Pitru Paksha 2023 Ashtami Vrat: मराठी वर्षांतील सण-उत्सवांप्रमाणे भाद्रपदात येणाऱ्या पितृपंधवड्याला तितकेच महत्त्व आहे. पूर्वजांचे, पितरांचे श्रद्धापूर्वक स्मरण करण्याचा हा काळ मानला जातो. पितृपक्ष पंधवड्याबाबत अनेक समजुती आपल्याकडे आहेत. पितृपंधरवड्यात मुंज, विवाह, वास्तुशांती यांचे मुहूर्त नसतात. मात्र, काही कार्ये केले जाऊ शकतात, असे म्हटले जाते. पितृपक्षातील अष्टमीला गजलक्ष्मी स्वरुपातील लक्ष्मी देवीचे पूजन करणे शुभ-पुण्यदायक मानले गेले आहे. काही मान्यतांनुसार, यामुळे आठपट पुण्य मिळू शकते, असे म्हटले जाते. गजलक्ष्मी व्रत कसे करावे? जाणून घ्या...
पितृपक्षात जागेची खरेदी, वाहनाची खरेदी, विवाह मीलनासाठी पत्रिका पाहणे, डोहाळे जेवण, जननशांतीसाठी, पंचाहत्तरी यांसारख्या शांती आदी सर्व कार्ये करता येऊ शकतात, असे म्हटले जाते. यंदा शुक्रवार, ०६ ऑक्टोबर २०२३ रोजी पितृपक्षातील अष्टमी तिथी आहे. गजलक्ष्मी स्वरुपातील लक्ष्मी देवीचे व्रत करणे लाभदायी मानले जात आहे. विशेष म्हणजे यंदा शुक्रवारी अष्टमी आल्याने या दिवसाचे महत्त्व अधिक वाढल्याचे म्हटले जात आहे.
‘असे’ करावे व्रतपूजन
या दिवशी तिन्ही सांजेला गजलक्ष्मी व्रत आचरावे. त्यापूर्वी सायंकाळी स्नानादी कार्य उरकून घ्यावीत. पूजेच्या ठिकाणी चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र ठेवावे. केशरयुक्त गंधाने अष्टदल रेखाटावे. यानंतर अक्षता ठेवून त्यावर पाण्याने भरलेला कलश स्थापन करावा. कलशाजवळ हळदीने कमळ काढावे. यावर लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा तसबीर ठेवावी. यानंतर मातीचा गजराज स्थापन करावा. लक्ष्मी देवी आणि गजराजाची षोडशोपचार पूजा करावी.
श्रीयंत्राचे पूजन करावे
लक्ष्मी देवी आणि गजराजाला फुले, फळे अर्पण करावीत. सोने, सोन्याचे दागिने अर्पण करावेत. शक्य असल्यास या दिवशी नवीन सोन्याची खरेदी करून ते अर्पण करावे. यथाशक्ती आणि यथासंभव हे व्रत करावे. शक्य असेल, तर चांदाच्या गजराजाची स्थापना केल्यास उत्तम मानले जाते. याशिवाय लक्ष्मी देवीच्या मूर्तीसमोर श्रीयंत्र ठेवून त्याचेही पूजन करावे. शक्य असल्यास कमळाची फुले अर्पण करावीत.
‘या’ मंत्रांचा जप अत्यंत उपयुक्त
गजलक्ष्मी व्रचाचरणात मिठाई आणि फळे ठेवावीत. पूजन झाल्यानंतर लक्ष्मी मंत्रांचा जप करावा. यात, 'ॐ योगलक्ष्म्यै नम:', 'ॐ आद्यलक्ष्म्यै नम:' आणि 'ॐ सौभाग्यलक्ष्म्यै नम' अशा मंत्रांचा १०८ वेळा जप करावा. संपूर्ण निष्ठा आणि समर्पण वृत्तीने हे व्रत करावे, असे सांगितले जाते. यानंतर तुपाचा दिवा अर्पण करावा. लक्ष्मी देवीची आरती करावी. उपस्थित सर्वांना प्रसादाचे वाटप करावे.
- सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.