- मोहनबुवा रामदासीरघुवीर भजनाची मानसी प्रीती लागो।रघुवीर भजनाची अंतरी वृत्ती जागो।श्री समर्थांचा अत्यंत लाडका शब्द म्हणजे रघुवीर. समर्थ रामासाठी रघुवीर शब्द उच्चारतात. जय जय रघुवीर समर्थ ही गर्जना तर चारशे वर्षांपूर्वी आळशावरी गंगा आली, याप्रमाणे महाराष्ट्राला संजीवनीचा महामंत्र देणारी ठरली. मृतप्राय झालेला समाज या एका गर्जनेने जागा होतो. किती ताकद असेल समर्थांच्या सामर्थ्याची, याची कल्पना येते. समर्थांचा रघुवीर म्हणजे श्रीराम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वसामान्य भक्त हा मूर्ती, प्रतिमा किंवा प्रतीकात्मक कशाचा तरी आधार घेऊनच देवाच्या देवत्वावर श्रद्धा आणि विश्वास ठेवतो. जगाच्या दृष्टीने हे योग्य असते; पण समर्थांसारखे आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांप्रमाणे ते भाव, भक्ती आणि ईश्वराबद्दलच्या प्रेमाचे अधिष्ठान अबाधित ठेवूनच केवळ मूर्ती, प्रतिमांच्या पलीकडे ते विश्वात्मक चैतन्य असतं. त्याच्यावर प्रेम करायला सांगतात. रघुनाथदासा कल्याण व्हावे किंवा आता विश्वात्मके देवे या देवत्वाबद्दलच्या उदात्त कल्पना समर्थांनी तब्बल चारशे वर्षांपूर्वी तत्कालीन समाजासमोर मांडल्या. विश्वात्मक चैतन्य आणि प्रत्येकाच्या अंत:करणात अधिष्ठान रूपाने बसलेला अंतरात्मा हेच खरं चैतन्यात्मक रामाचे स्वरूप आहे. ज्या रघुवीराचे समर्थ चिंतन करायला सांगतात, असा हा सर्वव्यापी सर्वांतर्यामी असणारा रघुवीर म्हणजे श्रीराम आहे. त्या चैतन्याच्या सत्तेवरच हे जग चालले आहे. अंत:करणातील सामर्थ्य म्हणजे राम. अंत:करणातील ऊर्जाशक्ती म्हणजे राम. अंत:करणातील प्रेरणाशक्ती म्हणजे राम. अंत:करणातील प्रेम, वात्सल्य आणि स्फूर्ती म्हणजे राम. अंत:करणातील करुणेचा आणि दयेचा सागर म्हणजे राम! या दृष्टीने श्रीरामाच्या चैतन्याशी जेव्हा खरी एकरूपता साधते, तेव्हाच अंतर्यामी असणारा हा चैतन्यघन राम अंत:करणातील वृत्तीचे जागरण घडवितो. जय जय रघुवीर समर्थ!!
अंत:करणातील सामर्थ्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 8:47 AM