कुंकू सौभाग्यप्रतीक मानल्यामुळे भारतीय संस्कृतीत अनेक शुभ कार्यात त्याचा वापर होतो. स्त्रियांचे कुंकू हे लेणे ठरले. देवादिकांच्या पूजेत कुंकू अनिवार्य झाल़े लग्नपत्रिकेत कुंकू लावून मग ती नातेवाईक, आप्तेष्टांना हितचिंतकांना पाठवण्याची प्रथा सुरू झाली. हिंदु स्त्रिया नवे वस्त्र परिधान करायला काढताना त्या कापडाला प्रथम कुंकू लावतात. कुंकू हे सुवासिनीला सुवासिनीनेच लावायचे असते. विवाहप्रसंगी कित्येक ज्ञातीत वधूच्या कपाळी कुंकवाचा मळवट भरतात. सुवासिनी घरातून बाहेर पडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावत़ `तुझे सौभाग्य अक्षय्य राहो' अशी उदात्त, महन्मंगल भावना त्यामागे असते. लग्नप्रसंगी वधू वरांना कुंकू लावण्याची चाल पारशी लोकांतही आहे. मांगलिक कार्यात पुरूषांनाही कुंकू लावले जाते.
परंतु, अलीकडे बाजारात मिळणारे कुंकू अनेकदा विविध प्रकारचे केमिकल्स, रंग वापरून बनवले जाते. त्याच्या वापराने कोणाला ऍलर्जी होते, तर कोणाला पुरळ उठतात. तरीदेखील धर्म शास्त्रानुसार कुंकू लावण्याची इच्छाही असते. यासाठी उपाय म्हणून घरच्या घरी कुंकू बनवण्याची पद्धत जाणून घ्या.
कुंकू बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- अर्धी वाटी हळद,
- एक टीस्पून बेकिंग सोडा,
- एक लिंबू,
- एक चमचा देशी तूप,
- कापुर,
- एक चमचा गुलाब पाणी
कुंकू बनवण्याची कृती
>>अर्धी वाटी हळद एका ताटात काढून घ्या, त्यामध्ये खाण्याचा सोडा टाका आणि चांगले मिक्स करा.
>>त्यानंतर त्यात एक लिंबू पिळा, हे मिश्रण चांगले एकजीव करा.
>>कुंकूला बुरशी लागू नये यासाठी कापुर पावडर त्यात घाला
>>आता एक चमचा गावरान तूप त्यात मिक्स करा.
>>चांगला सुगंध येण्यासाठी यामध्ये एक चमचा गुलाब पाणी तुम्ही घालू शकता.
>>आता हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करून दहा मिनीटे बाजूला ठेवा.
>>दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की, चांगले लालसर कुंकू तयार झाले आहे.
कुंकू साठवण्याची पद्धत
तयार कुंकू चांगले वाळू द्यावे, त्यांनंतर ते हवाबंद डब्यामध्ये काढून ठेवले तर कुंकू वर्षभर टिकते.