चैत्र कृष्ण एकादशीला 'वरुथिनी एकादशी' असे नाव आहे. आपल्याकडे प्रत्येक एकादशीची एक वेगळी कथा आहे. धर्मराजाने भगवान श्रीकृष्णाला 'एखादे प्रभावी व्रत सांगा' अशी विनंती केली आणि विनंतीनुसार श्रीकृष्णाने हे व्रत धर्मराजाला सांगितले, अशी कथा आहे. हे व्रत पापनाशक आणि इहपरलोकी सुख समाधान देणारे आहे. या व्रताच्या प्रभावाबद्दल आणखीही अनेक कथा ग्रंथांतरी नमूद आहेत. त्यापैकी एक कथा अशी-
काशीमध्ये राहणाऱ्या एका ब्राह्मणाला तीन मुलगे होते. त्यांच्यातील सर्वात मोठा मुलगा दुर्गुणी, दुराचारी होता. ब्राह्मण रोज भिक्षा मागून कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे. कालांतराने तो आजारी पडला. तेव्हा त्याने या तिन्ही मुलांना भिक्षेसाठी जाण्याचा परिपाठ दिला. त्याच वेळी त्यांना वेदाध्ययन करण्याचा सल्लाही दिला. त्याच्या सांगण्यावरून दोन मुलांनी वेदाध्ययन केले. नंतर ते दोघे आपला उदरनिर्वाह अतिशय मानाने करू लागले. मोठा मात्र काही न करता तसाच राहिला. इतकेच नव्हे, तर एका मुलीला फसवून घरी घेऊन आला. त्यावेळी ब्राह्मणाने त्याला घराबाहेर काढले. तो मुलगा दुसऱ्या गावी दारिद्रयात राहू लागला. एक दिवशी त्याच्या लहान भावाने त्याला `वरुथिनी एकादशी'चे व्रत करण्यास उद्युक्त केले. यथाकाल वडिलांनी त्याला पुन्हा घरात घेतले.
दुसऱ्या कथेनुसार कुशवती नगरीमध्ये महोदय नामक एक श्रीमान वाणी राहत होता. त्याने हे वरुथिनी एकादशीचे व्रत मोठ्या श्रद्धेने केले. त्याचे फळ त्याला मिळाले. तो त्या नगरीचा राजा झाला. त्याने आपल्या प्रजेला या व्रताचे महात्म्य सांगून सर्वांनाच हे व्रत करण्याचे आवाहन केले. त्याच्या शब्दाला मान देऊन त्याप्रमाणे हे व्रत केले. त्यामुळे त्याच्या राज्यात दु:खी, गरीब असे कोणीच राहिले नाही. सारेच सुखी व समाधानी जीवन व्यतीत करू लागले.
वरील दोन्ही कथांवरून लक्षात येते, की वरुथिनी एकादशीच्या व्रतामुळे ग्रहदशा पालटण्यास मदत होते. परंतु, केवळ हे कारण पुरेसे नाही, तर ही प्रयत्नांना उपासनेची जोड आहे. केवळ व्रत करून यशस्वी होता आले असते, तर कोणी प्रयत्न केलेच नसते. परंतु, अशा प्रकारची उपासना आपले मन एकाग्र करण्यास मदत करते. प्रापंचिक विषयातून मन दूर करून आपल्या ध्येयावर केंद्रित करण्यास मदत करते. एकादशीच्या दिवशी दोन्ही वेळचा उपास हा वासनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुचवलेला उपाय आहे. तोंडावर ताबा ठेवला की आपोआप मनावर ताबा येतो. मन शांत असले की ध्येयाचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो. ही महती आहे एकादशीची! महिन्यातून दोनदा हे व्रत येते. ते भक्तिभावाने केले असता, त्याचे अनेक लाभ होतात.