साधारणपणे, लग्नानंतर वधू-वरांनी देवी-देवतांचे आशीर्वाद घेण्याची प्रथा जवळपास सर्वच धर्मांमध्ये आहे. प्रसिद्ध मंदिरात किंवा धार्मिक स्थळांमध्ये वर वधू देवदर्शनासाठी जातात. परंतु आपल्या देशात एक असं मंदिर आहे जिथे लग्नानंतर विवाहित पुरुष जात नाहीत. त्यांच्या तिथे जाण्याने अनेक त्रास सहन करावे लागतात अशी लोकसमजूत प्रचलित आहे. ते मंदिर नेमके कोणते आणि कुठे ते जाणून घेऊ.
पुष्करचे ब्रह्म मंदिर
ब्रह्मदेवाबद्दल आपण अनेक कथा ऐकल्या आहेत परंतु त्यांचे मंदिर क्वचितच बघायला मिळते. असेच एक मंदिर राजस्थान येथील पुष्कर येथे आहे. असे मानले जाते की जर नवविवाहित मुले या मंदिरात आली तर त्यांना वैवाहिक आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. यामागचे कारण म्हणजे ब्रह्मदेवाला मिळालेला शाप!
पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने ब्रह्मांडाच्या निर्मितीसाठी राजस्थानातील पुष्कर येथे यज्ञाचे आयोजन केले होते. या यज्ञात त्यांना पत्नीसोबत बसावे लागले, परंतु पत्नी सावित्रीला यायला उशीर होत असल्याचे पाहून त्यांनी नंदिनी गायीच्या मुखातून गायत्री प्रकट केली आणि तिच्याशी विवाह केला आणि यज्ञ करण्यास सुरुवात केली. जेव्हा सावित्री पोहोचली तेव्हा ब्रह्माजींच्या शेजारी एक दुसरी स्त्री बसलेली पाहून तिला राग आला आणि शाप दिला की ज्या जगाच्या निर्मितीसाठी तुम्ही माझी वाट न पाहता दुसऱ्या स्त्रीची निर्मिती केलीत, ते जग तुमची पूजा करणार नाही. त्यांनाही तुमचा विसर पडेल. जिथे तुमचे मंदिर असले त्या मंदिरात विवाहित पुरुषांनी प्रवेश केला तर त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतील. मात्र, या एका चुकीसाठी तुम्हाला संपूर्ण दोषी न ठरवता अविवाहित पुरुष, तसेच सर्व वयोगटाच्या तसेच विवाहित, अविवाहित महिला तुमचे दर्शन घेतील आणि पूजा करून विश्वनिर्मितीसाठी कृतज्ञतादेखील व्यक्त करतील.
सावित्रीचे मंदिर
पुष्करच्या या मंदिराजवळ त्यांच्या पत्नी सावित्री मातेचे मंदिर एका वेगळ्या टेकडीवर बांधलेले आहे. वरील कथेनुसार ब्रह्मदेवाला शाप देऊन राग शांत झाल्यावर सावित्रीने पुष्करजवळच्या टेकडीवर जाऊन तपश्चर्येला सुरुवात केली आणि तपश्चर्येत लीन झाली. नंतर तिथेच राहिली. म्हणून महिला भाविक या मंदिरात जाऊन आल्यावर सौभाग्य वाण म्हणून मेहंदी, कुंकू आणि बांगड्या इत्यादी वस्तू खरेदी करतात आणि आपल्या सौभाग्यासाठी सावित्री मातेची पूजा करतात.