पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. २३ मे रोजी ऑस्ट्रेलियात पंतप्रधान मोदींचे पारंपरिक पद्धतीने जंगी स्वागत करण्यात आले. भारतात जशी धुपारती करतात तशी ऑस्ट्रेलियामध्ये स्मोकिंग सेरेमनी करण्याची प्रथा आहे. या प्रथेनुसार धुपारतीने ओवाळून मोदींचे स्वागत करण्यात आले. ही प्रथा अतिशय शुभ मानली जाते. अशातच कानावर वैदिक मंत्रांचा जयघोष आणि गणपती बाप्पा मोरयाचा गजर कानावर पडल्यामुळे तेथील वातावरण भारावून गेले होते. आज अंगारक विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर मोदींचे असे स्वागत म्हणजे शुभशकूनच म्हटला पाहिजे!
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी ऑस्ट्रेलियाने कोणतीही कसर सोडली नाही. पीएम मोदींनी सिडनीच्या कुडोस बँक एरिना येथे २० हजारांहून अधिक भारतीयांना संबोधित केले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मोदींचे जोरदार स्वागत केले.
या भाषणापूर्वी त्यांचे वैदिक मंत्रोच्चार आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी भव्य स्वागत करण्यात आले. रिसेप्शन दरम्यान, एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे ऑस्ट्रेलियातील पाहुण्यांचे पारंपारिक स्वागत, ज्याला 'स्मोकिंग सेरेमनी' म्हणतात. मोदींनीदेखील त्या प्रथेचे स्वागत केले आणि तेही त्याचा एक भाग झाले. मोदींसह ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीज यांनी स्मोकिंग सेरेमनीचा लाभ घेतला.
स्मोकिंग सेरेमनी का करतात?
ऑस्ट्रेलियातील स्मोकिंग सेरेमनी ही एक पारंपारिक प्रथा आहे, ज्यामध्ये स्थानिक वनस्पतींच्या पानांचा धूर देऊन श्वसन शुद्धी केली जाते. या वनौषधींच्या धुराने आध्यात्मिक आणि शारीरिक शुद्धी होते, अशी श्रद्धा आहे. असे मानले जाते की, स्मोकिंग सेरेमनीमुळे वाईट तसेच नकारात्मक लहरी दूर जातात. पूर्वी बाळाच्या जन्माच्या वेळी किंवा दीक्षा आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये हे केले जायचे. आता परदेशी पाहुण्यांच्या स्वागतादरम्यानही स्मोकिंग सेरेमनी केली जाते. हा सोहळा आदिवासी समाजातील सदस्य करतात.
एकूणच हा सोहळा पाहता अंगारकीच्या मुहूर्तावर विनायक पावला असेच म्हणता येईल. बाप्पाच्या कृपेने या राजकीय दौऱ्याचा लाभ आपल्या देशाला होवो हीच प्रार्थना!