यांचाही या श्राद्धात उल्लेख येतो. त्याचप्रमाणे पत्नी, मुलगा, मुलगी, बंधू, भगिनी, काका, मामा, आत्या, मावशी, मोक्षगुरू, पितागुरू यापैकी जे मृत झाले असतील, त्यांचेही स्मरण केले जाते. एवढेच नव्हे तर त्याचे मित्र, उपकारकर्ते, जगात ज्यांना कोणी वारस नाही, ज्यांना कोणी पिंडदान, तर्पण करायला नाही, करीत नाही, त्यांच्यासाठीही सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असते. त्यामुळे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केले नाही, त्याने केवळ सर्वपित्री अमावास्येलाच श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात, असे सांगितले जाते.