एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणतात ते उगाच नाही. वास्तविक पाहता उपासाची थाळी ही रिकामी असणे अपेक्षित आहे. मध्यंतरी समाज माध्यमांवर रिकामी थाळी आणि रिकाम्या वाट्या असा फोटो उपासाची थाळी या नावे फिरत होतो. आपण त्यावर गमतीने हसत असलो, तरी उपासाची थाळी धर्मशास्त्राला अशीच अभिप्रेत आहे- रि का मी!
उपास म्हणजे काय?
उपावृत्तीच पापांची सहवास गुणी सदा,उपवास म्हणावे त्या, शरीरा शोषणे न चि।
मन व शरीर यांनी कोणतेही पापाचरण म्हणजे वाईट किंवा निंद्य आचरण करू नये व गुणीजनांचा सहवास मिळावा या दोन्ही क्रियांना मिळून उप अधिक वास म्हणजे उपवास असे म्हणतात. फक्त शरीराचे पोषण अर्थात उपास, लंघन करेल तो उपवास नव्हे. या पार्श्वभूमीवर आपण जर उपासाचे पदार्थ खाऊन उपास करत असू, तर त्याला उपास म्हणताच येणार नाही असे धर्मशास्त्र सांगते. उपासाच्या दिवशी काहीही न खाता केवळ शरीराला नाही तर विविध विकारांपासून मनालाही उपास घडावा म्हणून सत्संग करावा असे शास्त्र सांगते.
उपास केल्याने होणारे फायदे :
उपावृत्तस्य पापेभ्यो सहवासो गुणे हि य:।उपवास: स विज्ञेय: न शरीरस्य शोषणम् ।।
उपासाचे दिवशी शारीरिक लंघन केल्याने शरीराचे विकार दूर होतात, तसेच मनाचे लंघन केले तर मनाचे विकार दूर होतात. विषयांची आसक्ती दूर करण्यासाठी उपासाच्या दिवशी मन कामात, हरीकीर्तनात, भजनात रमवावे आणि अनन्यभावे भगवंताला शरण जाऊन नामस्मरण करावे.
हे सर्व वाचून सुगरणींचा हिरमोड झाला असेल, परंतु आपल्याला केवळ देहाचे नाही तर मनाचेही आरोग्य जपायचे आहे ना? ते सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. उपासाचे पदार्थ अन्य कधीही बनवून खाता येतील, पण उपासाचा हेतू साध्य करायचा असेल तर तना-मनाचा उपास अर्थात लंघन घडणे आवश्यक आहे!यंदाच्या एकादशीला तना-मनाला उपास घडवुया आणि विठ्ठल रखुमाईचे नाम घेऊया!