>> ज्योत्स्ना गाडगीळ
बाईपण भारी... चित्रपटात रोहिणी हट्टंगडी यांच्या यजमानांची भूमिका केलेले कलाकार मुळात अभिनेते नाहीच! फेसबुकवर चित्रपटविशेष एका समूहावर त्यांच्याबद्दल वाचलं, की केदार शिंदे शूटिंगसाठी लोकेशन म्हणून एका घराची पाहणी करायला गेले असता, ज्या गृहस्थांनी हसून दार उघडत स्वागत केलं, त्यांना पाहता केदार शिंदे यांनी मनातल्या मनात त्यांची भूमिका ठरवून टाकली आणि त्यांच्याकडून कसलेल्या अभिनेत्यासारखा उत्तम अभिनय करवूनही घेतला. या मोठ्या संधीला कारणीभूत ठरली, ती छोटीशी स्माईल!
एकाने जांभई दिली, की त्याला पाहणाऱ्यालाही आपोआप जांभई येते. त्याला पाहून तिसऱ्याला, तिसऱ्याचं पाहून चौथ्याला! झोप आलेली नसताना एकामुळे सगळेच आळस देऊ लागतात, त्याचप्रमाणे एखाद्याकडे बघून तुम्ही ओळखीची स्माईल दिलीत, की समोरच्याला नाईलाजाने का होईना हसावंच लागतं. भले तो नंतर विचार करत का बसेना! पण त्यालाही त्याच्या विचारांना क्षणिक ब्रेक लागून ओठावर हसू उमटतं, तेही छोट्याशा स्माईलने! दुःख जसं संसर्गजन्य आहे तसे सुखही संसर्गजन्य आहे!
सिनेमातल्या आया मुलांना गुड मॉर्निंग करत लाडात उठवतात, आपल्याकडे आया पांघरूण खेचून, पंखा बंद करून, मोठ्याने गाणी लावून आपली सकाळ करतात. त्यांचीही सकाळ वाईट आणि मुलांचीही! त्रासून सुरुवात झाली की तोच त्रास पुढे संक्रमित केला जातो. त्यापेक्षा सुप्रभात, गुड मॉर्निंग, राम राम, जय श्री कृष्ण म्हणत आपली आणि दुसऱ्यांची सकाळ चांगली करणं इष्ट नाही का? त्या म्हणण्यावर आणि त्यावर मिळालेल्या प्रतिसादावरून आवाजाचं आणि मूडचं टेम्परामेंट कळतं. नसेल ठीक तर ते आपोआप नॉर्मल होतं, छोट्याशा स्माईलने!
गोड स्माईल देऊन उठवणारं कोणी नसेल तर आपणच उठा, आरशात बघा आणि स्वतःकडे बघून गोड हसत गुड मॉर्निंग म्हणा. आयुष्यात कितीही ताणतणाव असला तरी दिवसाची सुरुवात स्माईलने करावी. देहबोली आपोआप बदलते. झुकलेले खांदे आणि निराश झालेलं मन नव्या ऊर्जेने दिवसाला सामोरं सज्ज होतं. हसणारी, हसवणारी व्यक्ती प्रत्येकाला आवडते. यासाठी फार विनोदी स्वभाव हवा असं नाही, फक्त ओठावर हवं प्रसन्न हसू.
स्मित हास्य हा सौंदर्य खुलवणारा दागिना आहे, मन पालटणारी थेरेपी आहे, ती दुसऱ्यांवर आजमावून पाहण्याआधी सुरुवात स्वतःपासून करा.